गद्रे - सावरकर भेटीचा काय आहे इतिहास ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gadre Savarkar Meeting Drawing Completed Ratnagiri Marathi News

देवरुखचे अनंत हरी गद्रे यांनी अस्पृश्‍यता निवारणाचे महत्वपूर्ण काम केले. या काळात स्वा. विनायक दामोदर सावरकर यांची त्यांनी भेट घेतली होती. रत्नागिरीच्या पतितपावन मंदिरात समतानंद गद्रे उपस्थित होते.

गद्रे - सावरकर भेटीचा काय आहे इतिहास ?

साडवली ( रत्नागिरी) - देवरूख शिक्षण प्रसारक मंडळामार्फत सदानंद भागवत यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मृती मंदिर उभारणीचे काम सुरू आहे. सावरकरांच्या जीवनातील प्रमुख क्षण कॅन्व्हॉसवर रेखाटले जावू लागले आहेत. यातील दुसरे चित्र तयार झाले आहे. देवरुखचे अनंत हरी उर्फ समतानंद गद्रे व सावरकर यांच्या भेटीचे चित्र चित्रकार दिंगबर मांडवकर यांनी तयार केले आहे. 

हेही वाचा - प्राथमिक शिक्षक भारतीचे 8 ला मुंबई येथे अधिवेशन

देवरुखचे अनंत हरी गद्रे यांनी अस्पृश्‍यता निवारणाचे महत्वपूर्ण काम केले. या काळात स्वा. विनायक दामोदर सावरकर यांची त्यांनी भेट घेतली होती. रत्नागिरीच्या पतितपावन मंदिरात समतानंद गद्रे उपस्थित होते. समाजप्रबोधनाच्या कार्यक्रमात समतानंद व सावरकर एकत्र आले होते असे छायाचित्र प्रसिद्ध आहे. याच छायाचित्रावरुन हे चित्र सदानंद भागवत यांनी स्मृतीमंदिरासाठी निवडले. देवरुख न्यू इंग्लिश स्कूलचे कलाशिक्षक दिंगबर मांडवकर यांनी ते हुबेहूब कॅन्व्हॉसवर चितारले आहे. 4.5 बाय 3 फूट असा त्याचा आकार आहे. 

अनंत हरी उर्फ समतानंद गद्रे हे देवरुखचे. नाटककार, जाहिरातकार, वृत्तपत्रकार, समाजसेवक अशी त्यांची विविध अंगे आहेत. संदेश दैनिकासाठी लोकमान्य टिळकांसोबत राहून चार वर्षे दौऱ्यातील वृत्तांत समतानंदानी छापला. स्वा. सावरकर यांच्या प्रभावाखाली येऊन काही वर्षे समतानंदांनी हिंदू महासभेचे कामही केले आहे. झुणका भाकर चळवळीत आचार्य अत्रे व सत्यवादीचे बाळासाहेब पाटील हेही समतानंदांबरोबर होते. 1890 चा जन्म व 1967 साली मृत्यू असा समतानंदांचा कार्यकाल आहे. देवरुखमधील सावरकर स्मृतीमंदिरातील हे चित्र अनंत हरी गद्रे यांचाही इतिहास सांगणारे चित्र ठरणार आहे. 

गाडगेबाबाही गद्रे यांच्या घरी आले होते 

अस्पृश्‍यता निवारणासाठी संत गाडगेबाबांच्या प्रभावाने देवरूख येथे सत्यनारायणाची पूजा घातली व या पूजेसाठी हरिजन जोडपे बसवले व प्रसाद म्हणून झुणका भाकर वाटली. असे 101 सत्यनारायण त्यांनी विविध ठिकाणी घातले. 1935 ते 1940 चा हा काळ होता. गाडगेबाबा महाराज देवरूख येथे गद्रे यांच्या घरी येऊन गेल्याची नोंद व छायाचित्रही उपलब्ध आहे.