Ratnagiri : गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या; वजन घटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gas Cylinder

गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या; वजन घटले

चिपळूण : दिवसेंदिवस वाढणारी महागाई, दिवसागणिक वाढणारे पेट्रोल- डिझेलचे दर, त्यातच घरगुती सिलिंडरचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यातच साधारणतः ३० दिवस पुरणारे सिलिंडर आता २५ दिवसांत संपत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिक सिलिंडरच्या वजनाबाबत शंका उपस्थित करीत आहेत.

घरगुती सिलिंडरचा भाव वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहेच, पण केवळ किमतीचा भुर्दंड सहन करण्याबरोबरच आता मिळणाऱ्या गॅसची चोरी होत असल्याचे चित्रही दिसून येत आहे. जगदीश पवार यांनी याबाबत चिपळुणातील गॅस वितरकांकडे तक्रार केली. त्यांनी तुमची तक्रार कंपनीला सांगतो, असे उत्तर दिले. मात्र, वेळोवेळी संबंधित गॅस वितरकांना सांगूनही त्याची वरिष्ठ पातळीवर दखल घेतली जात नाही, असे पवार यांचे म्हणणे आहे. अनेकदा गॅस सिलिंडर लीकेज असेल किंवा तुमचा गॅस सिलिंडरचा वापर वाढला असेल, अशी मोघम उत्तरे वितरकांकडून दिली जातात.

महिन्याला ९२० रुपये सिलिंडरचा खर्च कसाबसा परवडतो, पण आता त्यातही पाच दिवसांआधीच गॅस बदलावा लागत असल्याने आणखी तोटा सहन करावा लागत आहे. ही समस्या एका व्यक्तीची नसून, शहरातील विविध भागांमध्ये राहणारे लोक गॅस वितरकांकडे ही शंका व्यक्त करीत आहेत. अशा प्रकारच्या तक्रारी दिवसातून चार ते पाच ग्राहकांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे तपासणी होऊनच सिलिंडरचे वितरण व्हावे, अशी मागणी होत आहे.

ग्राहकांच्या मागण्या

  1. सिलिंडरवरील अनुदान सुरू करावे

  2. सिलिंडर वजन करून देण्याची सक्ती करावी

  3. गळतीची तपासणी करून वितरण करावे

अनेक व्यक्तींच्या तक्रारी आहेत. पूर्वी महिन्यात एक सिलिंडर संपत होता. आता तो २० दिवसांत संपल्याच्या तक्रारी येतात. त्याची माहिती संबंधित गॅस वितरण कंपनीला दिली जाते.’’

- संजय शिंदे, गॅस वितरक, चिपळूण

loading image
go to top