कोल्हापूर - गगनबावडा मार्गावर पुराचे पाणी; वाहतूक बंद 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 September 2019

वैभववाडी - जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. समुद्रात वादळीवारे वाहत असून समुद्र खवळलेला आहे. भुईबावडा घाटातील दरड हटविण्यात आली असून मार्ग वाहतुकीस खुला करण्यात करण्यात आला आहे. तळेरे-कोल्हापूर मार्गावरील मांडकुली येथे पुराचे पाणी आल्यामुळे वाहतूक बंद आहे. 

वैभववाडी - जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. समुद्रात वादळीवारे वाहत असून समुद्र खवळलेला आहे. भुईबावडा घाटातील दरड हटविण्यात आली असून मार्ग वाहतुकीस खुला करण्यात करण्यात आला आहे. तळेरे-कोल्हापूर मार्गावरील मांडकुली येथे पुराचे पाणी आल्यामुळे वाहतूक बंद आहे. 

जिल्ह्यात गेले सहा सात दिवस पाऊस सुरू आहे. पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली नसली तरी किरकोळ पडझडीचे प्रकार सुरूच आहेत. दोन दिवस तर संततधार सुरू होती. तुलनेत आज सकाळपासून जोर किंचित कमी झाला होता; मात्र संततधार कायम आहे. किनारपट्टीच्या मालवण, देवगड, वेंगुर्ले तालुक्‍यात पाऊस ओसरला आहे. सहा दिवसानंतर येथे सूर्यदर्शन झाले. सह्याद्री पट्ट्यात मात्र पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्याच्या पूर्वपट्ट्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नदीनाल्यांतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. 

समुद्रात जोरदार वादळीवारे वाहत आहेत. त्याचा परिणाम किनारपट्टीला समुद्री लाटा धडकत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, बुधवारी पहाटे वैभववाडी तालुक्‍यातील भुईबावडा घाटात कोसळलेली दरड आज सायंकाळी हटविण्यात आली. त्यानंतर बांधकाम विभागाने सुरक्षेच्यादृष्टीने रस्त्याकडेला दगड भरलेली बॅरेल रचून हा मार्ग वाहतुकीस खुला केला आहे. आज सकाळी आठपर्यत संपलेल्या 24 तासात दोडामार्गात सर्वाधिक 122 मिलिमीटर तर त्या पाठोपाठ वैभववाडीत 98 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्याचा सरासरी पाऊस 63.37 मिलिमीटर आहे. 

तळेरे-कोल्हापूर मार्ग वारंवार बंद 
कोल्हापूर जिल्ह्यातील पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहे. घाटमाथ्यावरील धरणातून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे तळेरे-कोल्हापूर मार्गावरील मांडकुली (ता. गगनबावडा) येथे पुराचे पाणी रस्त्यावर आले आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. ऑगस्टमध्ये तब्बल अकरा दिवस हा मार्ग बंद होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood water on Talere - Kolhapur highway