फॉक्सकॉन गेला, रिफायनरीला तरी खोडा घालू नका - उदय सामंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uday Samant

केवळ काहीच दिवसांपूर्वी राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आले. तेव्हा फॉक्सकॉन वेदांताने सांगितले की, गुजरातने अधिक चांगले पॅकेज दिल्याने आम्ही तेथे गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

फॉक्सकॉन गेला, रिफायनरीला तरी खोडा घालू नका - उदय सामंत

रत्नागिरी - फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याबद्दल कंठशोष करताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुजरातपेक्षा चांगले पॅकेज देण्यात का कमी पडलो, याचे उत्तर आदित्य ठाकरे, जयंत पाटील यांनी आधी द्यावे, अशी मागणी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. आतातरी त्यापेक्षा दुपटीहून अधिक गुंतवणूक असलेल्या रिफायनरीच्या गुंतवणुकीत खोडा घालू नये, असा टोला सामंत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला.

केवळ काहीच दिवसांपूर्वी राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आले. तेव्हा फॉक्सकॉन वेदांताने सांगितले की, गुजरातने अधिक चांगले पॅकेज दिल्याने आम्ही तेथे गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही लगेच त्यांच्याशी संपर्क साधला आणि अधिक चांगले पॅकेज देऊ केले. त्यांनी आमच्याशी चर्चाही केली. भरपूर प्रयत्न करूनही त्यांनी आधीच्या गुजरातच्या निर्णयावर ठाम राहण्याचे ठरवले. आता दोषारोपच करायचा असेल तर मग महाविकास आघाडीच्या काळात फॉक्सकॉनला चांगले पॅकेज का देण्यात आले नाही? दोन वर्षांपासून ते गुजरातशी वाटाघाटी करत असताना आधीच्या सरकारने त्यांचे मन का वळवले नाही. अडीच वर्षांच्या मविआच्या काळात कोणती मोठी गुंतवणूक आली? याची उत्तरं त्यांना द्यावी लागतील.

यापेक्षा कितीतरी अधिक गुंतवणूक २०१४ ते २०१९ या भाजपा-सेना युतीच्या सरकारच्या काळात आली होती. प्रकल्प गुजरातला गेल्याचे आम्हालाही दु:ख आहे; पण निराश असलो तरी खचलो नाही. आम्ही सेमिकंटक्टर क्षेत्रातील अन्य कंपन्यांशी चर्चा करू आणि त्यांना महाराष्ट्रात आणू. गेल्या अडीच वर्षांपेक्षा अधिक चांगल्या उंचीवर महाराष्ट्राला निश्चितपणे नेऊ, असेही उदय सामंत यांनी म्हटले आहे.

गिफ्ट सिटीच्याबाबतीत असाच प्रकार झाला. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी तत्कालीन संपुआ सरकारकडून परवानगी आणली. महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार असूनही त्यांनी परवानगी आणली नाही आणि मग प्रकल्प गुजरातमध्ये गेला, अशी ओरड सुरू केली. परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र क्र. 1 वर होता. गुजरात, कर्नाटक, दिल्ली ही तिन्ही राज्य मिळून जी बेरीज व्हायची त्यापेक्षा अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात भाजपा-सेना युतीच्या सरकारच्या काळात यायची. आता राज्यात पुन्हा तीच युती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात कार्यरत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे किंवा जयंत पाटील यांनी फार काळजी करण्याची गरज नाही. आता वेदांताची 1.56 लाख कोटींची गुंतवणूक गेल्याबद्दल गळे काढताना नाणार रिफायनरीच्या माध्यमातून होणार्‍या 3.5 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत तरी खोडा घालू नका, अशी विनंतीसुद्धा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी करत आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.

Web Title: Foxconn Company Gone Dont Spoil The Refinery Project Uday Samant

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..