ध्वजवंदनाचा मान ४४ वर्षे एकाच कुटुंबाला

- नागेश पाटील
गुरुवार, 26 जानेवारी 2017

चिपळूण - गावच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या उदेग कुटुंबाला सलग ४४ वर्षे ध्वजवंदनाचा मान गावाकडून दिला जातो. कळवंडे ग्रामस्थांनाही आपण सुरू केलेल्या या परंपरेचा अभिमान वाटतो. ९६ वर्षीय बाळाराम उदेग यांनी व्यावसायिक शेतीचे धडे गावाला दिले. त्यामुळे कळवंडे गाव कृषी क्षेत्रात अग्रेसर बनले आहे. त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ ध्वजवंदनाचा मान गावाने त्यांना बहाल केला आहे. हाच वारसा गेल्यावर्षीपासून बाळाराम उदेग यांचे चिरंजीव उद्योजक वसंत उदेग यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. भारतीय प्रजासत्ताकातील असे हे एकमेव उदाहरण असावे.

चिपळूण - गावच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या उदेग कुटुंबाला सलग ४४ वर्षे ध्वजवंदनाचा मान गावाकडून दिला जातो. कळवंडे ग्रामस्थांनाही आपण सुरू केलेल्या या परंपरेचा अभिमान वाटतो. ९६ वर्षीय बाळाराम उदेग यांनी व्यावसायिक शेतीचे धडे गावाला दिले. त्यामुळे कळवंडे गाव कृषी क्षेत्रात अग्रेसर बनले आहे. त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ ध्वजवंदनाचा मान गावाने त्यांना बहाल केला आहे. हाच वारसा गेल्यावर्षीपासून बाळाराम उदेग यांचे चिरंजीव उद्योजक वसंत उदेग यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. भारतीय प्रजासत्ताकातील असे हे एकमेव उदाहरण असावे. संपूर्ण गावाने एका कुटुंबालाच मान देऊन कृतज्ञता व्यक्‍त करणे हेच अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे.

तालुक्‍यातील कळवंडे गावात १९६५ च्या सुमारास प्रगतिशील शेतकरी बाळाराम उदेग यांनी व्यावसायिक शेती करण्यास सुरवात केली. स्वतः शेतीत विविध प्रयोग केले. गावकऱ्यांना यात सहभागी करून त्यांनाही व्यावसायिक शेती करण्यास प्रोत्साहन दिले. प्रत्येक कुटुंबाला किमान १० आंब्याची कलमे लावण्यास भाग पाडले. आजच्या स्थितीला कळवंडेत आंबा, काजूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. कमी कालावधीत अधिक नफा मिळवण्यासाठी भाजीपाला लागवडीचे महत्त्व बाळाराम उदेग यांनी ग्रामस्थांना समजावून सांगितले. आज सर्वाधिक भाजीपाला या गावात केला जातो. बाळाराम उदेग यांनी शिक्षणावर भर देताना गावातील एकही मूल शाळेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली. गावातील तंटे गावातच मिटवण्याची प्रथा त्यांनीच सुरू केली. येथील एकही तक्रार पोलिस ठाण्यात जात नाही. गावात शेती अथवा घरात चोरी होत नाही. आंब्याची चोरी केल्यास शिक्षेची तरतूद आहे. गावात गट-तट नसल्याने विकास कामात कधी राजकारण होत नाही. आजपर्यंत ग्रामपंचायतीची कधीच निवडणूक झालेली नाही. ९६ वर्षीय बाळाराम उदेग २५ वर्ष सरपंच होते.

त्यानंतर प्रत्येक वाडीला सरपंचपदाचा मान देण्याची प्रथा त्यांनी सुरू केली. 
त्यांच्या योगदानामुळेच गेली ४४ वर्षे ग्रामपंचायतीचा सरपंच कोणीही असला तरी १५ ऑगस्ट, २६ जानेवारी व १ मे या दिवशी ध्वजवंदनाचा मान गावाने त्यांना दिला आहे. वृद्धत्वामुळे आपण ध्वजवंदन करू शकत नाही असे बाळाराम यांनी सांगितल्यावर त्यांचा मुलगा व उद्योजक वसंत उदेग यांना ध्वजवंदनाचा मान गावाने स्वतःहून दिला आहे. वसंत हे देखील वडिलांच्या कार्याचा वारसा जपत आहेत. शेतीचे उत्पादन वाढीसाठी ते शेतकऱ्यांमध्येच स्पर्धा घेतात. गावातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व रोजगारासाठी मदत करतात. शासकीय योजना राबविण्यासाठी गावाला साह्यभूत होतात. 

कॅशलेस प्रजासत्ताकातही सहभाग
आजपर्यंत या गावातील एकही ग्रामसभा तहकूब झालेली नाही. गावाच्या एकीमुळे निर्मल ग्रामपंचायत, हागणदारीमुक्त ग्रामपंचायत, स्मार्ट ग्राम, तंटामुक्त गाव, गौरव ग्रामसभा पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार असे अनेक पुरस्कार ग्रामपंचायतीला मिळाले आहेत. दरवर्षी पुरस्कारांच्या यादीत कळवंडे ग्रामपंचायतीचे गाव असते अशी या गावाची ख्याती आहे. आता कॅशलेस ग्राम अभियानही या गावात राबवले जात आहे.

गावात व्यावसायिक शेती होत असून ग्रामस्थांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यावर आमचा भर आहे. त्यासाठी शेतात विविध प्रयोग केले जात आहेत. गाव आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्यासाठीचे कार्य यापुढेही अवितरपणे सुरू राहील.’’
- वसंत उदेग, प्रगतिशील शेतकरी व उद्योजक

Web Title: flag bow honor only one family