प्रेरणादायी! श्रद्धेला इच्छाशक्तीची जोड, चिमुकल्याच्या कलेची वाहव्वा

Ganesh idol made by eight year old boy malgao konkan sindhudurg
Ganesh idol made by eight year old boy malgao konkan sindhudurg

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - आवड आणि प्रचंड इच्छाशक्ती असेल तर अपयश यशातही परावर्तीत होते. त्याच इच्छा शक्तीला भक्तीची जोड असेल तर कोणत्याही अडथळ्याविना उद्देश साध्य होतोच. असाच श्रद्धा आणि इच्छा शक्तीचा संगम मळगाव येथे आठ वर्षाच्या मुलामध्ये पहावयास मिळाला. मूर्तिकलेच्या प्रचंड आवडीने साच्याचा वापर न करता त्याने हस्तकौशल्यातून गणेश मूर्ती घडवून प्रथमच घरात पूजन केले. 

आपल्याही घरात गणरायाचे आगमन व्हावे व चतुर्थी सण साजरा व्हावा, या भक्तीने अंध असलेल्या या मुलाने आपली इच्छापूर्ती केली. हस्तकौशल्याचा वापर करून मूर्ती घडविणारा हा मुलगा मळगाव येथील जोशी मांजरेकरवाडीमधील असून रितेश उल्हास मांजरेकर, असे त्याचे नाव आहे. त्याची गणरायाविषयी असलेली आवड पाहून मूर्ती कौशल्याला अनेकांनी दाद दिली.

शेजारी व इतर मित्रांच्या घरात श्री गणपतीची मूर्ती स्थापन करण्यात येते. आनंदोत्सव साजरा होतो. असाच आनंदोत्सव गणपतीची मूर्ती आपल्या घरात स्थापित करून साजरा करावा, अशी इच्छा रितेशची होती. त्याचे कुटुंबीय चार-पाच वर्षांपूर्वी रत्नागिरीहून मळगावात आले. लहानपणापासूनच त्याने कोकणातील गणेशोत्सव पाहिला होता. गणपती बाप्पाची प्रचंड आवड तेवढीच श्रद्धा या भावनेतूनच रितेशने श्री गणेशाची मूर्ती घडवून ती स्वतः घरात पूजन करण्याचे ठरविले. त्याच्या कुटुंबीयांना हे सर्व अचंबित करणारे होते; मात्र म्हणतात ना इच्छाशक्ती आणि काहीतरी करण्याची मनोभावे आवड असली, की कोणतीही गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. तसेच जणू काही घडले. 

रितेशने शेजारच्या दिगंबर राऊळ यांच्या गणपती शाळेतून माती आणली. राऊळ यांनी माती कशासाठी अशी विचारणा केली असता रितेशने इच्छा बोलून दाखविली. रितेशची आवड व श्री गणपती बाप्पा विषयी असलेली श्रद्धा पाहून राऊळ यांनीही त्याला प्रोत्साहन दिले. आणि गणेशोत्सव चतुर्थी सणापूर्वी त्याने मूर्ती घडविण्याच्या कामास सुरुवात केली. 

विशेष करून रितेशने कोणत्याही प्रकारच्या साच्याचा वापर न करता व कोणाचीही मदत न घेता अत्यंत कलाकुसरीने अर्ध्या फुटाची सुंदर मूर्ती घडविली. स्वहस्ते उत्कृष्ट रंगकामही केले. आता त्या मूर्तीचे पूजन करण्याचा हट्ट त्याने वडिलांकडे धरला. त्याच्या हट्टापुढे कोणाचेही चालले नाही. रितेशचे वडील वेल्डिंग व्यवसाय करतात; मात्र लॉकडाउनमध्ये त्यांनाही मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला होता. त्यातच श्री गणेश मूर्ती घरात स्थापन करण्याचा मुलाचा हट्ट, अन्‌ मुलाची श्रीगणेशाप्रती असलेली श्रद्धा पाहून बाबांनीही त्याला प्रोत्साहन दिले. आनंदीत असलेल्या रितेशने स्वतः जमवलेल्या पैशातून मूर्ती आकर्षक वाटावी, यासाठी विविध खडे व रंग साहित्य विकत घेतले. आणि मूर्ती रंगकाम व सजावट पूर्ण केली. रितेशने हस्त कौशल्यातून तयार केलेली मूर्ती व प्रथमच घरात केलेले पूजन पाहून परिसरात त्याची प्रशंसा झाली. 

कलेला प्रोत्साहन देण्याचा मानस 
रितेशने बनवलेल्या मूर्तीची पाहणी करण्यासाठी आणि बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी अनेकजण दाखल झाले होते. अवघ्या आठ वर्षाच्या रितेशने सातवीपर्यंत केंद्रशाळा मळगाव येथे शिक्षण पूर्ण केले असून आठवी शिक्षणासाठी त्याने मळगाव इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश मिळविला आहे. त्याला एक भाऊ व एक बहीण आहे. रितेशला लहानपणापासूनच चित्रकलेची खूप आवड आहे. इतर मुलांपेक्षा त्याचे चित्रकला व रंगकाम सुंदर आहे. या कलेचा वापर त्याने मूर्ती घडविण्यासाठी केला. भविष्यात या कलेला प्रोत्साहन देण्याचा त्याचा मानस आहे. 

गणपती बाप्पावर माझी श्रद्धा आहे. आणि कलेची आवडही, श्री देव गणपती ही विद्येची देवता आहे. बाप्पामुळेच मला मूर्ती घडवून स्थापन करण्याची इच्छा झाली. 
-रितेश मांजरेकर, बाल मूर्तीकार 

माझा मुलगा चांगला चित्रकार आहे. त्याच्या कलेला वाव मिळाला तर नक्कीच तो एक चांगला चित्रकार बनू शकतो. त्याच्या मूर्ती आणि चित्र कलेला आमच्या कुटुंबियांचा पाठिंबा कायम आहे. 
- उल्हास मांजरेकर, रितेशचे वडील

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com