दोडामार्ग तालुक्‍यातील  `हे` पूल पाण्याखाली 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 August 2020

वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प होती. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली; मात्र पर्यायी मार्ग नसलेल्या काही ठिकाणची वाहतूक ठप्प होती

दोडामार्ग ( सिंधुदुर्ग ) - तालुक्‍यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. दोन दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे नदीनाले दुथडी भरून वाहत होते. अनेक ठिकाणचे छोटे पूल पाण्याखाली गेले होते.

वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी मोठमोठी झाडे उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प होती. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली; मात्र पर्यायी मार्ग नसलेल्या काही ठिकाणची वाहतूक ठप्प होती. मुसळधार पावसामुळे तिलारी नदी भरून वाहू लागल्याने घोटगे परमे, घोटगेवाडी, केर मोर्ले आदी गावांचा संपर्क तुटला आहे. येथील तिलारी राज्य मार्गावर साटेली-भेडशी आवाडे येथे झाडाची मोठी फांदी तुटून पडली. त्यामुळे पहाटे तीन वाजल्यापासून साटेली भेडशी आणि परिसरातील वीजप्रवाह खंडित झाला होता. दोडामार्ग परिसरातही काल (ता. 3) रात्रीपासून वीजप्रवाह खंडित झाला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत झाला नव्हता. 

दरम्यान, दोडामार्ग - गोवा मार्गावर पोस्ट ऑफिसच्या समोर मोठे झाड पडल्याने दोडामार्ग - गोवा मार्गावरीलही वाहतूक खोळंबली होती. ते झाड विद्युत वाहिन्यावर पडल्याने वाहिन्या जमीनदोस्त झाल्या. त्यामुळे या भागातील वीज संपूर्ण दिवसभर गायब होती. दरम्यान, मणेरी बाजारपेठेत मारुती मोटारीचा अपघात झाला. मारुती जांभळीच्या झाडाला आदळली. चालक आणि त्याची आई त्यात होती. सुदैवाने कुणी जखमी झाले नाहीत. गाडीचे मात्र मोठे नुकसान झाले. येथील प्राथमिक शाळेसमोरील परेश नाईक यांच्या वडापाव स्टॉलजवळ असलेल्या माडाचा शेंडा अर्ध्यावरून तुटून खाली कोसळला. तो थेट श्री. नाईक यांच्या दुकानात पडले. तिथे ते काम करत होते. ते सुदैवाने बचावले. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood Water On Bridges In Dodamarg Taluka