देवरूखातील गणेशमूर्ती स्वित्झर्लंडला रवाना 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

देवरूख - शहरातील सुप्रसिद्ध मूर्तीकार अप्पा साळसकर यांच्या गणेशमूर्तीशाळेत तयार झालेली सुबक गणेशमूर्ती स्वित्झर्लंडला रवाना झाली आहे. मूळचे रत्नागिरीतील असलेल्या अभ्यंकर कुटुंबीयांनी भारतात आल्यानंतर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी ही मूर्ती भारतातून नेली आहे. 

देवरूख - शहरातील सुप्रसिद्ध मूर्तीकार अप्पा साळसकर यांच्या गणेशमूर्तीशाळेत तयार झालेली सुबक गणेशमूर्ती स्वित्झर्लंडला रवाना झाली आहे. मूळचे रत्नागिरीतील असलेल्या अभ्यंकर कुटुंबीयांनी भारतात आल्यानंतर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी ही मूर्ती भारतातून नेली आहे. 

मूळचे रत्नागिरीतील असलेले वैभव अभ्यंकर यांचे कुटुंब गेली 22 वर्षे स्वित्झर्लंडमध्ये वास्तव्यास आहे. तेथे त्यांचा व्यवसाय आहे. गणपती बाप्पावर या कुटुंबीयांची नितांत श्रध्दा असल्याने हे कुटुंब गेले 11 वर्षे स्वित्झर्लंडमध्ये गणेशोत्सव साजरा करतात. स्वित्झर्लंडमधील फ्रावेनफेल्ड शहरात हे कुटुंब वास्तव्यास आहे. अभ्यंकर कुटुंबीय दरवर्षी भारतात येतात. मात्र, परत जाताना शाडुच्या मातीपासून बनवलेली गणेशाची सुबक मूर्ती आपल्या सोबत घेऊन जातात.

वैभव यांच्या पत्नी गौरी या देवरूखच्या. परदेशातून रत्नागिरीत आल्यानंतर गौरी काही दिवस माहेरी आल्या होत्या. गणेशोत्सव दोन महिन्यांवर येऊन ठेपल्याने त्यांनी देवरूखातील प्रसिद्ध मूर्तीकार अप्पा साळसकर यांच्या मूर्तीशाळेला भेट दिली. तयार मूर्तींमधील शाडुच्या मातीत बनलेली मोरावर आरूढ झालेली सुबक गणेशमूर्ती त्यांनी खरेदी केली.

हीच मूर्ती आता स्वित्झर्लंडमध्ये भाद्रपद शुद्ध चतुर्थीला अभ्यंकर कुटुंबीयांच्या निवासस्थानी विराजमान होणार आहे. अप्पा साळसकर गेली 40 पेक्षा अधिक वर्षे गणेशमूर्ती साकारण्याचा व्यवसाय करीत आहेत. यापूर्वी एकदा अभ्यंकर कुटुंबीयांनी त्यांच्याकडून मूर्ती परदेशात नेली होती.

गतवर्षी प्रसाद सावंत नामक भक्‍ताने अप्पांकडील मूर्ती दुबईत नेत तिथे उत्सव साजरा केला होता. आता अप्पांची सुबक मूर्ती तिसऱ्यांदा सातासमुद्रापार निघाली आहे. अभ्यंकर कुटुंबीय 2 सप्टेंबरला या मूर्तीची विधीवत प्रतिष्ठापना करून 5 दिवस हा उत्सव साजरा करणार आहेत. 7 सप्टेंबरला ते विसर्जन करणार आहेत. 

तो आनंद चांदीच्या मूर्तीपासून मिळत नाही 
शाडुच्या मातीपासून बनविलेल्या मूर्तीचा उत्सवात जो आनंद मिळतो, तो चांदीच्या मूर्तीपासून मिळत नाही. त्यामुळेच आम्ही दरवर्षी भारतात आलो की, शाडुची गणेशमूर्ती तिकडे नेतो, असे गौरी यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh idols export to Switzerland from Devrukh