Ratnagiri : फिशमिलच्या बांगडीसाठी मच्छीमारांच्या उड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ratnagiri Fishing

Ratnagiri : फिशमिलच्या बांगडीसाठी मच्छीमारांच्या उड्या

रत्नागिरी : खोल समुद्रातील वादळ ओसरल्यानंतर मच्छीमारांच्या जाळ्यात गेले काही दिवस फिशमिलच्या बांगडीसह मोठा बांगडा मासा आणि काही प्रमाणात सुरमई मिळू लागली आहे. ही मासळी पकडण्यासाठी गुरुवारी दिवसभर आरे-वारे, गणपतीपुळे, जयगड किनाऱ्यापासून काही अंतरावर मच्छीमारांच्या उड्या पडल्या. मच्छीमारी नौकांचे जथ्थेच्या जथ्थे या परिसरात जाळी मारत होते. तीस हजारांपासून एक लाखापर्यंतची फिशमिलची बांगडी मच्छीमारांच्या जाळ्यात मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात होते.

मागील आठवड्यात कोकण किनारपट्टीवर पावसाने हजेरी लावल्यामुळे समुद्रामध्ये वेगवाने वारे वाहत होते. खोल समुद्रात वादळसदृश परिस्थितीमुळे मच्छीमारी नौका बंदरातच उभ्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये कोटभर रुपयांचे नुकसान मच्छीमारांना सहन करावे लागत होते. या आठवड्यात वातावरण निवळल्यामुळे मच्छीमारांनी मासेमारीला जाण्यास आरंभ केला आहे. सध्या पर्ससिननेटसह ट्रॉलर्स्, गिलनेटने मासेमारी करणाऱ्यांना बांगडा, सुरमई मासा मिळत आहे. जाळ्यात सापडणाऱ्या माशांमध्ये सर्वाधिक उष्टी बांगडीचा समावेश आहे. ५० ते १०० डिश (एक डिश ३२ किलो) मासा मिळू लागल्याने बंदमधील भरपाई भरून निघत आहे.

मासेमारी थांबल्यामुळे मोठा फटका मच्छीमारांना सहन करावा लागत होता. खलाशांचा खर्च अंगावर पडतो. गेले चार दिवस काही प्रमाणात मासा मिळू लागल्याने मच्छीमारांचा जीव भांड्यात पडला आहे. गुरुवारी सकाळपासून काळबादेवी ते जयगड या परिसरातील किनारी भागात उष्टी बांगडी मोठ्या प्रमाणात मिळत आहे. हा मासा पकडण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील मच्छीमारांच्या उड्या पडल्या आहेत.

शेकडोच्या संख्येने मासेमारी करणार्‍या मच्छीमारी नौकांचे ग्रुप किनाऱ्यावरून पाहायला मिळत होते. जाळी टाकून तासनतास नौका समुद्रात ठाण मांडून होत्या. काहींच्या जाळ्यात पन्नास डिश तर काहींच्या शंभर डिश मासा मिळत होता. उष्टी बांगडी फिशमिलला तेल काढण्यासाठी दिली जात आहे. त्याचा दर किलोला १८ रुपये आहे. पूर्णगड, राजिवडासह दक्षिणेकडील परिसरात काही नौकांना सुरमई लागला होता. त्यामुळे बाजारात ४०० ते ६०० रुपये किलोने हा मासा विकला गेला. तो खरेदी करण्यासाठी राजिवडा मासळी बाजारात खवय्यांची झुंबड उडाली होती.

Web Title: Ganpatipule Fishermens Jumps Sea 30 Thousands To 1lakh Price Of Fish Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..