
- प्रशांत परांजपे, दापोली
कचरा ही माझी जबाबदारी आहे...हे मनाला कळेल तेव्हाच कचरा प्रश्नाचा पीळ सैल होऊ लागेल. कचरा प्रश्न माणसाभोवती घोंगावतोय का माणूस कचऱ्या भोवती घोंगावतोय याच प्रश्नाभोवती सर्व प्रश्न घोंगावत आहेत; पण प्रश्नाच्या डोक्यावर उभं राहीलं की उत्तर सापडत आणि त्यामुळे कचरा हे दुसऱ्या वस्तूचं ‘रॉ मटेरियल’ आहे या शाळेत शिकलेल्या अभ्यासाप्रमाणे आपण कामाला लागणे ही आता काळाची नितांत गरज बनली आहे. कचरा म्हणजे नक्की काय रे भाऊ असा प्रश्न कॉमन मॅनला पडतो. कारण जाता येता आपण प्रत्येक ठिकाणी आपल्या उघड्या डोळ्यांनी रस्त्याच्या बाजूला, गटारामध्ये ,नाले, नदी, तलाव, समुद्र, बसस्थानक, रेल्वे स्थानक, रेल्वे रूळ, रेल्वे प्लॅटफॉर्म च्या बाजूला असलेली परिस्थिती अशा सगळीकडेच प्रचंड प्रमाणात कचरा झालेला बघतो आणि प्रशासन काहीच करत नाही अशा पद्धतीच्या बाता मारून किंबहुना याबाबतीतल्या गप्पा तावातावाने मारतानाच हातातून खात असलेले वेफर्सचे पाकीट हे असंच कुठेतरी रस्त्याच्या बाजूला उडवून देतो. ही सत्य स्थिती असल्यामुळेच कचरा प्रश्न निर्माण झाला आहे.