कुडाळ पोस्टातील अपहार कोटींच्या घरात जाण्याची शक्‍यता 

कुडाळ पोस्टातील अपहार कोटींच्या घरात जाण्याची शक्‍यता 

कुडाळ पोस्टात झालेल्या अपहाराचा आकडा कोटीच्या घरात जाण्याची शक्‍यता आहे. सुमारे 25 हजार खातेदार असल्यामुळे याची चौकशी पोस्टाच्या पारंपरिक गतीनुसार दीर्घकाळ चालण्याची शक्‍यता आहे. हा अपहार मोठा असला तरी पोस्टाविषयी सर्वसामान्यांच्या विश्‍वासाला गेलेला तडा त्यापेक्षा खूप मोठा आहे. जिल्ह्यात याआधीही कोनाळकट्टा पोस्ट कार्यालयात अपहार झाला होता; मात्र याचे स्वरूप त्यापेक्षा मोठे असण्याची शक्‍यता आहे. 
- अजय सावंत 

सिंधुदुर्गातील पोस्ट रचना 
पोस्ट यंत्रणा ब्रिटीश काळापासून आहे. सिंधुदुर्गातही स्वातंत्र्यापूर्वीपासून पोस्टाचे जाळे अस्तित्वात आहे. पूर्वी मालवणमध्ये पोस्टाचे पूर्ण मुख्यालय होते. आता ओरोसमध्ये प्रशासकीय मुख्यालय नेण्यात आले आहे. जिल्ह्यात पोस्ट कारभाराचे दोन विभाग आहेत. श्रेणी एक प्रकारातील मुख्यालय मालवणात तर श्रेणी दोन प्रकारातील मुख्यालय सावंतवाडीत आहे. या दोन्ही कार्यालयांना जिल्ह्यातील भाग वाटून दिलेले आहेत. तेथूनच पूर्ण कारभारावर नियंत्रण ठेवले जाते. जवळपास प्रत्येक गावांत पोस्टाचे कार्यालय आहे. तालुक्‍याच्या ठिकाणी मुख्य कार्यालय आहेत. कुडाळ हेही तालुक्‍याचे मुख्यालय आहे. त्यामुळे तेथे झालेल्या अपहाराची व्याप्ती खूप मोठी असण्याची शक्‍यता आहे. 

पोस्ट ते बॅंक 
पूर्वी पोस्टाचे प्रमुख काम टपालाची ने आण हे असायचे. संचार माध्यमाच्या वाढलेल्या प्रभावानंतर हे काम कमी झाले. त्यानंतर पोस्टाने बॅंकेप्रमाणे काम करण्याचे धोरण आखले. नवनव्या गुंतवणुकीच्या योजना आणल्या गेल्या. पोस्टाची एटीएम उभारली गेली. बॅंकांप्रमाणे चांगला व्याजदर देवून गुंतवणूक योजना राबवल्या जावू लागल्या. यासाठी एजंटचे जाळे निर्माण केले गेले. फार पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या पोस्टावर सर्वसामान्यांचा प्रचंड विश्‍वास असतो. यामुळे पोस्टाकडे ठेवींचे प्रमाणही चांगले असते. अलिकडे तर ग्रामिण भागातील पोस्ट कार्यालयातही संगणकीय यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली. 

कर्मचाऱ्यांची वानवा 
सिंधुदुर्गात गुंतवणूक विषयी पोस्टाच्या कामाची व्याप्ती वाढली; मात्र कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास सगळ्याच कार्यालयात क्षमतेच्या 40 ते 60 टक्‍के इतकीच आहे. यामुळे पोस्टाने ठरवून दिलेली उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी एजंटची संख्या वाढवण्याशिवाय पर्याय नसतो. अगदी पोस्ट कार्यालयात कमिशनवर काम करणारे एजंट सऱ्हास दिसतात. अशावेळी पूर्ण प्रक्रिया पार पाडून पैशाचे व्यवहार करणे कठिण बनते. यामुळे काही काळानंतर कर्मचारी एजंटवर विश्‍वास ठेवून यंत्रणा हाकायला सुरूवात करतात. यातूनच अपहाराचा जन्म होतो. कुडाळमध्येसुद्धा असेच झाले असावे, असे पोस्टातील काही निवृत्त कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

व्याप्ती का वाढते? 
पोस्टात सर्वसाधारणपणे पाच किंवा त्यापेक्षा जास्त मुदतीसाठी ठेवी ठेवल्या जातात. अगदी गुंतवणूकदार एजंटवर विश्‍वास ठेवून पैसे देतात. बऱ्याचदा ठेवीदाराच्या घरून पैसे ताब्यात घेतले जातात. कर्मचाऱ्यांची कमतरता आणि त्यांची टिपीकल सरकारी मानसीकतेमुळे ठेवीदार एजंटवर जास्त विश्‍वास ठेवतो. अशावेळी पाच वर्षासाठीच्या गुंतवणुकीत अपहार झाल्यास त्याच्या परिपक्‍तवतेच्या तारखेपर्यंत हा प्रकार उघड होत नाही. कोनाळकट्टा येथेही दीर्घकाळानंतर अपहार उघड झाला होता. कुडाळमधील प्रकारही 2015 पासूनचा आहे. 

कुडाळात नेमके काय घडले? 
येथील पोस्ट कार्यालयात पोस्टाच्या बनावट पासबुकचा वापर करून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. गेल्या दहा दिवसांपासून चौकशी सुरू आहे. सुरूवातीला तपासणी पथकाने 100 पासबुके तपासली होती. यात काही ठेवीदारांच्या पासबुकांची नोंद पोस्टाकडे नसल्याचे उघड झाले. त्यामुळे गांभिर्य लक्षात घेवून याचा अधिक खोल तपास सुरू झाला. यात 2015 पासून अनियमितता असल्याचे पुढे आले. 
आठ ते दहा दिवस पासबुक तपासणी प्रकिया सुरू आहे; मात्र याची गती अतिशय धिमी आहे. उपलब्ध माहितीनुसार, या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात 25 हजार पासबुके असून 24 जुलै पर्यंत फक्त 72 बुके तपासली गेली. यात काही बनावट पासबुके आढळली. याच गतीने तपासणी सुरू राहिल्यास एकूण अपहार उघड व्हायला बराच काळ लागण्याची शक्‍यता आहे. ही चौकशी करण्यासाठी पोस्ट कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी सध्या या पोस्ट कार्यालयात ठाण मांडून आहेत. हा अपहार पोस्टातील एजंटांकडून झाला आहे की कर्मचाऱ्यांकडून याची चौकशी सुरू आहे. ही चौकशी झाल्यावर याबाबत पोलिस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली जाणार आहे. पोस्ट कार्यालये सर्वसामान्य नागरिकांचा विश्‍वास असलेली एक संस्था आहे. यामध्ये आपली रक्कम डोळे बंद करून भरणा करावी आणि त्याचा असलेला लाभ घ्यावा म्हणून सर्वसामान्य नागरिक पोस्ट कार्यालयात पैसे भरतात; याचाच गैरफायदा घेवून हा अपहार झाल्याची शक्‍यता आहे. यात एजंटसह काही कर्मचारी सामिल असल्याचा संशय व्यक्‍त होत आहे. प्राथमिक चौकशीमध्ये संशयास्पद वाटलेल्या पासबुकांची माहिती घेतली जात आहे. या पासबुकामध्ये संगणकीय लिखापट नसून ती हाती लिहिलेली आहेत. त्यातील रकमेची नोंद पोस्टाकडे नाही. ही लिखापट कोणी केली याचाही तपास केला जात आहे. मुदत ठेव योजनेमध्ये अनेक ठेविदारांनी या ठेवी गुंतविलेल्या; मात्र याची नोंद पोस्ट कार्यालयाकडे नाही. त्यांना पोस्ट कार्यालयाचे पासबुक दिले आहे. हा अपहार साधारण 2015 पासून सुरू आहे. ही पासबुके पोस्टातून बाहेर गेली कशी? याची चौकशी सुद्धा केली जात आहे. या पासबुकावर असलेली सही तसेच हस्ताक्षर सुद्धा तपासली जाणार आहे. या अपहाराची रक्‍कम कोटीच्या घरात असण्याची शक्‍यता आहे. गेल्या दहा दिवसांत अनेक खातेदारांनी चौकशी समितीसमोर येऊन जबाब नोंदवले. अजून ठेविदारांनी या एजंटांना जवळ पैसे दिले असतील तर त्यांनी या चौकशी समितीसमोर यावे आणि जबाब नोंदवावा, असे आवाहनही केले आहे. अनेक ठेविदारांनी नोंदवलेल्या जबाबात या पोस्ट कार्यालयात असलेल्या एजंटांजवळ आपण रक्कमा दिल्याचे कबूल केले आहे. त्यांच्या या कबुली जबाबामुळे प्राथमिक तपासात तरी एजंट दोषी असल्याचे दिसून येत आहे. कारण एजंट जवळ दिलेले पैसे हे पोस्ट कार्यालयात भरले गेलेले नाहीत. पासबुकांवर एजंटांचे हस्ताक्षर तसेच सही सुद्धा केलेली आहे. त्यामुळे या प्रकरणात एजंटांनी रकमांचा वापर केला हे प्राथमिक तपासात पुढे येत आहे. सध्या एजंटमार्फतचे व्यवहार थांबवण्यात आले आहेत. या पोस्ट कार्यालयातील काही एजंट मंडळी पॅनकार्ड क्‍लबमध्ये सामिल होती. मध्यंतरी पॅनकार्ड क्‍लब बंद पडला आणि अनेक ठेविदारांनी एजंटांची घरे गाठली. या एजंटांच्या घरी जाऊन पैशाची मागणी केली आणि हे पैसे कुठून द्यावेत हा जेव्हा प्रश्‍न निर्माण झाला त्यावेळी एजंटांनी पोस्ट कार्यालयातील ठेविदारांचे पैसे त्या ठेविदारांना देण्यासाठी वापरले असावेत, अशी शक्‍यताही वर्तवण्यात येत आहे. या कार्यालयात 22 एजंट आहेत. त्यातील काही ठरावीक जणच संशयाच्या भोवऱ्यात आहेत. 

या आहेत शक्‍यता 
पोस्टाच्या यंत्रणेचा अनुभव असलेले निवृत्त पोस्ट कर्मचारी नकुल पार्सेकर यांनी या अपहाराबाबत काही शक्‍यता वर्तवल्या, त्या अशा ः कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे एजंटशी अपरिहार्य असे निर्माण झालेले विश्‍वासाचे नाते अशा अपहाराला जन्म घालते. आलेल्या पासबुकचे रेकॉर्ड व्यवस्थीत न ठेवल्यास अशा पासबुकचा गैरवापर शक्‍य आहे. बनावट पासबुक छापूनही, असे प्रकार घडू शकतात. 

एजंटांनी पोस्टाचा पैसा अन्य कुठे वापरला, कुठे गुंतवणूक केली, कोणाला दिले, याचीसुद्धा सखोल चौकशी होणे आवश्‍यक आहे. तपास चुकीच्या पद्धतीने होता कामा नये. गोरगरिबांचा पैसा गोरगरिबांना मिळालाच पाहिजे. आतापर्यंत 72 लाखांचा अपहार झाल्याचा संशय आहे. पोस्टाचे अधिकारी मिरजला असून त्यांच्याशी बोलणे झाले आहे. संशयितांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ठेविदारांपर्यंत पैसा मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालू राहिल. याबाबत पणजी येथे पोस्टाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी खासदार विनायक राऊत यांनी व मीही चर्चा केली आहे. 
- वैभव नाईक, आमदार 

पोस्ट कार्यालयात सर्वसामान्यांचा पैसा मोठ्या प्रमाणावर असतो. पोस्टावर विश्‍वास ठेवूनच गोरगरीबांनी याठिकाणी पैसे भरलेले आहेत. एजंट व कर्मचाऱ्यांच्या एकमेकांच्या संगनमताने असे जर व्यवहार होत असतील तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई होणे गरजेचे आहे. एवढे दिवस प्रकरण सुरू असताना सुद्धा या प्रकरणाची तक्रार पोलिस यंत्रणेकडे गेली नाही. यात एजंट तसेच काही कर्मचारीसुद्धा सहभागी असावेत, असा संशय आहे. 
- परशुराम उपरकर, माजी आमदार, मनसे 

कुडाळ पोस्टात काही गोष्टींत निष्काळजीपणा झाला आहे. याप्रकरणी सोमवारपर्यंतचा तपासणी अहवाल गोवा ऑफीसला पाठवून त्यांच्या परवानगीने संशयितांच्या विरोधात तक्रार पोलिस, गुन्हा अन्वेषण की सीबीआय, यापैकी कुणाकडे द्यायची? ते निश्‍चित केले जाईल. हा प्रकार लक्षात येताच येथील सर्व रेकॉर्ड सील केले आहेत. आता अतिरिक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांद्वारे तपास सुरू आहे. या सर्व प्रकारात पोस्टाचा कुणीही कर्मचारी आढळल्यास त्याच्यावर कारवाई होईल व पैसे रिकव्हर केले जातील. प्रसंगी कर्मचाऱ्यांसोबत एजंटावर एफआयआर दाखल केला जाईल; मात्र खातेदारांनी सहकार्य करून पोस्ट खात्याकडे अर्ज द्यावेत. 
- अनंत सरंगले, सहाय्यक अधिक्षक, सिंधुदुर्ग पोस्ट विभाग 

पोस्टाची सिस्टिम ब्रिटीश राजवटीत बनवलेली असून त्यात अपहाराला फारशी संधी नाही. सेव्हिंग बॅंक कंट्रोल ऑर्गनायझेशन (एसबीसीओ) या व्यवस्थेमार्फत यातील आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवले जाते. आर्थिक व्यवहारात संयुक्‍त जबाबदारी निश्‍चित केलेली असते. एका व्यवहाराला किमान तिघेजण जबाबदार असतात. असे असले तरी बहुसंख्य ठिकाणी कामाच्या गरजेच्या तुलनेत 40 टक्‍केच कर्मचारी आहेत. त्यामुळे कामाचा ताण आल्याने असे प्रकार घडू शकतात. कुडाळ हे मोठी व्याप्ती असलेले कार्यालय आहे. पोस्टाच्या प्रचलीत चौकशी पद्धतीनुसार या अपहाराची पूर्ण चौकशी व्हायला वेळ लागणार आहे. यामुळे चौकशीसाठी मोठे पथक आले तरच कमी काळात प्रक्रिया पूर्ण होईल. 
- नकुल पार्सेकर, निवृत्त पोस्ट कर्मचारी. 

दाम दुप्पटीच्या आशेपोटी सिंधुदुर्गात साखळी मार्केटिंगमध्ये पैसे गुंतवलेल्या अनेकांना जिल्ह्यात अशा संस्थांनी चुना लावला. सर्वसामान्यांचा पोस्टावर विश्‍वास आहे. या पोस्टातच अपहार होत आहे ही अतिशय धक्कादायक बाब आहे. यापूर्वी कोनाळकट्टा येथे मोठा भ्रष्टाचार झाला होता. त्याचा तपास सुरू आहे. कुडाळमधील अपहारमध्ये जे कोणी एजंट किंवा जो कोणी कर्मचारी अधिकारी दोषी असेल त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत सर्वसामान्य गरिबांचे पैसे पोस्टातून त्यांना मिळालेच पाहिजे. 
- सुनिल पवार, सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक 

पोस्टात सर्वसामान्य गरीब महिला, गरीब शेतकरी, मच्छी, भाजीविक्रेत्यांनी पैसे गुंतविले आहेत. आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांनी जमा केलेले पैसे आहेत. केंद्रातील या पोस्ट योजनेच्या विश्‍वासावर त्यांनी साठवून ठेवलेल्या पैशाचा अपहार करणे म्हणजे मनुष्यवधापेक्षाही मोठा गुन्हा आहे. या सर्वांचा पैसा मिळाला पाहिजे. दोषींवर कारवाई होईल त्यापेक्षा सर्वांचे पैसे मिळवून देण्यासाठी कार्यरत राहू. 
- संध्या तेरसे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष 

कुडाळ पोस्टाने गुंतवणूकदारांचा सर्व पैसा परत केला पाहिजे. जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. या प्रकरणाची कसून चौकशी होण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमावी, अशी मागणी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. 
- चारुदत्त देसाई, तालुकाध्यक्ष, भाजप 

ठेवीदाराने स्वतः पोस्टात भरलेल्या पैशाचाही अपहार झाला आहे. माझी पत्नी नयना यांनी स्वतः पोस्ट कार्यालयात मोठ्या प्रमाणात रक्कम जमा केली होती; मात्र ज्यावेळी पासबुक तपासण्यात आले तेव्हा भरलेल्यापैकी सहा लाख रुपये गायब झाल्याचे आढळले. त्यामुळे अपहारात पोस्ट कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे. 
- राजन नाईक, ठेविदार 

पोस्ट अपहारमध्ये सर्वांनी विश्‍वासाने मोठ्या प्रमाणात पैसे भरले. अपहारामध्ये एजंट व कर्मचाऱ्यांचे कनेक्‍शन आहे. तपासाअंती जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. ठेविदारांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत राहणार. 
- काका कुडाळकर, कॉंग्रेस प्रवक्ते 

पोस्टातील अपहारबाबत कोणीही राजकारण करू नये. गरिबांचे पैसे मिळाले पाहिजेत. या गरिबांसोबत पोस्टाच्या एकंदर कारभाराबाबत आम्ही शेवटपर्यंत यांच्या सोबत राहू. 
- ओंकार तेली, नगराध्यक्ष, कुडाळ  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com