दर्याला कोकणवासीयांची साद, काय मागीतलय मागणं? वाचा...

प्रशांत हिंदळेकर
Tuesday, 4 August 2020

बंदर जेटी किनारी जोरदार कोसळणाऱ्या भर पावसात उमेश नेरुरकर व काही व्यापारी, लोकप्रतिनिधी, नागरिक व पोलिसांच्या उपस्थितीत सागराला मानाचे श्रीफळ अर्पण करण्यात आले. 

मालवण (सिंधुदुर्ग) - शिवकालीन परंपरा लाभलेला येथील नारळी पौर्णिमेचा सण कोरोनाच्या सावटामुळे आज अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. किल्ले सिंधुदुर्गवरून मानाचे श्रीफळ सागरास अर्पण केल्यानंतर शहरातील काही मोजक्‍याच व्यापारी बांधव व नागरिकांच्या उपस्थितीत सागरास श्रीफळ अर्पण करण्यात आला. "कोरोना महामारीचे संकट लवकर दूर होऊ दे' असे साकडे यावेळी सागरास घालण्यात आले. 

किल्ले सिंधुदुर्ग वरून सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास सोन्याचे श्रीफळ अर्पण करून तोफ धडाडल्यानंतर मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते मानाच्या श्रीफळाचे पूजन करून ते सागराला अर्पण करण्यात आले. प्रशासनाने केलेल्या आवाहनाला मालवणवासीयांनी प्रतिसाद देत सागराला श्रीफळ अर्पण करण्यासाठी बंदर जेटीच्या किनाऱ्यावर कोणतीही गर्दी न करता घरापासून जवळ असणाऱ्या किनाऱ्यावर जात श्रीफळ अर्पण केल्याचे दिसून आले. 

वाचा - कैदी राजेश गावकर प्रकरण; कारागृह अधीक्षकाला नागपूर पोलिसांना घेतले ताब्यात; मात्र सुभेदार फरार 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून रूढी परंपरेनुसार चालत आलेल्या मालवणच्या नारळी पौर्णिमा उत्सवाला ऐतिहासिक महत्व प्राप्त आहे. मालवण बंदर जेटीवर हजारो लोकांच्या उपस्थितीत साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाचे स्वरूप अलीकडच्या काही वर्षात अधिक व्यापक बनले होते. सागराला श्रीफळ अर्पण करण्याबरोबरच विविध मंडळाच्या नारळ लढविणे स्पर्धा, कबड्डी स्पर्धा व सामाजिक उपक्रम आदींमुळे हा उत्सव फुलत जात होता. मात्र यावर्षी कोरोना महामारीमुळे हा नारळी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यावर अनेक बंधने आली.

यावर्षी हा उत्सव गर्दी न करता साधेपणाने साजरा करावा तालुका दक्षता समितीच्या बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले होते. दरवर्षी उत्सवाला होणारी गर्दी लक्षात घेता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्सवाला बंदर जेटीवर गर्दी करू नये, तसेच नागरिकांनी आपल्या घराजवळच्या किनाऱ्यावर सागराला श्रीफळ अर्पण करावे असे आवाहन तहसीलदार अजय पाटणे तसेच नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले होते. यासाठी बंदर जेटीवर दुपारपासूनच पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

हेही वाचा - दुर्दैवी! आयुष्याच्या परीक्षेत नापास विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण 

यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष नितीन तायशेटे, अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक नितीन वाळके, रवी तळाशीलकर, नाना पारकर, सुहास ओरसकर, गणेश प्रभुलीकर, प्रमोद ओरसकर, विजय केनवडेकर, महेश अंधारी, अरविंद सराफ, हर्षल बांदेकर, अजय शिंदे, परशुराम पाटकर, अरविंद मोंडकर, सरदार ताजर, ऍड. अमृता मोंडकर आदी उपस्थित होते. यावेळी महेश ऊर्फ डुबा गिरकर यांना व्यापारी बांधवांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

सागराला मानाचे श्रीफळ 
सागराला श्रीफळ अर्पण करण्यासाठी दुपारी पावणे चारच्या सुमारास बाजारपेठ मार्गे काही मोजके व्यापारी बांधव बंदर जेटी किनारी एकत्र जमले. यावेळी पुरोहितांच्या उपस्थितीत मानाच्या श्रीफळाचे व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. चार वाजण्याच्या सुमारास किल्ले सिंधुदुर्गवरून शिवकालीन परंपरेनुसार सोन्याचा सागराला अर्पण करून तोफ धडाडून त्याची वर्दी मालवणवासीयांना देण्यात आली. त्यानंतर बंदर जेटी किनारी जोरदार कोसळणाऱ्या भर पावसात उमेश नेरुरकर व काही व्यापारी, लोकप्रतिनिधी, नागरिक व पोलिसांच्या उपस्थितीत सागराला मानाचे श्रीफळ अर्पण करण्यात आले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Full moon celebration in Konkan sindhudurg