कचरा प्रकल्पावरून नगरपंचायतीच्या कारभारावर ताशेरे, वाचा सविस्तर 

संतोष कुळकर्णी
Sunday, 6 September 2020

सांवत म्हणाले, ""शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीखाली कचऱ्यापासून खत निर्मिती केली जात आहे. परिसरात टाकलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. अशा प्रकारचा प्रकल्प राज्यात कोठेही आपण पाहिला नाही.

देवगड (सिंधुदुर्ग) - येथील देवगड जामसंडे नगरपंचायतीच्यावतीने कचऱ्यापासून खत निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाच्या ठिकाणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अचानक भेट देऊन पहाणी केली. परिसरात टाकण्यात आलेला कचरा पाहून तीव्र नापसंती दर्शवत नगरपंचायतीच्या कारभारावर ताशेरे ओढले. पाण्याच्या टाकीखाली खत निर्मिती करणारी राज्यातील पहिली नगरपंचायत असल्याचे नमुद करून आमदार नीतेश राणे सांगतायेत ती हीच आधुनिक नगरपंचायत का? अशी खोचक टीका जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत यांनी यावेळी केली. 

येथील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या शिवसेना नेतेमंडळींनी अचानक नगरपंचायतीच्या कचऱ्यापासून खत निर्मितीच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी सतीश सावंत यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, संग्राम प्रभूगावकर, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा उपप्रमुख विलास साळसकर, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर, संतोष तारी यांच्यासह अन्य उपस्थित होते. प्रकल्पाच्या ठिकाणची पहाणी करून त्यांनी नाराजी व्यक्‍त केली.

तेथूनच नगरपंचायत मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे यांच्याशी संपर्क साधून येत्या आठ दिवसात तातडीने प्रकल्पाची जागा बदलण्याची मागणी केली. याबाबत बोलताना श्री. सांवत म्हणाले, ""शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीखाली कचऱ्यापासून खत निर्मिती केली जात आहे. परिसरात टाकलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. अशा प्रकारचा प्रकल्प राज्यात कोठेही आपण पाहिला नाही. आमदार नीतेश राणे आधुनिक नगरपंचायत बनवणार, स्वच्छ शहर बनवणार असे सांगत आहेत. हाच आदर्श राज्याने घ्यावा का? येत्या आठ दिवसात येथील जागा बदलून परिसर स्वच्छ करण्याची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. स्थानिक जनतेच्या आरोग्याला त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्यास नगरपंचायत प्रशासनाला भाग पाडले जाईल.'' दरम्यान, परिसरात टाकलेल्या कचऱ्याची त्यांनी पहाणी करून याबाबत योग्य ती दखल घेतली जाईल असे सांगितले. 

प्रकल्प हलवण्यासाठी शिवसेनेची स्टंटबाजी ः माने 
स्थापनेपासून अल्पावधीतच देवगड जामसंडे नगरपंचायतीने स्वच्छ सर्वेक्षणमध्ये अग्रक्रम पटकावला आहे. नगरपंचायतीने डंपींग ग्राऊंडसाठी स्वतंत्र जागा घेतली असून तांत्रिक बाबींची पुर्तता करून स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार खत निर्मितीची जागा बदलणार आहे. त्यामुळे शिवसेनेची राजकीय स्टंटबाजी करून प्रकल्प हलवण्यासाठीची मागणी व्यर्थ असल्याची टीका नगराध्यक्षा प्रणाली माने यांनी केली. केंद्रस्तरीय स्वच्छता समिती येऊन प्रकल्प बघून गेल्यामुळे आता शिवसेनेच्या प्रमाणपत्राची आवश्‍यकता नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

येथील नगरपंचायतीच्यावतीने कचऱ्यापासून खत निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाच्या ठिकाणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अचानक भेट देण्याच्या पार्श्‍वभूमीवर नगराध्यक्षा माने बोलत होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, नगरसेवक योगेश चांदोस्कर उपस्थित होते. माने म्हणाल्या, ""नगरपंचायत मागील तीन वर्षे ओल्या कचऱ्यापासून यशस्वीपणे खत निर्मिती प्रकल्प राबवत आहे. खत विक्रीही सुरू आहे. तांत्रिक बाबी पूर्ण करून कचरा प्रकल्प स्वतंत्र जागेत हलवण्यात येणार आहे.

स्थानिकांची याबाबत मागणी असल्याने त्यांच्यासोबत बैठक होऊन निर्णय झाला आहे. त्यामुळे मुळातच प्रकल्प हलवणार असल्याने यासाठी आता शिवसेनेची स्टंटबाजी कशाला? त्यामुळे याचे श्रेय घेण्याचा शिवसेनेने प्रयत्न करू नये. आमदार नीतेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीने अल्पावधीतच मोठी झेप घेतली असल्याने आमदारांवर आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या नातेवाईकांचा शहरात गृहप्रकल्प असून त्याच्या सांडपाण्याचा परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. याबाबत विकासकांना सांगून झाले आहे. त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वेळ मिळाल्यास त्याठिकाणीही भेट देऊन स्वच्छतेची माहिती घेतल्यास बरे होईल.'' नगरपंचायत स्वच्छतेबाबत शहरातील नागरिकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करीत असल्याने शिवसेनेचा पोटसूळ असल्याची टीका त्यांनी केली. 
 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: garbage project issue devgad konkan sindhudurg