पावशी येथील भीषण अपघातात चौघे जखमी 

कुडाळ
Friday, 25 September 2020

ही धडक एवढी भीषण होती की, मोटार काही मीटरपर्यंत फरफटत मागे गेली. गाडीच्या दर्शनी भागाचे पूर्णपणे नुकसान झाले. 

कुडाळ (सिंधुदुर्ग) - मुंबई-गोवा महामार्गावर पावशी ग्रामपंचायत नजीक टेम्पो व मोटारीत समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चौघे जखमी झाले. दोन्हीही गाड्यांचे मोठे नुकसान झाले. ही घटना आज घडली. 
याबाबत अधिक माहिती अशी, की ओंकार सावंत (वय 24, रा. कणकवली जानवली) हे त्यांच्या मोटारीने कणकवलीतून गोव्याच्या दिशेने जात होते.

त्यांच्यासोबत कणकवली तरंदळे येथील शरद पुजारे (वय 43), स्वाती म्हाडेश्‍वर (40), गौरी सावंत (वय 36) हे होते. मोटार पावशी येथे आली असता समोरील मार्ग बंद असल्याने ते विरुद्ध बाजूने गोव्याच्या दिशेने जात होते. यावेळी गोव्याहुन मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर व मोटारीची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की, मोटार काही मीटरपर्यंत फरफटत मागे गेली. गाडीच्या दर्शनी भागाचे पूर्णपणे नुकसान झाले. 

मोटार चालक ओंकार सावंत यांच्यासह मोटारीतील सर्वजण जखमी झाले. वाहतूक पोलिस समीर वारंग, आंदुर्लेकर, पावशी सरपंच बाळा कोरगावकर, उपसरपंच दीपक आंगणे तसेच ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अधिक उपचारासाठी पडवेतील लाईफ टाईम रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

दुबईला जाण्यासाठी गोव्याला 
मोटारीमधील माणसे ही कणकवली ते गोवा विमानतळ व तिथून विमानाने दुबईला जाणार होते, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र हुलावले यांनी दिली. सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र हुलावले, पोलिस एन. एन. कदम, ब्रिटन बुथलो, काका करंगुटकर यांनी पंचनामा केला. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four persons were injured in an accident at Pavshi