एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत असताना `या` कुटुंबाचे कार्य प्रेरणादायीच

रुपेश हिराप
Friday, 28 August 2020

एकत्र कुटुंब पद्धती काळाच्या ओघात लोप पावत असताना सोनुर्ली येथील गावकर कुटुुंबियांनी मात्र ही परंपरा राखली आहे. सोनुर्ली येथील बारा पाच गावकर कुटुुंबियांचा मानाचा गणपती सोनुर्लीतील श्रद्धास्थान आहे.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - शेकडो वर्षांची परंपरा लाभलेला सोनुर्ली येथील बारा पाच अर्थात गावकर कुटुंबियांच्या मानाच्या गणपतीचे दरवर्षी श्रद्धापूर्वक पूजन केले जाते. दोनशेहून अधिक कुटुंबिय एकत्रितरित्या या गणपतीची स्थापना परंपरेप्रमाणे कित्येक वर्षांपासून करीत आले आहेत. दरवर्षी 8 फूट उंचीची आकर्षक गणेशमूर्ती सोनुर्लीतच नव्हे तर पंचक्रोशी व सावंतवाडी तालुक्‍यातही आकर्षण ठरत आहे. 

एकत्र कुटुंब पद्धती काळाच्या ओघात लोप पावत असताना सोनुर्ली येथील गावकर कुटुुंबियांनी मात्र ही परंपरा राखली आहे. सोनुर्ली येथील बारा पाच गावकर कुटुुंबियांचा मानाचा गणपती सोनुर्लीतील श्रद्धास्थान आहे. या गणपतीची 8 फूट उंचीची महाकाय गणेशमुर्ती आकर्षक असते. गणेश मुर्ती घडविण्याबरोबरच रंगकाम परंपरेप्रमाणे गावकर कुटुंबियांकडूनच केले जाते. यानंतर एकत्रितरित्या गणेश चतुर्थीदिवशी महापुजेने या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते. 

या महाकाय मुर्तीसाठी खास मुंबईतून चाकरमानी गणेशभक्त दागिने घेऊन येतात; मात्र कोरोनामुळे काही चाकरमानी गावी येऊ शकले नाही. तरीही दरवर्षी प्रमाणेच मुर्तीची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. कर्णकुंडले व इतर दागिनेही मुर्तीची शोभा वाढवितात. सर्व कुटुंबियांकडून या मुर्तीची पुजा नित्यनेमाने केली जाते. दरदिवशी मुख्य पुजेचा मान एका एका कुटुुंबाला दिला जातो. गणेश चतुर्थीच्या पहील्या व शेवटच्या दिवशी प्रत्येक कुटुंबियांकडून शिजविलेला प्रसाद गणपतीला दाखवुन एकत्रितपणे त्याचे सहभोजन होते. इतर दिवशी प्रत्येक कुटुंब गणपतीला नैवद्य आणुन दाखवितात. 

आनंदाला उधाणच 
गावकर कुटुंबिय गणेशासमोर सुंदर अशी आरासही करतात. दरवर्षी गणपतीसमोर हलता देखावा साकारला जातो; मात्र यावर्षी कोरोनामुळे हलता देखावा न करता साधेपणाने त्याच उत्साहात गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. मानाच्या या गणपतीला जिल्हाभरातुन भाविक तसेच राजकीय, सामाजिक पुढारी दरवर्षी भेटी देतात. या गणपतीसमोर दरवर्षी दहाव्या दिवशी सत्यनारायण पूजा होते. यानंतर अनंत चतुदर्शीला विधिवत धुमधडाक्‍यात मूर्तीचे विसर्जन केले जाते. बारा पाच कुटुंबियांचा गणेशोत्सव म्हणजे लहान थोरांच्या आनंदाला पार नसतो. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh festival celebration of more than two hundred people