esakal | बागायतदार पहिल्या टप्प्यातील आंब्याला मुकण्याची शक्‍यता 
sakal

बोलून बातमी शोधा

Gardeners Likely To Drop First Stage Mangoes

यंदा ऑक्‍टोबरात बंगालच्या उपसागरातून आलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे संपूर्ण ढगाळ वातावरणामुळे हवामानात बदल झाला आहे. दरवर्षी ऑक्‍टोबरमध्ये उन्हाचा चटका वाढत जाऊन कमाल तापमानाची वाढ होते.

बागायतदार पहिल्या टप्प्यातील आंब्याला मुकण्याची शक्‍यता 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - उत्तरेकडील राज्यातून थंड वाऱ्यांचे प्रवाह सुरू झाल्यामुळे किमान तापमानात घट होऊ लागली आहे. कोकणात थंडीची चाहुल लागली आहे. त्यामुळे हापूसला पोषक वातावरण तयार होऊ लागले आहे. काही झाडांवर किरकोळ मोहोर दिसू लागला आहे. यंदा पाऊस लांबल्यामुळे पहिल्या टप्प्यातील आंब्याला बागायतदार मुकण्याची शक्‍यता आहे. 

यंदा ऑक्‍टोबरात बंगालच्या उपसागरातून आलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे संपूर्ण ढगाळ वातावरणामुळे हवामानात बदल झाला आहे. दरवर्षी ऑक्‍टोबरमध्ये उन्हाचा चटका वाढत जाऊन कमाल तापमानाची वाढ होते. त्यामुळे ऑक्‍टोबर हीट चांगलीच जाणवते. यंदा ऑक्‍टोबर हीट जाणवली पण शेवटच्या आठवड्यात. नोव्हेंबरच्या सुरवातीपासून तापमान कमी होऊ लागले. रत्नागिरीत कमाल तापमान 32 ते 34 अंशापर्यंत आहे. किमान तापमान 22 अंश सेल्सिअस आहे.

गुरुवारी (ता. 5) सकाळी गार वारे वाहण्यास सुरवात झाल्यामुळे सायंकाळी किमान तापमानात आणखी घट होईल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. मिनी महाबळेश्‍वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीचा पारा 20 अंशाच्या खाली येऊ लागला आहे. 
बदलत्या तापमानाचा फायदा कोकणातील आंबा पिकाला पोषक आहे. यावर्षी ऑक्‍टोबरपर्यंत मोसमी पाऊस सुरूच होता. त्यामुळे पालवी फुटून मोहोर येण्याची प्रक्रियाही लांबली आहे.

नोव्हेंबर महिन्यात थंडी पडल्यामुळे काही दिवसात पालवी फुटण्यास सुरवात होईल. ऑक्‍टोबर महिन्यात फुटलेल्या पालवीचा आंबा फेब्रुवारीत तयार होतो. पहिल्या टप्प्यातील हे पीक यंदाही बागायतदारांना दुर्लभ होणार आहे. हा टक्‍का कमी असला तरीही त्यातून उत्पन्न चांगले मिळते. 

तापमान 
तारीख........... कमाल.........किमान 
1 नोव्हेंबर....... 34.09........ 23.2 
2 नोव्हेंबर........34.3.......... 23.5 
3 नोव्हेंबर....... 36.6.......... 22.6 
4 नोव्हेंबर....... 36.0...........22.4