कोरोनाचा विसर; डेकोरेशनच्या साहित्यांनी सजली दुकाने

भूषण आरोसकर
Thursday, 20 August 2020

बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत व्यस्त असलेले भक्तगण कोरोनाला विसर घालत खरेदीसाठी सरसावल्याचे दिसते. 
श्रावण महिना सुरू होताच बाप्पाच्या आगमनाचे वेड प्रत्येक कोकणवासीयांना लागते.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - कोकणवासीयांना प्रतिक्षेचे वेध लावणारा गणेशोत्सव काही दिवसांवर आल्याने सर्व भक्त बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत व्यस्त आहेत. येथील बाजारात गणेशोत्सवासाठी लागणारे डेकोरेशन साहित्य, मकर आदी साहित्यासाठी बाजारात लगबग वाढली आहे. सजावटीचे साहित्य, रंगिबेरंगी विद्युत रोषणाईने बाजारपेठ सजली आहे.

बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत व्यस्त असलेले भक्तगण कोरोनाला विसर घालत खरेदीसाठी सरसावल्याचे दिसते. 
श्रावण महिना सुरू होताच बाप्पाच्या आगमनाचे वेड प्रत्येक कोकणवासीयांना लागते. मुंबई, पुणे येथून अनेक चाकरमानी कोकणातल्या या उत्सवासाठी दाखल होतात. महिनाभर अगोदरच गणेश मूर्ती बनवण्यासाठी गणेश शाळांमध्ये दिल्या जातात. कोकणात शाडूच्या मातीच्या मूर्तींना मोठी मागणी आहे.

मूर्ती शाळांमध्ये गणेश मूर्तीचे रंगकाम अंतिम टप्प्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी मूर्ती गणेशोत्सवाआधी 4 ते 5 दिवस नेण्यास मूर्तिकारांकडून आवाहन केले जात आहे. बाजारातील दुकानांत विद्युत रोषणाई, मकर, सजावटीचे साहित्य, रंगेबिरंगी तोरण, प्लास्टिक हार, शुशोभितेच्या वस्तू, फटाके खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

विद्युत रोषणाई तसेच रंगेबिरंगी तोरणाने बाजारपेठ बहरली आहे. अनेक चाकरमानी शहरात दाखल झाले आहेत. यंदा कोरोनामुळे अनेक भक्तगण शासनाचे नियम पाळत 15 दिवस अगोदरच गावागावांत दाखल झाले होऊन क्‍वारंटाईन झाले आहेत. शहरात काही दिवसांत साडेचार हजाराहून चाकरमानी दाखल झाले आहेत. 

चाकरमान्यांची गर्दी 
चाकरमान्यांची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर लगबग दिसत होती. मुंबई, पुणे पासिंग वाहनांचा वावर वाढला होता. यामुळे मुख्य बाजारात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. घरातील रंगरंगोटीच्या कामांना वेग आला. रंग खरेदीसाठी नागरिकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात दिसत होता. काही गावांत गणेशोत्सवच्या पार्श्‍वभूमीवर बस सुरू झाल्याने ग्रामीण भागातील लोक शहरात खरेदीसाठी दाखल झाले होते. कॉम्प्लेक्‍समध्ये तसेच इतर दुकांनामध्ये कपडे खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganeshotsav literature market konkan sindhudurg