
राजापूर : दोन दिवसंपूर्वी अतिवृष्टी होवून नुकसानीच्या बसलेल्या तडाख्यातून तालुकावासिय सावरत असताना आज तालुक्याला अर्जुना-कोदवली नद्यांना आलेल्या पूराचा सामना करावा लागला आहे. अर्जुना-कोदवली नद्यांना आलेल्या पूराचा राजापूर शहरासह ग्रामीण भागाला वेढा पडला आहे. शहरातील जवाहरचौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत धडक देणार्या पूराच्या पाण्याने सुमारे दहा तासाहून अधिक काळ जवाहरचौकामध्ये ठिय्या मांडलेला अद्यापही कायम राहीलेला आहे. जवाहरचौकामध्ये सुमारे दिड-दोन फूट पाणी होते. शहराचा बहुतांश भागामध्ये पूराचे पाणी घुसले आहे. ग्रामीण भागातील शिळ-गोठणेदोनिवडे रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यातून, अर्जुना-कोदवली नद्यांना यावर्षी पहिल्यांदा आलेल्या पूरामुळे शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.