इशारा झाला अन् वायंगणी गाव रिकामा झाला

अर्जुन बापर्डेकर
सोमवार, 11 मार्च 2019

आचरा - पहाटेच्या वेळी गुप्ततेने मानकरी आणि सेवेकरांच्या उपस्थित ग्रामदेवतेचे प्रतिक असलेले श्रीफळ वेशीबाहेर चिंदर सडेवाडी येथील नियोजित स्थळी पोहोचले आणि ढोलांचा गजर झाला आणि वायंगणी गावच्या गावपळणीस सुरुवात झाली. आता तीन दिवस तीन रात्री वायंगणी ग्रामस्थ गुराढोरांसह वेशीबाहेर रानावनात निसर्गाच्या सान्निध्यात रमणार आहेत.

आचरा - पहाटेच्या वेळी गुप्ततेने मानकरी आणि सेवेकरांच्या उपस्थित ग्रामदेवतेचे प्रतिक असलेले श्रीफळ वेशीबाहेर चिंदर सडेवाडी येथील नियोजित स्थळी पोहोचले आणि ढोलांचा गजर झाला आणि वायंगणी गावच्या गावपळणीस सुरुवात झाली. आता तीन दिवस तीन रात्री वायंगणी ग्रामस्थ गुराढोरांसह वेशीबाहेर रानावनात निसर्गाच्या सान्निध्यात रमणार आहेत.

दर तीन वर्षांनी ग्रामदेवतेच्या कौल प्रसादाने वायंगणी गावच्या गावपळण ठरते. वायंगणी गावच्या  गावपळणीचे वर्ष आल्यावर तरंग वार्षिक डाळपस्वारीनंतर रवळनाथ मंदिरात आल्यावर मानकरी यांना तीन साली मर्यादेची सुचना करतात. यानंतर रवळनाथाला कौल प्रसाद घेऊन मानकरी व ग्रामस्थांच्या बैठकीत देवपळणीचा वार निश्चित केला जातो.

सोमवारी देव वेशीबाहेर गेल्यानंतर इशारा झाल्यानंतर सकाळ पासूनच वायंगणी ग्रामस्थांनी गाव सोडण्यास सुरुवात केली होती. कुणी मिळेल त्या वाहनात आपल्या गरजेचे सामान घेऊन गावाबाहेर जाण्यासाठी धडपडत होते. गुरेढोरे बुजल्यासारखी उधळत होती .त्यांना आवरघालत वेशीबाहेर जाण्यासाठी वायंगणी वासिय भर उन्हात धावपळ करत होते. साधारण दोन वाजण्याच्या आसपास गाव रिकामा झाला आणि वेशीबाहेर गडबड वाढली. ज्या बाजूची वेस जवळ त्या बाजूला वेशीबाहेर ग्रामस्थांनी वस्ती केली होती. वायंगणी सडयेवाडीतील ग्रामस्थांनी कालावल खाडीपात्राच्या किनारी झोपड्या उभारुन आपले संसार थाटले होते. तर बहुतांशी वायंगणी ग्रामस्थांनी चिंदर सडेवाडी येथील देव ठेवलेल्या ठिकाणी झाडाखालीच आसरा घेतला होता. आता तीन दिवस तीन रात्री निसर्गाच्या सान्निध्यात वायंगणीवासिय रमणार आहेत.

या बाबत माहिती देताना वायंगणी गावचे आबा सावंत सांगतात दर तीन वर्षांनी ग्रामदेवतेच्या कौल प्रसादाने वायंगणी गावच्या देवपळणीसहित गावपळणीस सुरुवात होते. पहाटे देवाचे प्रतिक असलेले श्रीफळ न बोलता गुप्तपणे वेशीबाहेर नियोजित स्थळी आणल्यावर ढोलांचा इशारा झाल्यानंतर गावपळणीस सुरुवात होते. चौथ्या दिवशी तांब्याच्या घटावर देवाचे प्रतिक असलेले श्रीफळ ठेवून कौल घेतला जातो. कौलप्रसाद झाल्यानंतर वर्सलदार मानकरी गावात जाऊन मंदिरातील देवांची पुजा करुन पुन्हा वेशीबाहेर आल्यावर ढोलांच्या गजर करतात. गावातून आणलेले श्रीफळ पुन्हा रवळनाथ मंदिरात नेले जाते. यानंतरच गाव भरण्यास सुरुवात होते, अशी माहिती त्यांनी दिली.

वायंगणी ग्रामस्थ आता तीन दिवस तीन रात्री आपल्या ग्रामदेवतेच्या भरवश्यावर रानावनात आनंदाने राहणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gavpalan in wayangani