तोंडवलीत आगळे-वेगळे गौरी पूजन, ३२ प्रकारच्या खाद्यपदार्थांची आरास

नेत्रा पावसकर
Friday, 28 August 2020

गौरी पुजनादिवाशी सकाळीच धान्याच्या राशी गौरीच्या पुढे ठेवल्या जातात. कारंजी, लाडू, अनारसे, शेव, पापड्या, चकली, शंकरपाळी अशा 32 प्रकारच्या खाद्य पदार्थांची आरास गौरीपुढे असते.

तळेरे (सिंधुदुर्ग) - कोकणात गौरी पूजनाच्या विविध पध्दती सर्वत्र पहावयास मिळतात. जिल्ह्यातही अनेक प्रथा आणि परंपरा असून तोंडवली (ता.कणकवली) येथील मत्तलवार कुटुंबाची वेगळीच पध्दत पहायला मिळते. अत्यंत श्रध्देने आणि भक्तीने गौरी पूजन केले जाते. 

तोंडवली येथील मत्तलवार यांच्या घरच्या वेगळ्या गौरी पूजनाची माहिती देताना शिल्पा मत्तलवार म्हणाल्या, की ज्येष्ठा गौरीच्या पहिल्या दिवशी महालक्ष्मीची स्थापना केली जाते. गणपतीच्या दोन बहिणी म्हणून ज्येष्ठा आणि कनिष्ठा यांची स्थापना केली जाते. घरातील सुवासिनी महिला महालक्ष्मीची आरास करतात. गौरीची साजशृंगार तयारी केली जाते.

पहिल्या दिवशी ज्येष्ठा गौरीला घरात आणले जाते. मुखवट्याची पूजा करून सोन पावलांनी घरात घेतली जाते. विविध अलंकार परिधान केल्यानंतर तेरडा, केना, आघाडा, शमी पत्री, दुर्वा यांनी पूजा केली जाते. पहिल्या दिवशी त्यांना नैवेद्य म्हणून मेथीची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दिला जातो. 

गौरी पुजनादिवाशी सकाळीच धान्याच्या राशी गौरीच्या पुढे ठेवल्या जातात. कारंजी, लाडू, अनारसे, शेव, पापड्या, चकली, शंकरपाळी अशा 32 प्रकारच्या खाद्य पदार्थांची आरास गौरीपुढे असते. यादिवशी गौरीपुढे महिला फेर धरतात. यावेळी गौराईची महती गायली जाते. यावेळी फळ, मिठाई व दुधाचा नैवेद्य अर्पण केला जातो. यादिवशी महिला उपवास धरतात. व सायंकाळी गौरीला पंचपक्‍वान्नांचा नैवेद्य दिला जातो. विशेष म्हणजे यावेळी 16 भाज्यांची कतली (ताक व बेसन पीठ लावून केलेला पदार्थ) केली जाते. याशिवाय गौरीचा महत्वाचा नैवेद्य म्हणजे आंबील. 

श्रद्धा आणि प्रथा 
सायंकाळी नैवेद्य दाखवताना 16 पुरणपोळ्या, 16 भाज्या आणि पंचपंक्‍वन्ने असलेले ताट तयार करून त्याचा नैवेद्य दाखविला जातो. त्यानंतर गौरीची महाआरती केली जाते. आरतीनंतर आशीर्वाद घेऊन प्रसाद वाटून गौराईला प्रसाद ग्रहण करण्यासाठी गौराईला एकटेच एका खोलीत ठेवले जाते. यावेळी गौराई येऊन प्रसाद ग्रहण करते, अशी श्रद्धा आहे. त्यानंतर गौराईला पाच पानांचा विडा देण्याची प्रथा आहे. त्यानंतर रात्री भजन व फुगड्यांनी जागविली जाते. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gauri Pujan in Tondavali konkan sindhudurg