बंदी उठल्यानंतर चौथ्या दिवशीच लागला ‘ब्रेक’, मच्छीमारांचा हिरमोड ....

on fourth day fishing business stop in ratnagiri
on fourth day fishing business stop in ratnagiri

रत्नागिरी : शासकीय नियमानुसार मासेमारीवरील बंदी उठली आणि पाच टक्‍के मच्छीमारांनी शांत वातावरणाचा फायदा घेत मासेमारीला सुरवात केली. पहिल्या तीन दिवसांत कोळंबीसह बांगडा, सौंदाळा यांसारखी मासळी जाळ्यात सापडू लागली; पण हा आनंद औटघटकेचा ठरला. बंदी उठल्यानंतर चौथ्या दिवशीच कोकण किनारपट्टीवर वादळ उद्‌भवल्याने मासेमारीला ‘ब्रेक’ लागला. त्यामुळे मच्छीमारांचा हिरमोड झाला.

मासेमारीचा बंदी कालावधी ३१ जुलैपर्यंत होता. त्यानंतर १ ऑगस्टपासून मासेमारी हंगामाला सुरवात झाली. ट्रॉलिंग, गिलनेटसारख्या नौकांना मासेमारीसाठी परवानगी आहे; मात्र यंदाच्या हंगामावर कोरोनाचे सावट आहे. मच्छीमारांना पहिल्याच दिवशी निसर्गाने साथ दिली. ऐन पावसाळ्यात निवळलेल्या वातावरणाचा फायदा मच्छीमारांनी उचलला. तरीही पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील विविध बंदरांतील पाच ते दहा टक्‍केच नौका मासेमारीसाठी बाहेर पडल्या होत्या. 

मिरकरवाडा बंदरातून अवघ्या पंधरा ते वीस नौकांनी आरंभ केला. सलग तीन दिवसांत १५ वावापर्यंत मासेमारीला गेलेल्या मच्छीमारांना कोळंबी समाधानकारक मिळत होती. त्याबरोबरच बांगडा, सौंदाळासारखे मासेही मिळाल्याने यंदाचा हंगाम चांगला जाईल, अशी धारणा होती; परंतु तीनच दिवसांनी हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार हवामान बदलले आणि कोकण किनारपट्टीवर वेगवान वारे वाहू लागले. सोबत मुसळधार पावसामुळे समुद्र खवळलेला होता. बिघडलेल्या वातावरणामुळे मासेमारीला पहिल्याच आठवड्यात ब्रेक लागला.

पर्ससिननेट मासेमारी सुरू होण्यापूर्वी ट्रॉलिंगवाल्यांना मोठा आधार असतो. सध्या मिळत असलेल्या कोळंबीचा किलोचा दर १६० रुपयांपर्यंत होता. दर कमी असला तरीही कोरोनामुळे थांबलेली आर्थिक घडी पुढील काही दिवसांत व्यवस्थितरित्या बसली असती.

मासळी जाणार कुठे?
वादळामुळे समुद्र खवळला असून, मासळी प्रवाहाबरोबर मिळेल त्या दिशेने पुढे जाते. काही वेळेला मासळी किनारी भागाकडे येण्याची शक्‍यता असते. वादळामुळे मासळी श्रीवर्धनच्या दिशेने पुढे गेली तर जिल्ह्यातील मच्छीमारांना मोठा फटका बसणार आहे.

मासेमारीला सुरवात झाली; परंतु वातावरण बिघडल्याने पुन्हा नौका किनाऱ्यावर उभ्या कराव्या लागल्या.
- आप्पा वांदरकर, मच्छीमार

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com