esakal | कोकणवासीयांना गणेशोत्सवाचे वेध
sakal

बोलून बातमी शोधा

kokan

कोकणवासीयांना गणेशोत्सवाचे वेध

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी: काही दिवसांवर येऊन राहिलेल्या गणेशोत्सवाचे वेध भक्तांना लागले आहेत. त्यांच्या आगमनाच्या तयारीसाठी कोकणवासिय व्यस्त झाले आहेत. बाजापेठांत खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. आरती, भजनासाठी वापरली जाणारी ढोलकी विक्रीसाठी परप्रांतीय विक्रेते बाजारात फिरताना दिसत आहेत. ते वाजवत असलेल्या ढोलकीचा आवाज कानावर पडताच गणेशोत्सवाच्या आगमनाची खरीखुरी चाहूल लागत आहे.

गेल्या वर्षी कोरोनामुळे अनेक व्यवसाय डबागाईला गेले. कडक लॉकडाउन व शासनाच्या नियमावलीमुळे बाजारातील उलाढाल पूर्णपणे थांबली होती. यावर्षी कोरोनाचा धोका काहीशा प्रमाणात कमी झाला आहे. शासनाकडून निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. चाकरमान्यांना देखील काही नियमावली घालून कोकणात प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे या वर्षीची गणेश चतुर्थी दिमाखात होण्याची आशा आहे. त्यांच्या आगमनाची तयारी देखील जोरात चालू आहे.

बाजारात सजावटीचे सामान तसेच आरती, भजन यासाठी लागणारे वाद्य विक्रेते देखील फिरताना दिसत आहेत. खरेदीसाठी नागरिकांकडून चांगला कल असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. शहरात, गावात ढोलकी वाजवत हे विक्रेते घरोघरी फिरत आहेत. घरगुती आरती, भजनासाठी तसेच पारंपरिक गाणी वाजवण्यासाठीही याचा वापर करण्यात येतो. या ढोलक्याची बांधणी खोड, शेळीचे चामडे, चाव्या, पॉलिश, शाई आणि दोरी आदी साहित्य वापरून केली जाते. याची विक्री २५० ते ८०० रुपयांपर्यंत केली जात आहे.

भजनी मंडळांचाही सराव

भजनी मंडळांचा देखील सराव सुरू असल्याचे चित्र गावागावांत दिसत आहे. तबला, पेटीची बांधणी करण्यासाठी कारागिरांकडे गर्दी होत आहे. त्यामुळे यंदा गणरायाचे जंगी स्वागत होणार असल्याचे चित्र आहे. शिवाय कोरोनाचे संकट कमी झाल्याने आनंदाला उधाण येणार आहे.

loading image
go to top