गावपळण: इशारा झाला अन्‌ चिंदर गाव फुटला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 डिसेंबर 2018

आचरा - तीन दिवस तीन रात्री वेशीबाहेर राहणाऱ्या चिंदर ग्रामस्थांच्या सुरक्षेचे रवळनाथ मंदिरात शिवकळेचे आशीर्वचन झाले. इशाऱ्याबरोबर ढोल वाजू लागले आणि भरदुपारी चिंदर ग्रामस्थ उन्हाची पर्वा न करता लवकरात लवकर गावच्या वेशीबाहेर जाण्यासाठी धावू लागले होते. एका आगळ्यावेगळ्या गावपळण परंपरेसाठी आता चिंदर गाव खाली होत होते.

आचरा - तीन दिवस तीन रात्री वेशीबाहेर राहणाऱ्या चिंदर ग्रामस्थांच्या सुरक्षेचे रवळनाथ मंदिरात शिवकळेचे आशीर्वचन झाले. इशाऱ्याबरोबर ढोल वाजू लागले आणि भरदुपारी चिंदर ग्रामस्थ उन्हाची पर्वा न करता लवकरात लवकर गावच्या वेशीबाहेर जाण्यासाठी धावू लागले होते. एका आगळ्यावेगळ्या गावपळण परंपरेसाठी आता चिंदर गाव खाली होत होते.

खासगी वाहनांसह एसटी, रिक्षा, टेम्पोचा आधार घेतला तर कोणी बैलगाडीतून जात होते. गुरंढोरांसह कुणी धावतपळत जात होते. अवघ्या काही क्षणातच गजबजलेले चिंदर गाव शांत झाले आणि वेशीबाहेर गजबजाट वाढला. आता तीन दिवस तीन रात्री गुराढोरांसह कोंबडी कुत्र्यांसह रानावनात एकमेकांच्या साथीने सहजीवनाचा आनंद घेणार आहेत. 

दर तीन वर्षांनी होणाऱ्या गावपळणीसाठी पळणीचे वर्ष आल्यावर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी बारा पाच मानकरी रवळनाथ मंदिरात जमून रवळनाथाला तांदळाचा एकदाच आणि एकच कौल प्रसाद घेतला जातो. त्रिसाली मर्यादा आली असून या वेळी गावपळण आणि देवपळण करण्यास तुझी परवानगी आसा काय, असं सांगणं करून उजवा कौल प्रसाद झाल्यावर बारा पाच मानकरी एकत्र (मेळ्यावर) बसून तारीख ठरवितात.

चिंदरवासीयांनी सकाळपासूनच गाव सोडण्याची सुरुवात केल्याचे दिसून येत होते. दुपारीच अडीचच्या सुमारास  बारा पाच मानकरी रवळनाथ मंदिरात जमल्यावर रवळनाथाला सांगणे करून शिवकळा वाढवली गेली. सुरक्षेचे शिवकळेचे आर्शिवचन घेतल्यानंतर ढोलाचा इशारा झाला आणि चिंदरवासीय वेशीबाहेर पळू लागले. ज्या भागातील लोकांना जी वेस जवळची होती, त्या भागात गेल्या आठ दिवसांपासून झटून रानावनात उभ्या करण्यात आलेल्या झोपड्यात आता नव्या संसाराची सुरुवात केली जात होती. काहींनी पाहुण्यांचा आधार घेतला तर काहींजण तीन दिवसांत पर्यटनासाठी निघाल्याचे दिसत होते. या गावात ख्रिश्‍चन धर्मीयही मोठ्या आनंदाने वेशीबाहेर हिंदू धर्मीयांच्या सोबत आनंदाने राहत असल्याचे दिसून येते होते. आता तीन दिवस तीन रात्री देवाच्या भरोश्‍यावरच रानावनात आभाळाच्या छताखाली एकमेकांच्या सहवासात सहजीवनाचा आनंद घेतला जाणार आहे. 

या तीन दिवसांत त्रिंबक येथील सातेरी मंदिरात दुपारी दोन वाजता बारा पाच मानकऱ्यांचा मेळा जमतो आणि आढावा घेतला जातो. चौथ्या दिवशी न बोलता शांतपणे बारा पाच मानकरी रवळनाथ मंदिरात एकत्र येत गाव भरण्याचा देवाचा हुकूम घेतात. तो सुद्धा एकदाच घेतला जातो. तो डावा झाल्यास पुन्हा पाचव्या दिवशी कौल प्रसाद घेतला जातो. गावपळणीनंतर येथे देवपळणही केली जाते. 
- विश्‍वास पाताडे,
ग्रामस्थ, चिंदर

Web Title: Gavpalan the tradition of village in Konkan