सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; ब्रिटिशांनी पारंपरिक व्यवस्था बदलली

विशेषः आर्थिक व्यवहार, दप्तर यात बदल झाल्याचे दिसते.
kokan
kokansakal

ब्रिटीशांनी प्रत्यक्ष कारभार हातात घेतल्याने सावंतवाडी (Sawantwadi) संस्थानमार्फत परंपरेने चालवल्या जाणार्‍या व्यवस्थेत मोठे बदल झाले. काही व्यवस्था कालबाह्य ठरल्या. ब्रिटिशांनी काही व्यवस्था टप्प्याटप्प्याने बंद केल्या. काही मात्र तशाच ठेवण्यात आल्या. विशेषः आर्थिक व्यवहार, दप्तर यात बदल झाल्याचे दिसते.

सावंतवाडी संस्थानच्या कारभाराच्या व्यवस्थेत दीर्घकाळ बदल झाल्याचे चित्र नव्हते. प्रामुख्याने याची मदार वंशपरंपरेने चालत आलेल्या ठराविक घराण्यांकडे होती. ब्रिटिशांनी या व्यवस्थेत टप्प्याटप्प्याने बदल केले. संस्थांनच्या जुन्या व्यवस्थेमध्ये दप्तराला महत्त्व होते. याचे प्रामुख्याने चिटणीशी, फडणीशी, जमाबंदी, नगदी आणि मनसुबदारी असे पाच विभाग होते. परकीय राजांशी, संस्थांनिकांशी किंवा इतर मोठ्या लोकांशी झालेला पत्रव्यवहार हा चिटणीशी या विभागात यायचा. सरकारकडून दिलेल्या सनदाची बारनिशी फडणीस यांच्याकडे असायची. याला फडणीशी म्हणायचे. जमाबंदी व तिच्या वसुली, हिशोब आणि त्या संबंधी पत्रव्यवहार जमाबंदीमध्ये यायचा. पैशाच्या देवघेवीसंबंधीचा विभाग नगदी आणि दिवाणी किंवा फौजदारी संबंधीत फिर्यादीत, त्याची चौकशी केल्याचे कागदपत्र आणि निर्णय हे मनसुबदारीत यायचे. यातील जमाबंदीचे कागदपत्रे संस्थानकडे १६७९ पासूनचे होते; मात्र इतर दप्तर अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासूनचे होते. मधल्या निपाणीकरांच्या अतिक्रमण काळात बऱ्याचशा दप्तराची नासधुस झाल्याचे संदर्भ आढळतात.

खेमसावंत यांच्या काळात राज्यकारभाराची बरीचशी व्यवस्था बसवण्यात आली होती. कारभाराच्या सोईसाठी त्यांनी चिटणीस, फडणीस, दप्तरदार, पोतनीस, पागनीस, कोटनीस, तटनीस हे दरकदार आणि दळवी-भोसले हे सेनापती परमेकर, माणगावकर-सावंत, तिरवडेकर आदी सरदार नेमले होते. दरकदारांची कामे ठरलेली होती. यातील सबनीस हे मुख्य कारभाराचे काम पाहायचे. इतर दरकदार, सरदार यांच्या कामावर देखरेख ठेवणे आणि प्रत्येक कामाची राजेसाहेबांकडे सुनावणी करून हुकुम देण्याचे काम त्यांच्याकडे होते. १८३४ पर्यंत सबनीस घराण्याकडेच परंपरेने याची जबाबदारी चालत आली होती. त्याकाळात बहुतेक गावात त्यांना इनाम जमिनी, प्रत्येक गावात हक्क म्हणून काही नक्त नेमणुका होत्या. शिवाय जकाती, तंबाखु अशा प्रकारच्या करावर काही हक्क त्यांना दिला होता. तंबाखुवरील करावर त्यांच्या हक्काचे प्रमाण शेकडा अडीच रूपये इतके होते. चिटणीसांकडे प्रामुख्याने जाबसाली कागदांचे दप्तर व बारनीशी ठेवण्याची जबाबदारी होती. राजेसाहेबांकडून दुसरे संस्थानी किंवा दुसऱ्या राजांना थैलीपत्र पाठवायचे झाल्यास त्याचे मसुदे तयार करून ते राजेसाहेबांना दाखवून पत्र लिहीणे तसेच दुसऱ्या राजांकडून किंवा संस्थानिकांकडून आलेल्या पत्रांची मुख्य कारभाऱ्यांमार्फत सुनावणी करण्याचे काम त्यांच्याकडे होते. जुन्या सरकारी दप्तराचा बराचसा भाग त्यांच्या ताब्यातच असायचा. त्यांना चिटणीशीबद्दल पूर्वी १०० होनांची नेमणूक होती. शिवाय काही मोकासा तसेच रहदारीच्या मालावर दरगोणीला ठराविक रकमेचा हक्क होता. १८३२ मध्ये त्यांची नेमणूक वर्षाला २,०७५ पिरखानी रूपये इतकी होती. नंतरच्या काळात ती कमी करून १३०८ वर आणण्यात आली. सरकारकडून देण्यात आलेल्या सनदांवर शिक्के करून त्याची बारनीशी करणे आणि प्रत्येक सनदेवर बारसुद असा शेरा लिहीण्याचे काम फडणीस यांच्याकडे होते. त्यांना वर्षाला २२५ पिरखानी रूपये मिळायचे.

kokan
नवरात्रोत्सवातून एकोप्याचं दर्शन; मंडणगडची रिक्षा संघटनेचा अनोखा नवरात्र

ब्रि‍टिशांनी कारभार हातात घेतल्यानंतर त्यांचे हे काम जवळजवळ बंद झाले. दप्तरदार आर्थात दरक ठेवण्याचे काम रांगणेकर घराण्याकडे होते. संस्थानच्या जमाबंदीचे आणि वसुलीचे काम यात समाविष्ट होते. प्रत्येक गावाकडे किंवा मक्तेदाराकडे करापोटी येणे किती, किती वसुली झाली आदीचा हिशोब राखून वसुलीची व्यवस्था लावण्याचे काम ते करायचे. जकातीचे मक्ते ठरवण्याची जबाबदारी ही त्यांच्याकडे असायची. गावकामदाराच्या हिशोबाची तपासणी, पाटदाम, वाळीत टाकलेल्या व्यक्तीकडून राजेसाहेबांचा त्याला पुन्हा जातीत घेण्याबाबत हुकुम झाल्यास ठरलेली गुन्हेगारी घेवून सनद देणे आदी कामे ही त्यांच्याकडे होती. त्यांना वर्षाला २५० पिरखानी रूपये मोबदला मिळायचा. ब्रिटीशांनी १८७८ मध्ये स्वतंत्र कारभारी नेमल्यानंतर ही जागा काढून टाकली. सरकारच्या तिजोरीत जमा होणारा पैसा पारखून घेणे आणि सरकारकडून द्यायच्या पैशाची पावती घेवून तो देणे, त्याचा हिशोब राजेसाहेबांना पाठवणे, सरकारच्या जडजवाहीर, मौल्यवान दागिने आदी सांभाळणे आदी कामे पोतनीस यांच्याकडे होती. त्यांनाही वर्षाला २५० रूपये पिरखानी मिळायचे. मग ते ८४० रूपये करण्यात आले. त्याकाळात संस्थानच्या पागेत २५० घोडे होते. त्याचा देखभाल खर्च ७,००० च्या दरम्यान होता. ही सर्व व्यवस्था पागनीस पहायचे. याशिवाय पिलखाना, उष्टरखाना, थटी (गुरांची व्यवस्था) आदीवर कामदार नेमले होते. पूर्वी धान्य, जीन्नस स्वरूपात वसुली व्हायची. याला ऐनजीनसी असे म्हटले जायचे. याची व्यवस्था कोटणीसांकडे असायची. राजेसाहेबांच्या कुटुंबाना लागणारे जिन्नस खरेदी केल्यानंतर तेही त्यांच्याच ताब्यात असायचे. माप करण्यासाठी त्यांच्या मदतीला दोन मापारी असत. एका कोठीतून दरवर्षी शेकडो खांडी धान्याची आवक-जावक व्हायची. सरकारचे आश्रीत, मेहमान, सरदार, दरकदार किंवा इतर कोणी मरजीतील व्यक्तीला लग्नकार्य, श्राद्ध किंवा इतर विशेष कार्यासाठी या कोठारातून बहुतेक जिनसांचा पुरवठा होत असे. ब्रिटीशांनी कारभार होतात घेतल्यावर १८४७ मध्ये ऐनजीनसी गल्ला घेण्याची ही पद्धत बंद करण्यात आली. त्यामुळे ही कोठी अर्थात कोठारे बंद झाली.

मराठीतले दप्तर

या संस्थानात सावंत-भोसले घराण्याचा अंमल सुरू होण्यापूर्वीपासून येथील दप्तर मराठी तसेच मोडी लिपीत ठेवले जात असे. तसे काही कागदपत्र त्याकाळात उपलब्ध होते. अर्थात ही मराठी भाषा पारशी आणि अरबी भाषेतील अनेक शब्द मिसळून बनलेली होती. दप्तरातील प्रमुख कागदत्रांची नावे अरबी आणि पारशी भाषेत असायची. याचे उदाहरणच द्यायचे तर बार म्हणजे कीर्द, मोहफर्द अर्थात खतावणी, इजमायली अर्थात जमाबंदीचा हिशोब, झाडा अर्थात बाकी असलेली वसुली, रवासुदगी अर्थात वरातचिठ्ठी आदी शब्दांचा दप्तरात उल्लेख होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com