तेरेखोल नदीत जेली फिशचे थवे

आरोसबाग - येथील नदीपात्रात असे जेली फिश हजारोंच्या संख्येने दाखल झाले आहेत.
आरोसबाग - येथील नदीपात्रात असे जेली फिश हजारोंच्या संख्येने दाखल झाले आहेत.

बांदा (जि. सिंधुदुर्ग) - खोल समुद्रात वावर असणाऱ्या ‘जेली फिश’चे थवेचे थवे तेरेखोल नदीच्या पात्रात घुसले आहेत. विषारी असलेल्या जेली फिश या भागातील गोड्या पाण्याच्या क्षेत्रात येण्याची ही पहिलीच घटना असल्याचे स्थानिक सांगतात. मत्स्य अभ्यासकांसमोर हा बदल विचार करायला लावणारा आहे.

तेरेखोल नदीपात्रात जेली फिश सापडल्याने ही नदी सागरी जैवविविधतेच्या क्षेत्रात चर्चेला आली आहे. तेरेखोल नदीपात्रात मगरींची संख्या ही शेकडोंच्या घरात असून, यात आता जेली फिशची भर पडली आहे. जेली फिश मासा हा तेरेखोल नदीपात्रात प्रथमच सापडला आहे. 

कोकणातील मच्छीमारांनाही मासेमारी करताना जेली फिशचा त्रास होतो. तो आता नदीपर्यंत पोहोचला आहे. जेली फिश हा स्वतःहून दंश करत नाही. जेली फिश स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याच्या अंगातील ‘नेमॅटोसाइस्ट’ नावाचा काटेरी भाग शत्रूला टोचतो. हे काटे विषारी असतात. काही वर्षांपूर्वी मुंबईच्या किनारपट्टीवर गणेश विसर्जनावेळी जेली फिशने अनेकांना दंश करुन जायबंदी केल्याची घटना घडली होती.

तेरेखोल नदी ही गोवा हद्दीत अरबी समुद्राला जाऊन मिळते. अरबी समुद्रातून वाहत येऊन हे जेली फिशचे थवे तेरेखोल नदीपात्रात पोचले आहेत. जेली फिशमुळे स्थानिकांचे नदीपात्रातील वावरणे धोकादायक बनले आहे.

जेली फिश हा मासा अंदमान, निकोबार समुद्रात मोठ्या प्रमाणात आढळतो; मात्र प्रवाहासोबत हा मासा अरबी समुद्रात आला आहे. मुख्यत्वे हा खाऱ्या पाण्यात आढळतो. या माशांना खाणारे सुरमई, पापलेट या माशांची शिकार मोठ्या प्रमाणात होत असल्याने जेली फिशची संख्या वाढली आहे. या माशांच्या दंशामुळे एखाद्या वेळेस मृत्यूही ओढवू शकतो.
- डॉ. केतन चौधरी, मत्स्यजीव अभ्यासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com