सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; बडोदा घराण्याशी जुळले नाते

ब्रिटीश अंमल असला तरी त्यांनी लोकहिताच्या दृष्टीने अनेक सुविधा निर्माण केल्या.
सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; बडोदा घराण्याशी जुळले नाते

सिंधुदुर्ग : गादीचे मालक रघुनाथराव उर्फ बाबासाहेब यांचा विवाह होवून सावंतवाडी संस्थानचे बडोदा संस्थानशी ऋणानुबंध जुळले. त्यांचा विवाह गायकवाड घराण्यातील ताराबाबा यांच्याशी झाला. संस्थानच्या इतिहासात ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्यानंतर बडोदा संस्थानशी जुळलेला हा लग्न संबंध महत्त्वाचा मानला जातो. या दाम्पत्याची कारकिर्द अल्प ठरली; मात्र स्वाभिमानी म्हणून त्यांची इतिहासाने नोंद घेतली. ब्रिटीश अंमल असला तरी त्यांनी लोकहिताच्या दृष्टीने अनेक सुविधा निर्माण केल्या. केसरीची नळपाणी योजना हे याचे महत्त्वाचे उदाहरण.

रघुनाथराव उर्फ बाबासाहेब यांचा विवाह २१ डिसेंबर १८७९ ला बडोद्यात झाला. हा ऋणानुबंध बडोद्याचे गायकवाड आणि सावंतवाडी संस्थान यांच्यादृष्टीने महत्त्वाचा मानला गेला. या आधी संस्थानची ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याशी सोयरीक होती. शिंदे घराण्याप्रमाणेच बडोदा संस्थान भारतात एक मोठे आणि महत्त्वाचे मानले जाते.

पिलाजीराव गायकवाड यांनी १७२१ मध्ये याची स्थापना केली. आताच्या गुजरामध्ये याचा राज्यविस्तार होता. बडोदा हे त्यांचे मुख्यालय. या संस्थानला २१ तोफांचा मान होता. गुजरातचा काही भाग मराठा साम्राज्याने मिळवल्याने त्यावर दमाजीराव गायकवाड यांची नेमणूक करण्यात आली. पुढे गायकवाड घराण्याने राज्यविस्तार करत मोठा पराक्रम केला. छत्रपती शाहू महाराजांनी दमाजी यांना समशेर बहाद्दर असा किताब दिला होता. १७२१ मध्ये दमाजी यांच्यानंतर सरदारकी मिळालेल्या पिलाजीराव यांनी मोगलांचा सोनगड हा किल्ला घेतला.

पुढे त्यांनी मुस्लिम राजवट उलथवून लावत विस्तार केला. पेशव्यांना मोठमोठ्या लढायांसाठी त्यांनी मदत केली. ब्रिटीशांच्या काळातही बडोदा संस्थानला स्वायत्त दर्जा होता. या घराण्यातील खंडेराव गायकवाड यांच्या ताराबाबा या कन्या होत्या. हा विवाह बडोद्यात झाला. बडोदा सरकारने बाबासाहेबांना हुंडा म्हणून १ लाख रूपये आणि ताराबाबा यांना ४ लाखाचे दागिने, जडजवाहीर शिवाय वर्षाला २५ हजाराची नेमणूक दिली.

ताराबाबा ह्या तेजस्वी व्यक्तीमत्त्व लाभलेल्या राणीसाहेब होत्या. सावंतवाडीशी त्यांची नाळ जुळली होती. त्या फार कमी आयुष्य जगल्या; मात्र या काळात सावंतवाडीकरांशी एकरूप झाल्या. त्या उत्तम सरोदवादक होत्या. गायन संगिताची आवड आणि उमद्या स्वभावामुळे त्यांनी सावंतवाडी संस्थानच्या राणीसाहेब म्हणून वेगळी ओळख निर्माण केली.

केसरीची नळपाणी योजना सावंतवाडीला त्यांच्यामुळेच मिळाली. आजही गुरूत्वाकर्षणावर आधारीत ही योजना अर्ध्या सावंतवाडी शहराची तहान भागवत आहे. या योजनेच्या निर्मितीची कहाणी त्या काळात निर्माण झालेल्या पाण्याच्या दुर्भिक्षाशी जोडली जाते. ताराबाबा यांचे जन्मस्थान असलेल्या बडोद्यामध्ये त्याकाळात बर्‍याच सुधारणा झाल्या होत्या. त्याचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्या तुलनेत सावंतवाडी सह्याद्रीच्या रांगामध्ये वसलेले, दुर्गम आणि छोटे संस्थान होते. एकावर्षी सावंतवाडीत पावसाळा यायला उशिर झाला. यामुळे टंचाई जाणवू लागली. लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. राजवाड्यातही भरपूर पाणी लागत असे.

ताराबाबा यांनी यातून मार्ग काढण्यासाठी नळपाणी योजना राबवण्याचा आग्रह धरला. गुरूत्वाकर्षणावर आधारीत ही योजना राबवता येईल अशी संकल्पना मांडली. यानंतर बर्‍याच लांब असलेल्या केसरी येथील झऱ्याचे पाणी थेट सावंतवाडीच्या राजवाड्यापर्यंत नळाच्या मदतीने आणण्यात आले. केसरीला तलाव बांधण्यात आला. शहरात जागोजागी नळ बसवून पाण्याची मोफत सोय करण्यात आली. या योजनेसाठी ताराबाबा यांनी आपल्या खासगी उत्पन्नातून २ लाख रूपये खर्च केले. १८९३ मध्ये ही योजना साकारली. त्याकाळात रोज नळाव्दारे ९० हजार गॅलन पाणी शहरात येत असे.

रघुनाथ महाराज यांची कारकिर्दही तशी अल्पच ठरली. त्यांच्या काळात बराचसा राजकारभार ब्रिटीशांकडे होता. रघुनाथ महाराज यांना मात्र ब्रिटीशांच्या या हस्तक्षेपाचा राग यायचा. ते स्वाभिमानी होते. ब्रिटीशांना फारशी किंमत देत नसत. ते म्हणायचे की, हे इंग्रज आयत्या घरात घुसलेले सर्प आहेत. याबाबतचा एक किस्साही सांगितला जातो. त्याकाळात बेळगावचा कलेक्टर प्रभारी अधिकारी म्हणून कारभार पाहत असे. हा अधिकारी आपल्या पत्नीसोबत कामकाजासाठी खूपदा राजवाड्यात मुक्कामाला असायचा.

राजेसाहेबांचा एक कुत्रा होता. हे इंग्रज दांम्पत्य वारंवार येत असल्याने हा कुत्रा त्यांच्याशीही सलगीने वागत असे. एकदा त्या कुत्र्याने ब्रिटीश अधिकार्‍याच्या पत्नीशी काहीतरी आगळीक केली. त्यामुळे तिने नवर्‍याकडे तक्रार केली. बेळगावचा कलेक्टर भरलेली बंदूक घेवून राजवाड्यात त्या कुत्र्याला शोधू लागला. ही माहिती रघुनाथ महाराजांना समजली. त्यांच्या रागाचा पार चढला. तेही बंदूक घेवून बाहेर आले. एका क्षणी तो गोरा साहेब आणि महाराज समोरासमोर होते आणि तो कुत्राही बाजूला होता. महाराजांनी ‘हिंम्मत असेल तर गोळी घालून दाखव’ असे थेट आव्हानच त्या गोर्‍या साहेबाला दिले. त्याने माघार घेत तेथून काढता पाय घेतला.

रघुनाथ महाराजांनाही गायनाचा छंद होता. संस्थानातील दशावतारी दहिकाले काही कारणामुळे बंद पडले होते. ते त्यांनी पुन्हा सुरू केले. त्यांचे आयुष्य अवघे ३७ वर्षांचेच राहिले. त्यांच्या पत्नी ताराबाबा याही अल्पायुष्यी म्हणजे २६ वर्षांच्या असतानाच निधन पावल्या. १८७१ मध्ये जन्मलेल्या ताराबाबा यांचे १५ जून १८९७ मध्ये निधन झाले. त्यांना आजार जडला होता. यावेळी अनेकांनी त्यांना बडोद्यात जावून अधिक चांगले उपचार घेता येतील असा सल्ला दिला; मात्र स्वाभिमानी असलेल्या ताराबाबा ऐकल्या नाही.

‘मी लग्न होवून सावंतवाडीत आले आहे, हे माझे घर आहे. जे काही होईल ते येथेच होवू दे. मरणाच्या भितीने मी सावंतवाडी सोडणार नाही.’ असे त्या सांगायच्या. यातच त्यांचे निधन झाले. त्यांना मुलबाळ नव्हते. यानंतर १८९८ ला रघुनाथ महाराजांचे सावंतवाडीतील संभाजीराव निंबाळकर यांच्या बहिणीशी दुसरे लग्न झाले. या नव्या राणीचे नाव लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. १८९९ मध्ये बाबासाहेब पोटाच्या आजाराने ग्रस्त झाले. यातच त्यावर्षी १४ डिसेंबरला त्यांचे निधन झाले. ते शूर, उदार आणि तीव्र बुध्दीमत्तेचे म्हणून ओळखले जायचे. घोड्यावर बसण्यात आणि शिकार करण्यात ते पटाईत होते.

रघुनाथ महाराजांच्या कार्यकाळात ब्रिटीशांनी संस्थानात अनेक सुधारणा, सुविधा निर्माण केल्या. १८८० मध्ये ब्रिटीश आणि गोव्याच्या पोर्तुगिज सरकारमध्ये तह होवून गोव्याने आपली मिठागरे १२ वर्षाच्या कराराने ब्रिटीशांना दिली. त्यावेळी ब्रिटीशांनी सावंतवाडी संस्थानशी तह करून येथील सर्व मिठागरे बंद केली. त्या बदल्यात संस्थानला दरवर्षी ५,५०० रूपये देण्याचे कबुल केले.

२१ जानेवारी १८८१ ला मुंबई प्रांताचे गर्व्हनर जेम्स फर्ग्युसन हे सावंतवाडीत आले होते. त्यावेळी आताच्या संस्थानच्या दरबार हॉलची पायाभरणी करण्यात आली. त्याचवर्षी २९ ऑक्टोबरला संस्थानचे कारभारी रावबहाद्दूर वामनराव पितांबर चिटणीस हे निवर्तले. त्यांच्या जागी सखाराम बाजी बावडेकर यांची नेमणूक झाली.

पोलिटीकल सुप्रिटेंडन्ट वेस्ट्रॉप यांच्या कारकिर्दीत अनेक सुधारणा झाल्या. यात ७ लाख रूपये खर्च करून दरबार हॉल उभारण्यात आला. हॉस्पीटल, तुरुंग याच्या इमारती बांधल्या गेल्या. त्याकाळात स्थानिक पदार्थ संग्रहालय अर्थात म्युझियमसुध्दा उभारण्यात आले. ही इमारत सावंतवाडीच्या आताच्या कोर्टाच्या बाजूला होती. याला वेस्ट्रॉप यांचे नाव देण्यात आले होते. त्यांच्याकाळात शाळांची संख्याही वाढवली. रस्त्यांमध्ये सुधारणा झाली. संस्थानचे उत्पन्नही वाढले.

जमिन मोजणीची मोहीम

सावंतवाडी संस्थानमध्ये १८७० पासून पैमाष जमाबंदीचे काम सुरू करण्यात आले होते. १८८५ मध्ये ते पूर्ण झाले. या कालावधीत जमिनीची मोजणी शास्त्रोक्त पध्दतीने करून त्याचे मालकी व इतर नोंदींचे रेकॉर्ड करण्यात आले. त्याकाळात महसूल वसुलीसाठी ब्रिटीशांनी ही मोजणी केली होती. यासाठी ३ लाख ६० हजार ९४ इतका खर्च आला होता. या मोजणीमुळे सरकार जमा होणार्‍या करामध्ये ३९.७७ टक्के इतकी वाढ झाली. यामुळे जमिनसार्‍यातून दरवर्षी ५४ हजार ४६८ इतका महसूल मिळू लागला. सिंधुदुर्गात असलेल्या भूमिअभिलेख रेकॉर्डचा हा जन्म म्हणता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com