कोनाळकट्टा येथून परतत असताना घोटगेवाडी पोलीस पाटलांसोबत घडला हा प्रकार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 2 September 2020

कोनाळकट्टा येथून सकाळी दहाच्या दरम्यान ते कॉजवेवरून घरी जात होते. कॉजवेवर पाणी होते. रस्ता सवयीचा असल्याने त्यांनी पलीकडे जाण्याचा निर्णय घेतला; पण पाय घसरल्याने ते पाण्यात पडले.

दोडामार्ग (सिंधुुदुर्ग) - कोनाळकट्टा येथून घरी परतत असताना घोटगेवाडी कॉजवेवरील पाण्याचा अंदाज न आल्याने पाय घसरून पडल्याने घोटगेवाडी गावचे पोलिस पाटील विश्राम गोविंद दळवी (वय 45) तिलारी नदीपात्रातून वाहून गेले. स्थानिक युवकांसह सासोली येथील सज्जन धाऊसकर टीमकडून उशिरापर्यंत शोधमोहीम सुरु होती; मात्र त्यांचा पत्ता लागलेला नाही. 

कोनाळकट्टा येथून सकाळी दहाच्या दरम्यान ते कॉजवेवरून घरी जात होते. कॉजवेवर पाणी होते. रस्ता सवयीचा असल्याने त्यांनी पलीकडे जाण्याचा निर्णय घेतला; पण पाय घसरल्याने ते पाण्यात पडले. त्याचवेळी घोटगेवाडीच्या दिशेने घोटगे येथील लाडू दळवी मासे गरवण्यासाठी बसले होते. त्यांनी त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली; मात्र ते वाहत खाली गेले .याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक सुनील थोपटे, प्रभारी तहसीलदार संजय कर्पे आदींनी घटनास्थळाला भेट दिली.

शिवसेनेचे जिल्हा संघटक गोपाळ गवस, विभागप्रमुख संतोष मोर्ये आणि स्थानिक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनीही घटनास्थळाला भेट दिली. सज्जन धाऊसकर टीमही दाखल झाली. श्री. धाऊसकर, सासोली पोलिस पाटील संजय गवस आणि अन्य सहकाऱ्यानी पाण्यात उतरून शोध घेण्याचा प्रयत्न केला. उशिरापर्यंत त्यांचा पत्ता लागला नव्हता. त्यामुळे ते बुडाले असण्याची भीती व्यक्त होत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ghotgewadi Police Patil Missing Due To Fall In Water