कोरोनाच्या संकटातही युवकांच्या धाडसाचे, माणुसकीचे घडले दर्शन

नेत्रा पावसकर
Saturday, 29 August 2020

देसाई यांचा कोरोना अहवाल आज मिळणे शक्‍य नसल्याने अनेक प्रश्‍न होते. कोरोना अहवाल येण्याआधीच मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करणार कसे? ही अडचण होती.

तळेरे (सिंधुदुर्ग) - स्वॅब टेस्टचा रिपोर्ट येण्याआधीच वैद्यकीय उपचारादरम्यान निधन झालेल्या तळेरेतील वृद्धावर धाडसाने अंत्यसंस्कार करून काही युवकांनी माणुसकीचे दर्शन घडविले. कणकवली पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पीपीई किट परिधान करून सर्व नियमांचे पालन करुन अंत्यविधी पार पाडले. 

अधिक माहिती अशी, की तळेरे गावठण येथील राजाराम देसाई (वय 68) यांना मंगळवारी (ता.25) श्‍वासाचा त्रास होऊ लागल्याने ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथे कोरोना टेस्टसाठी स्वॅब घेऊन पुढील उपचार सुरू झाले; परंतु स्वॅब टेस्टचा अहवाल येण्यापूर्वीच बुधवारी (ता.26) सकाळी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. 

देसाई यांचा मृत्यू झाल्याचे समजताच पंचायत समिती सभापती तळेकर यांनी तत्काळ ओरोस येथे धाव घेतली. देसाई यांचा कोरोना अहवाल आज मिळणे शक्‍य नसल्याने अनेक प्रश्‍न होते. कोरोना अहवाल येण्याआधीच मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करणार कसे? ही अडचण होती.

सभापती तळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाडसाने पीपीई किट परिधान करुन देसाई यांच्यावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. यावेळी देसाई यांचा मुलगा, काही नातेवाईक, प्रसाद कल्याणकर, प्रदिप तळेकर, प्रफुल तळेकर उपस्थित होते. कै. देसाई यांचा अहवाल यथावकाश पॉझिटिव्ह अथवा निगेटिव्ह येईल; परंतु कोरोना रिपोर्ट यायचा असतानाही दिलीप तळेकर आणि सहकार्यांनी स्वतःचा जीव धोक्‍यात घालून दाखवलेले माणुसकीचे दर्शन नक्कीच कौतुकास्पद आहे.  

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: funeral by youth on corona patient talere konkan sindhudurg