esakal | डोली-पालखीत विराजमान होऊन रत्नागिरी,सिंधुदुर्गात बाप्पाचे आगमन
sakal

बोलून बातमी शोधा

Mandangad

गावांच्या आणि घरांच्या प्रथांनुसार सकाळपासूनच श्रींच्या मूर्ती वाजत-गाजत, डोली-पालखीतून घरात आणण्यात आल्या.

डोली-पालखीत विराजमान होऊन रत्नागिरी,सिंधुदुर्गात बाप्पाचे आगमन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : विघ्नहर्त्याच्या आगमनप्रसंगी पावसाचे सावट दूर झाले आणि गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील कोरोनाचे बाधितही कमी होऊ लागल्यामुळे गणेशोत्सवाच्या उत्साहात भर पडली आहे. चाकरमानी गावात दाखल झाले असून शुक्रवारी (ता. १०) गणेशचतुर्थीच्या दिवशी जिल्ह्यात ११४ सार्वजनिक व १, ६६, ५३९ खासगी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे.

गणेशोत्सवापूर्वी कोकणाला मुसळधार पावसाने झोडपून काढले; मात्र गुरुवारी पावसाने पूर्णतः विश्रांती घेतल्यामुळे उत्सवाच्या तयारीला गणेश भक्तांना जोर आला होता. दिवसभर कडकडीत ऊन पडल्यामुळे बाजारपेठाही फुलून गेल्या होत्या. गणेश आगमनाच्या तयारीसाठी रत्नागिरी, चिपळूणमधील मुख्य बाजारपेठांमध्ये गणेशभक्तांनी फुलून गेली होती. गुरुवारी अगदी पारंपरिक पद्धतीने बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणेशमूर्ती घरोघरी नेण्यात येत होत्या. कोरोनाची तिसरी लाट गणेशोत्सवानंतर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्यामुळे प्रशासनाकडून शक्य तेवढी सतर्कता बाळगण्यासाठी आवाहन केले जात आहे.

गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर अत्यावश्यक करण्यात येत आहे. बाहेरुन गावात आलेल्या लोकांची चाचणी करण्यासह कोरोना बाधितांना शोधून काढण्याची मोहीम हाती घेतली जात आहे. ही जबाबदारी ग्रामकृतीदलांवर सोपवण्यात आली आहे. गावागावांत गणपती आगमनाची तयारी जोरात सुरू आहे. घराघरांत गणपतीची गाणी ऐकायला मिळत होती. गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी मकर बनविण्यात येत आहेत. यंदा थर्माकोलपेक्षाही अन्य साहित्यांचा वापर अधिक होत आहे. काही ठिकाणी कोरोनातील परिस्थितीवर आधारित देखावे तयार करण्यात आले आहेत. कोकणात घरगुती उत्सव मोठ्याप्रमाणात साजरा केला जात असल्यामुळे मंगलमय वातावरण गावागावांत पहायला मिळत आहे.

रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक

जिल्ह्यात १,६६,५३९ खासगी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यात रत्नागिरी शहरात ७,९११, ग्रामीण भागात ९ हजार ४३९, जयगड परिसरात २८०१ संगमेश्वर १३,५६४, राजापूर १९,९००, नाटे ७,३६५, लांजा १३,५४०, देवरूख १२,४९३, सावर्डे १०,२४०, चिपळूण १६,४६४, गुहागर १४,४६०, अलोरे ५ हजार ६५०, खेड १३,७२५, दापोली ६३३६, मंडणगड ४३८९, बाणकोटमध्ये ७६०, पूर्णगडमध्ये ५६७५ खासगी आणि दाभोळमध्ये १ हजार ८७५ खासगी गणेशोत्सवाची प्रतिष्ठापना होणार आहे.

चाकरमान्यांचा ओघ; ६८ हजार घरगुती, ३५ सार्वजनिक मूर्ती

सिंधुदुर्गनगरी : सुखकर्ता, बुद्धीदाता गणरायांच्या स्वागतासाठी सिंधुदुर्गवासीय सज्‍ज झाले आहेत. यंदा जिल्ह्यात ६८ हजार ३१३ घरगुती, तर ३२ ठिकाणच्या सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. त्‍यासाठी घराघरांतून जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. उद्या (ता.१०) सायंकाळी उशिरापर्यंत रेल्‍वे, एसटी बस, खासगी बस, तसेच इतर वाहनांतून चाकरमान्यांचा गावोगावी ओघ सुरूच राहणार आहे.

गणराय आगमनाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील घराघरांत आरास मांडणीची लगबग, तर सार्वजनिक मंडळांच्या मांडवांमध्ये मिरवणूक तयारीसाठीची धावपळ सुरू होती. विविध गावांच्या आणि घरांच्या प्रथांनुसार सकाळपासूनच श्रींच्या मूर्ती वाजत-गाजत, डोली-पालखीतून घरात आणण्यात आल्या. आज मूर्तींचे विधीवत पूजन होणार आहे. गतवर्षी कोरोना संसर्गामुळे चाकरमान्यांना गावी येता आले नव्हते. एसटी, रेल्‍वे सेवाही बंद होत्या. यंदा मात्र निर्बंध कमी झाल्‍याने गणेशोत्‍सव दणक्‍यात साजरा करण्यासाठी चाकरमानी गावी पोचले आहेत. सुमारे चार लाखांपर्यंत चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. जिल्ह्यात यंदा ६८ हजार ३१३ घरांमध्ये श्रीगणराय विराजमान होणार आहेत. कुडाळच्या सिंधुदुर्ग राजासह ३२ ठिकाणी सार्वजनिक मंडळांमध्ये थाटामाटात गणेशोत्सवाचा प्रारंभ होत आहे. गणेशोत्सव शांततेत पार पडावा, त्यादृष्टीने आरोग्य आणि पोलिस प्रशासन सज्ज आहे. ठिकठिकाणी बंदोबस्त आहे. आरोग्य विभागामार्फत चाकरमान्यांसाठी गावागावांत तपासणी सुरू आहे. जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असला तरी जिल्ह्याबाहेरून आलेल्यांमुळे संसर्गात पुन्हा वाढ होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे.

दरम्‍यान, गणरायांच्या पूजनासाठी माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक यांसह मुंबईतील नगरसेवक, विविध पक्षांची राजकीय नेतेमंडळीं आज सायंकाळीच आपआपल्या शहर आणि गावांमध्ये पोहोचली आहेत. गणरायांच्या स्वागत वाहतूक कोंडीचे विघ्न राहू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने राष्ट्रीय महामार्ग आणि सर्वच शहरांत जादा बंदोबस्त तैनात केला आहे. अपघातामुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठीही व्यवस्था तैनात केली आहे. कोकण रेल्वे प्रशासनानेही गस्त वाढविली आहे. सर्व स्थानकातही बंदोबस्त आहे. मडगाव आणि रत्नागिरी येथे नियंत्रण केंद्र उभारले आहे. कोरोनामुळे यंदा भजनांवर मर्यादा आली आहे, तरीही विविध भजनी मंडळांनीही सज्जता ठेवली आहे.सार्वजनिक गणेशोत्‍सवांमध्ये दोडामार्ग ४, बांदा २, सावंतवाडी ५, कुडाळ ५ आचरा १, वेंगुर्ला ३, मालवण २, देवगड १ कणकवली ६, वैभववाडी ४ अशा एकूण ३२ मूर्तींची मनोभावे स्थापना होणार आहे. गतवर्षी कोरोनामुळे फक्त १५ ठिकाणी मंडळांनी मूर्तीचे पूजन केले होते.

बंदोबस्त तैनात

कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील १३ ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात कडक बंदोबस्त आहे. सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणीही बंदोबस्त आहे.

loading image
go to top