सिंधुदुर्गातही सुगंधी बासमतीचा दरवळ

हळवलमध्ये यशस्वी प्रयोग; २० गुंठ्यात पंधरा क्विंटल उत्पन्न
Kokan
Kokan Sakal

कणकवली : वाढती मजूरी आणि अपेक्षित उत्पन्नाची हमी नसल्‍याने अनेक शेतकऱ्यांनी भातशेती सोडून दिली आहे; पण तालुक्‍यातील हळवल येथील प्रगतशील शेतकरी (Farmer) प्रशांत मनोहर गावडे यांनी महावितरणमधील (MSEB) नोकरी (Job) सांभाळत वीस गुंठे क्षेत्रात बासमती १५०९ या भात वाणाच्या लागवडीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे. वीस गुंठे क्षेत्रातून त्‍यांना १५ क्विंटल भाताचे उत्‍पादन मिळाले आहे.

कोरोना प्रादुर्भाव कालावधीमध्ये शेती हेच शाश्‍वत रोजगाराचे साधन असल्‍याचे सिद्ध झाले. त्‍यामुळे मुंबई व इतर मोठ्या शहरातील तरूण शेतीकडे वळले. यात काहींनी शेतीमध्ये वेगळे प्रयोग करून शेती फायद्यात आणता येऊ शकते हे दाखवून दिले आहे. कणकवली तालुक्‍यातील हळवल-परबवाडी येथील तरूण शेतकरी प्रशांत गावडे यांनीही यंदा पारंपरिक भात शेतीबरोबरच आपल्‍या २० गुंठे क्षेत्रात दोन किलो बासमती १५०९ या भाताच्या वाणाची लागवड केली. रासायनिक खतांऐवजी सेंद्रीय खताचा वापर केला. दोन दिवसापूर्वी या बासमती वाणाची कापणी पूर्ण झाली. वीस गुंठे क्षेत्रातून १५ क्विंटल भाताचे उत्पादन मिळाल्याची माहिती श्री.गावडे यांनी दिली.

Kokan
मुंबईत 72 हजारांहून अधिक होम आयसोलेशन रुग्ण

पारंपरिक भात शेती मधून प्रति गुंठा जास्तीत जास्त ४० ते ४८ किलोपर्यंत उत्‍पादन निघते. मात्र बासमती १५०९ या वाणामुळे प्रति गुंठा ७५ किलोपर्यंत उत्‍पादन घेता आले. हे वाण १२० दिवसांत कापणी योग्‍य झाले. गेले चार दिवस कडक उन पडल्‍याने भात कापणीही वेगाने पूर्ण करता आली. पारंपरिक एक किलो तांदूळ शिजल्यानंतर त्‍याचा अडीच किलो भात होते. पण बासमती तांदूळ जास्त फुगत असल्‍याने साडेतीन किलो भात होतो. तसेच हा तांदुळ सुगंधी असल्‍याने हॉटेल व्यावसायिकांकडून त्‍याला मोठी मागणी आहे. मोठ्या शहरांबरोबरच स्थानिक बाजारपेठांमध्येही या तांदळाला मागणी आहे. त्‍यामुळे तरूणांनी बासमती भात लागवडीला प्राधान्य दिले तर अधिक उत्पन्नाची हमी असल्‍याचे प्रशांत गावडे म्‍हणाले.

Kokan
औंध शिक्षण मंडळाची दैदिप्यमान परंपरा जतन करू : अजित पवार

बारावीपर्यंत शिक्षण घेतल्‍यानंतर महावितरणमध्ये सेवा सुरू केली; मात्र लहानपणापासून शेतीची आवड आहे. तसेच शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोगही करत आहे. यंदा कणकवलीतील सावंत ऑर्गेनिक अॅग्रोचे विशाल सावंत यांनी दोन किलो बासमती भात बियाणे मोफत दिले होते. तसेच भात लागवडी बाबतचे मार्गदर्शनही त्‍यांनी केले. त्‍यामुळे वीस गुंठे क्षेत्रात बासमती लागवडीचा यशस्वी प्रयोग करता आला. चांगले उत्पादनही घेता आले. आता पुढील वर्षीही बासमती भातवाणाची एक एकर क्षेत्रात लागवड करण्याचा मानस असल्‍याचे श्री. गावडे म्‍हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com