टॅंकरमधील डिझेल पुन्हा टॅंकरमध्येच !; चिपळूण आगारातील प्रकार

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 August 2019

चिपळूण - टॅंकरमधून डिझेल उतरवताना चौथ्या कप्प्यातील डिझेल पुन्हा टॅंकरच्याच टाकीत जाईल, अशी करामत करून डिझेलमध्ये हेराफेरी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. ज्या हुशारीने तांत्रिक बदल करून डिझेलचा अपहार झाला, ते लक्षात घेता ही नियोजनबद्ध चोरी आहे. यामागे मोठे रॅकेट असण्याचीही शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. आगार व्यवस्थापकांच्या चाणाक्षपणामुळे चिपळुणात ही लबाडी उघड झाली. 

चिपळूण - टॅंकरमधून डिझेल उतरवताना चौथ्या कप्प्यातील डिझेल पुन्हा टॅंकरच्याच टाकीत जाईल, अशी करामत करून डिझेलमध्ये हेराफेरी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. ज्या हुशारीने तांत्रिक बदल करून डिझेलचा अपहार झाला, ते लक्षात घेता ही नियोजनबद्ध चोरी आहे. यामागे मोठे रॅकेट असण्याचीही शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. आगार व्यवस्थापकांच्या चाणाक्षपणामुळे चिपळुणात ही लबाडी उघड झाली. 

टॅंकर चालकाला आगार व्यवस्थापकांनी रंगेहाथ पकडल्यावर सुमारे 200 लिटर डिझेलच्या चोरीप्रकरणी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून, टॅंकर चालक मारुती लक्ष्मण कांबळे आणि मालक तुषार मोहन काळभोर या दोघांवर गुन्हा दाखल करून चालकाला अटक झाली. मात्र ही पद्धत वापरून आणखीही अपहार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. 
चिपळूण आगारासाठी मोबाईल एसएमएसद्वारे चिपळूण आगारातून सुमारे 12 हजार लिटर डिझेलची ऑर्डर देण्यात आली. रविवारी (ता. 18) आगारातील डिझेल संपले होते.

डिझेलची प्रतीक्षा आगार व्यवस्थापक संदीप पाटील करत होते. सायंकाळी 4 वाजता इंडियन ऑइल कंपनीचे डिझेल घेऊन व्यंकटेश ट्रान्सपोर्टचा टॅंकर चिपळूण आगारात दाखल झाला. मारुती लक्ष्मण कांबळे हा चालक टॅंकर घेऊन आला. टॅंकर येताच त्याची तपासणी करण्यात आली. कागदपत्रे तसेच टॅंकरच्या चार कप्प्यांमधील डिझेलचे मोजमाप घेण्यात आले. पाटील यांनी स्वतः नोंदी घेतल्या. टाकीत डिझेल घेताना दोन कप्पे नियोजित वेळेत रिकामे झाले.

तिसऱ्या कप्प्यातून डिझेल काढण्यास सुरवात होताच टॅंकर चालक थेट टॅंकरच्या केबिनमध्ये जाऊन बसला. त्याचवेळी डिझेलचा व्हॉल्व्ह कमी झाल्याचे आगार व्यवस्थापकांच्या लक्षात आले. संशय आल्याने त्यांनी चालकाला हटकले आणि व्हॉल्व्ह कमी झाल्याने जाब विचारला असता तो समर्पक उत्तर देऊ शकला नाही. टॅंकरच्या चौथ्या कप्प्यातून डिझेल खाली करण्यास सुरवात झाली, तेव्हा पुन्हा तोच प्रकार समोर आला. डिझेल टॅंकरच्याच टाकीत पडत असल्याचा स्पष्ट आवाज आल्याने पाटील यांचा संशय बळावला. आगार व्यवस्थापक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासणी केली, तेव्हा तांत्रिक बदलाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. डिझेलचा अपहार होत असल्याचे निदर्शनास येताच पाटील यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

चोरीची मोडस ऑपरेंडी 

टॅंकरच्या चौथ्या कप्प्याच्या खालील बाजूने एक पाईप काढण्यात आला असून त्याला इलेक्‍ट्रिक कोटिंग पाईपचे आवरण देऊन टॅंकरच्या वायरिंगमधून हा पाईप थेट टॅंकरच्या बॉनेटपर्यंत पोचवण्यात आला आहे. त्याला एक छोटा व्हॉल्व्हदेखील बसवला होता. हा व्हॉल्व्ह सुरू केला की चौथ्या कप्प्यातील डिझेल थेट टॅंकरच्या डिझेल टाकीत जाते. बाहेर कोणालाही त्याचा थांगपत्ता देखील लागणार नाही, अशी रचना येथे करण्यात आली आहे. हे सर्व आगार व्यवस्थापक पाटील यांनी शोधून काढताच डिझेल अपहार उघडकीस आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud in Diesel in Chiplun Depo