आगळी वेगळी प्रथा! चतुर्थीच्या पाचव्या दिवशी गणेश प्रतिष्ठापना 

अजय सावंत
Saturday, 29 August 2020

या गणपती बाप्पाचे वर्षभर भक्तीभावाने पूजन केले जाते. साळगावकर कुटुंबियांचा पाच पिढ्यांचा वारसा जपणारा हा गणेशोत्सव कोकणात वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. 

कुडाळ (सिंधुदुर्ग) - गणेशोत्सवाबाबत अनेक परंपरा पाहावयास मिळतात. अशीच एक अनोखी परंपरा कुडाळ-सांगिर्डेवाडी येथील साळगावकर कुटुंबिय गेली कित्येक वर्षे जोपासत आहेत. सर्वजण भाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजेच श्री गणेश चतुर्थी दिवशी सार्वजनिक आणि घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करून पूजन करतात; मात्र श्री कृष्णा शंकर साळगावकर यांच्या निवासस्थानी गणेश चतुर्थीच्या पाचव्या म्हणजेच 26 ऑगस्टला सायंकाळी अगोदरच्या मूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर नवीन गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. या गणपती बाप्पाचे वर्षभर भक्तीभावाने पूजन केले जाते. साळगावकर कुटुंबियांचा पाच पिढ्यांचा वारसा जपणारा हा गणेशोत्सव कोकणात वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. 

बुधवारी (ता.26) सायंकाळी मागील वर्षभर ठेवण्यालेल्या गणपतीचे विसर्जन झाले. त्यानंतर नवीन गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून विधीवत पूजा करण्यात आली. नवीन गणेश मूर्ती तयार करण्यात आली आहे. या मूर्तीचे रंगकाम करून प्रतिष्ठापना केली जाते. कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात भक्तीभावाने साजरा केला जातो. कोकणात गणेशोत्सवाबाबत अनेक परंपरा पाहावयास मिळतात. अशीच एक अनोखी परंपरा साळगावकर कुटूंबियांनी जोपासली आहे. मुळ कविलकाटे येथील हे कुटूंबिय काही वर्षापूर्वी कुडाळ-सांगिर्डेवाडी येथे स्थायिक झाले. या कुटूंबातील कृष्णा साळगावकर हे स्वतः गणेशमूर्तीकार असून अनेक वर्षांपासूनची परंपरा आजही ते भक्तीभावाने मोठ्या उत्साहात जपत आहेत. 

अनोखी प्रथा 
साळगावकर हे गणेशमूर्ती बनवण्यास सुरूवात करण्यापूर्वी इतर गणपती शाळांप्रमाणे मुहूर्ताचा गणपती बनवतात; मात्र हा गणपती घरात इतरत्र न ठेवता त्याची पूजा करतात. या मुहूर्ताच्या गणपतीसोबत आणखी एक लहान गणपती ठेवला जातो. या गणेश मूर्तीचे चतुर्थीच्या पहिल्या दिवशी पूजन न करता पाचव्या दिवशी मागील वर्षभर घरात ठेवलेल्या गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजन केले जाते. हा गणपती बाप्पा वर्षभर ठेवला जातो. 

....तरीही श्रद्धा कायम 
साळगावकर यांची आर्थिक परिस्थिती थोडी बेताची आहे तरीही हे कुटूंबिय मनोभावे गणेशाची आराधना करतात. दररोज पूजा, आरती आदी कार्यक्रम घरात वर्षभर होतात. पाच पिढ्यांचा वारसा जपणारा हा त्यांचा गणेशोत्सव कोकणात वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. माघी गणेश जयंती हा उत्सवही साजरा होतो. वर्षभर मिळालेले उत्पन्न हा गणेशाचाच आशिर्वाद आहे, असे मानून साळगावकर कुटूंबिय आधी गणरायाच्या चरणी ठेवून नंतर त्याचा स्वखर्चासाठी वापर करतात. गणेशमूर्ती बनविण्यासाठी वैभव व विपुल या दोन्ही मुलांचेही सहकार्य मिळते, असे कृष्णा यांनी सांगितले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesha idol worship Konkan Sindhudurg