सिंधुदुर्गात शनिवारी आशा-निराशेचा खेळ कायम...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

शनिवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालात नव्याने 7 व्यक्तीना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालात नव्याने 7 व्यक्तीना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. शुक्रवारी रात्री 6 बाधित सापडले होते.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 242 झाली आहे. तर सक्रिय रुग्णाची संख्या 63 वरुन 70 झाली आहे. जिल्ह्यात आज आणखी 12 जणांनी कोरोनावर मात केली. त्या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत 166 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. 

दरम्यान, शुक्रवारी (ता. 3) रात्री उशिरा सापडलेले रुग्ण कणकवली, देवगड आणि कुडाळ तालुक्‍यातील आहेत. यात कणकवली तालुक्‍यातील ओझरम येथील एक, देवगड तालुक्‍यातील देवगड शहरातील दोन व आंबेरी येथील एक आहेत. कुडाळ तालुक्‍यातील पाट येथील दोन रुग्ण असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली. नव्याने सहा रुग्ण सापडले असले तरी कणकवली येथील "त्या' व्यक्तीच्या संपर्कातील नाहीत. त्यामुळे कणकवली येथील त्या बाधित व्यक्तीमुळे रुग्ण वाढण्याची संख्या स्थिरावली आहे. 

जिल्हा कोरोना तपासणी केंद्राला नव्याने 54 कोरोना तपासणी अहवाल प्राप्त झाल्याने आतापर्यंत तपासणीसाठी घेण्यात आलेल्या अहवालांची संख्या 4 हजार 75 झाली आहे. यातील आतापर्यंत 4 हजार अहवाल प्राप्त झाले आहेत. यातील 235 अहवाल बाधित आले आहेत. तर 3 हजार 765 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बाधित 235 पैकी 166 उपचार घेऊन बरे झाल्याने घरी परतले आहेत. 5 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. एक व्यक्ती उपचारासाठी मुंबई येथे गेली आहे. परिणामी जिल्ह्यात आता 63 रुग्ण सक्रिय राहिले आहेत. 

जिल्ह्याच्या आयसोलेशन कक्षात उपचार घेत असलेले 10 जण घरी गेल्याने आता येथे 95 रुग्ण उपचार घेत आहेत. डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल असलेल्या जिल्हा रुग्णालयात सध्या 31 कोरोनाबाधित आणि 30 कोरोना संशयित उपचार घेत आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 21 कोरोनाबाधित आणि 2 कोरोना संशयित उपचार घेत आहेत. तर कोविड केअर सेंटरमध्ये 11 कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याच्या आरोग्य पथकाकडून आज 2 हजार 22 व्यक्तींची तपासणी केली. यातील कोणालाही कोरोना लक्षण आढळले नसल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले. संस्थात्मक क्वारंटाइनमधील 252 व्यक्ती घरी परतल्या. त्यामुळे येथे 16 हजार 155 व्यक्ती दाखल आहेत. शासकीय संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये 3 व्यक्ती वाढल्याने येथील संख्या 32 झाली आहे. गाव पातळीवरील संस्थात्मक क्वारंटाइनमधील 255 व्यक्ती घरी गेल्या. त्यामुळे येथे दाखल व्यक्ती 13 हजार 675 राहिल्या आहेत. नागरी क्षेत्राची संख्या 2 हजार 448 एवढीच राहिली आहे. 

कुडाळ, देवगडमध्ये नव्याने चार झोन 
कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात देवगड तालुक्‍यात शिरगाव अनभवणेवाडी, कुडाळ तालुक्‍यात पाट मडवळवाडी, पिंगुळी गोंधळपूर व मुस्लिमवाडी असे नव्याने चार कन्टेन्मेंट झोन तयार केले आहेत. तेथे निश्‍चित झोनमध्ये सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे-जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A game of hope and despair continues in Sindhudurg on Saturday ...