पुरामुळे मृत्यूनंतरही दुरावले गाव

प्रभाकर धुरी
Friday, 23 August 2019

...आणि ‘ती’ बातमी आली
नागपंचमीदिवशी घरापर्यंत आलेले पाणी मंगळवारी घरात आले. तोपर्यंत तालुक्‍यातील सगळे रस्ते बंद झाले होते. गावात येणे अथवा जाणे अशक्‍य होते, अशातच बुधवारी प्रेमानंद गेल्याची बातमी आली. त्यांचा मृतदेह गोव्यातून आणणे अशक्‍य होते. पाणी वाढत होते. पूर कधी ओसरेल याचा नेम नव्हता. त्यामुळे त्यांच्यावर गोव्यातच अंत्यसंस्कार करण्यात आले. आमच्या सर्वांसाठी ती गोष्ट खूपच वेदनादायी आहे, असे सांगताना जांबोटकर कुटुंबीयांच्या भावना दाटून आल्या होत्या.

घोडगेवाडीत पूररेषा बदलली; अनेक कुटुंबे कोलमडली
दोडामार्ग - कित्येक वर्षांनंतर आलेल्या पुराने घोटगेवाडीची पूररेषा बदलली आणि अनेक कुटुंबे कोलमडली आणि विखुरली. इतकंच नाही तर गोव्यातील रुग्णालयात मृत्यू पावलेल्या व्यक्तीवर गावाऐवजी गोव्यातच अंत्यसंस्कार करण्याची वेळही पुराने आणली. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू पावलेल्या प्रेमानंद जांबोटकर (वय ५०) यांच्या कुटुंबीयांना म्हणूनच यावर्षीचा पूर पुढील अनेक वर्षे वेदना देणारा ठरेल.

तिलारी नदीच्या काठावर वसलेले घोटगेवाडी हे सुंदर गाव. गावात केळी बागायती खूप. अनेक तरुणांनी मुंबई, गोव्यातील पंधरा-वीस हजार रुपयांच्या नोकऱ्या सोडून गाव गाठले. त्यांनी गावात केळीच्या बागा फुलवून आपले आयुष्य समृद्ध बनवण्याचा प्रयत्न केला. त्यात कृषी पदविका आणि पदवी घेतलेले अनेक बेरोजगार तरुण आहेत; जे आता शेती बागायतीला सर्वस्व मानतात. त्यांच्या सर्व बागा तिलारीच्या काठावर आहेत. नुकत्याच आलेल्या पुराने त्या तरुणांच्या बागा आपल्यासोबत वाहून नेल्या. त्यात त्यांच्या वीस-पंचवीस हजार केळी वाहून गेल्या. त्यामुळे त्यांची कित्येक कोटी रुपयांची हानी झाली. दुसऱ्याच्या हाताखाली नोकरी करून हातात काही उरत नाही, त्यापेक्षा गावातच शेतात राबायचे असे ठरवून गावात परतलेल्या त्या तरुणांच्या स्वप्नांचा पुराने चक्काचूर केला.

त्यामुळे त्यांच्याही आठवणीत यावर्षीचा पाऊस वर्षानुवर्षे राहील. काठावरच्या केळी, नारळाच्या बागेजवळ अगदी तिलारी नदीच्या काठाला लागून जांबोटकर, सावंत आणि भणगे कुटुंबीयांची घरे आहेत. वस्तीत जेमतेम सहा घरे आणि चौदा कुटुंबे. तीन शाळकरी मुले आणि काही वयोवृद्धही. मनोहर जांबोटकर वयाची साठी ओलांडलेले गृहस्थ. त्यांनीही असला पूर आपल्या पुऱ्या हयातीत पाहिलेला नाही. राधाबाई जांबोटकर यांच्या लग्नालाच साठ वर्षे झालीत. त्यामुळे त्यांच्या स्मृती अगदी लख्ख आहेत. त्या म्हणतात, लग्न होऊन मी आले त्याला साठ वर्षे झाली. या साठ वर्षात नदीने आपली मर्यादा कधी ओलांडली नाही. काठापासून जवळ असूनही पाणी कधी मनोहर जांबोटकर यांच्या घरापर्यंतही आले नव्हते.

घरापासून वीस-पंचवीस मीटर अंतरावरूनच ते परत जायचे. यावेळी मात्र पाणी वेगळ्याच मूडमध्ये होते. वर्षानुवर्षाच्या श्रद्धा आणि संस्काराप्रमाणे आम्ही पाण्याची पूजा केली, दिवा अगरबत्ती लावली; पण पाणी काही थांबेना. पाण्याने आक्रमक होत, पूजा-अर्चा नाकारून सारे बंध तोडले, लक्ष्मणरेषा ओलांडली आणि आमच्या पोटात गोळा आला. आता घर सोडायला हवे यावर एकमत झाले आणि आम्ही घर सोडले.

त्यांच्या आठवणीतील पूर्वीचा पाऊस आणि पूर यावर्षीपेक्षा सुरक्षित होता. यावर्षी मात्र सगळ्या कुटुंबीयांना पाऊस आणि पुराने कोलमडून टाकले. पाणी कमी होण्याची वाट पाहता पाहता पाणी घरात घुसले. अर्ध्या भिंती आणि सगळं साहित्य पाण्यात गेले. अनेकांचे संसार विस्कटले. डोळ्यातील स्वप्ने अश्रूंनी वाहून नेली.

पुराने शिकवला सर्वधर्मसमभाव 
घरात पाण्याने मुक्काम करताच सर्वानी गावांतील शाळा गाठली. सहा दिवस त्यांचा मुक्काम शाळेत होता. तिथे जातीधर्माची  बंधने गळून पडली. शेजारी राहणाऱ्या सावंत आणि भणगे यांनी कंबरभर पाण्यातून जांबोटकर कुटुंबीयांना शाळेकडे नेले. त्यांच्या जेवण्याखाण्याची व्यवस्था केली. एकीकडे गावगाडा विस्कटून टाकणाऱ्या पुराने आपत्तीवेळी मात्र सर्वधर्मसमभावाचा प्रत्ययही दिला. सपना जांबोटकर त्याबद्दल कृतज्ञतापूर्वक बोलत होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood Ghotagewadi Village Loss