esakal | कोकण : देवा आलो तुझ्या चरणी म्हणत गणेशभक्तांनी घेतले फक्त कळसाचे दर्शन

बोलून बातमी शोधा

ganpatipule appearance of people for this time only 800 people visit in ratnagiri}

दर्शनाचा योग दीड वर्षांनी येत असल्यामुळे कालच्या अंगारकीला हजारोंच्या संख्येने भक्‍तगण येतील, असा अंदाज होता.

कोकण : देवा आलो तुझ्या चरणी म्हणत गणेशभक्तांनी घेतले फक्त कळसाचे दर्शन
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी यात्रा रद्द करण्यासह गणपतीपुळे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे भक्‍तगणांनीही दर्शनासाठी येणे टाळले आहे. मंगळवारी (२) दिवसभरात सातशे ते आठशे पर्यटकच येऊन गेल्याचा अंदाज आहे. तीन हजारांवर भक्तांनी श्रींचे ऑनलाइन दर्शन घेतले.
कोरोनामुळे मागील वर्षी मेमधील अंगारकीला गणपतीपुळ्यातील श्रींचे दर्शन घेता आले नव्हते. दर्शनाचा योग दीड वर्षांनी येत असल्यामुळे कालच्या अंगारकीला हजारोंच्या संख्येने भक्‍तगण येतील, असा अंदाज होता. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहून देवस्थानने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

अंगारकीला पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक लोकं पुळ्यात येतात. परंतु मंदिर बंद असल्यामुळे गणपतीपुळे तुरळक भक्‍तांनी उपस्थिती लावली होती. देवस्थानतर्फे पहाटे ५ वाजल्यापासून ऑनलाइन दर्शनाची सोय केली होती. मंदिर बंद असले तरीही काही हौशी भक्‍तांनी गणपतीपुळे सकाळी हजेरी लावली. मागील वेळी अनेक भक्‍त मंदिरासमोरील मुख्य दरवाज्यापुढे येऊन उंदराच्या कानात आपल्या इच्छा मांडून नमस्कार करून जात होते. त्यामुळे मंदिर परिसरात येणाऱ्या प्रवेशद्वारावर पोलिसांसह सुरक्षा रक्षक ठेवले होते. पर्यटकांना मंदिर परिसरातही जाता आले नाही.

हेही वाचा - ‘रिजनल प्लॅन’ नसल्याचा रत्नागिरी जिल्ह्याला फटका ; ग्रामपंचायतींनाही अधिकार नाही -

काही भक्‍तांनी त्यावर पर्याय काढून किनाऱ्यावरील प्रवेशद्वारावरून मंदिराच्या कळसाच्या दर्शनावर समाधान मानले. दिवसभरात आठशेहून कमी लोकांनी गणपतीपुळेत हजेरी लावल्याचा अंदाज आहे. मंदिर बंद असले तरीही तीस ते चाळीस टक्‍के लोक येतील, अशी अपेक्षा होती. पण वीस टक्‍केच लोकांनी हजेरी लावली. दरम्यान, जयगड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचाही बंदोबस्त ठेवण्यात आला होत. मास्क न लावणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी चार पथकेही निश्‍चित केली होती. काही पर्यटकांवर दंडात्मक कारवाई केल्याचे ढेरे यांनी सांगितले. 

"कोरोनामुळे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय स्वीकारून अनेक भक्‍तगणांनी गणपतीपुळेत गर्दी केली नाही. लोकांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले. ऑनलाइन दर्शनासाठी ॲप आणि वेबसाइटचा वापर केला."

- डॉ. विवेक भिडे, सरपंच, गणपतीपुळे देवस्थान

"नेहमीपेक्षा अंगारकीच्या दिवशी खूपच कमी गर्दी होती. कोरोनामुळे पर्यटकांनीही काळजी घेत सहकार्य केले. जे पर्यटक गणपतीपुळेत आले त्यांना किनाऱ्यावर फिरण्याची परवानगी पोलिसांनी दिली होती."

- महेश केदारी, उपसरपंच, ग्रामपंचायत

संपादन - स्नेहल कदम