महामार्गाची उंची वाढवल्याने पणदूरमध्ये झाली ही समस्या; ग्रामस्थांनी दिलाय `हा` इशारा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जुलै 2020

महामार्ग चौपदरीकरणात ठेकेदाराने महामार्गाची उंची वाढवल्याने आणि पाण्याचा योग्य निचरा न केल्याने पणदूर तिठा येथे आनंद राऊळ ते राजेश टंगसाळी यांच्या घरापर्यंत महामार्गालालगत नाल्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

कुडाळ ( सिंधुदुर्ग) - हायवे ठेकेदाराच्या निकृष्ट कामाचा आणि हायवे प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पुन्हा एकदा गतवर्षीप्रमाणे पणदूर तिठ्याच्या दोन्ही बाजूच्या ओढ्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. येत्या आठ दिवसात नुकसान झालेल्या शेतकरी ग्रामस्थांना संबंधित ठेकेदार कंपनीकडून नुकसान भरपाई मिळाली नाही तर पणदूर पुलाजवळ चालू असलेले काम बंद पाडू, असा इशारा पणदूर सरपंच दादा साईल यांच्यासह ग्रामस्थांनी दिला. 

महामार्ग चौपदरीकरणात ठेकेदाराने महामार्गाची उंची वाढवल्याने आणि पाण्याचा योग्य निचरा न केल्याने पणदूर तिठा येथे आनंद राऊळ ते राजेश टंगसाळी यांच्या घरापर्यंत महामार्गालालगत नाल्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे परिसरातील नुकतीच लावणी केलेली भातशेती, नारळ बागायरी, दुकाने व घरात पाणी भरले असून विद्युत उपकरणे जळाली आहेत. 

गेल्यावर्षी पण याच ठिकाणी पाणी तुंबून आजूबाजूच्या शेतीत,घरात, दुकानात पाणी शिरून मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर संबंधित ठेकेदार कंपनीने पुढील पावसाळ्यापूर्वी पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले होते. 

गेले वर्षभर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न करून देखील ठेकेदार कंपनी आणि हायवे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने पुन्हा एकदा पहिल्याच पावसात याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबून शेतकरी आणि ग्रामस्थांचे नुकसान झाले आहे. 

ग्रामपंचायतीने कंपनीबरोबर केलेला पत्रव्यवहार कंपनी स्वीकारत नाही आणि प्राधिकरण अधिकारी नेहमीप्रमाणे टोलवाटोलवी करतात त्यामुळे याला जबाबदार कोण? असा प्रश्‍न पणदूर सरपंच दादा साईल यांनी विचारला आहे. येत्या आठ दिवसात नुकसान झालेल्या शेतकरी ग्रामस्थांना संबंधित ठेकेदार कंपनीकडून नुकसान भरपाई मिळाली नाही आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लागला नाही आणि परत पाणी तुंबून शेतकरी आणि ग्रामस्थांचे नुकसान झाले तर ठेकेदार कंपनी आणि हायवे प्राधिकरनाच्या अधिकाऱ्याना रस्त्यावर फिरू देणार तर नाहीच पण पणदूर पुलाजवळ चालू असलेले काम बंद पाडू, असा इशारा पणदूर ग्रामस्थांनी दिला आहे. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood Situation Due To Increasing Height Of Highway In Pandoor