दारू वाहतुकीचे गोवा-गुजरात कनेक्‍शन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मार्च 2019

रत्नागिरी - रेल्वेच्या बाथरूममधील प्लायवूडमागे गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या लपवून होणाऱ्या अनधिकृत वाहतुकीचा प्रकार रेल्वे पोलिसांनी हाणून पाडला. हाफा एक्‍स्प्रेसमधील दोन जनरल डब्यातून सुमारे सव्वा ते दीड लाखाच्या पाचशे दारूच्या बाटल्या जप्त केल्या.

रत्नागिरी - रेल्वेच्या बाथरूममधील प्लायवूडमागे गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या लपवून होणाऱ्या अनधिकृत वाहतुकीचा प्रकार रेल्वे पोलिसांनी हाणून पाडला. हाफा एक्‍स्प्रेसमधील दोन जनरल डब्यातून सुमारे सव्वा ते दीड लाखाच्या पाचशे दारूच्या बाटल्या जप्त केल्या. यामुळे अनधिकृत दारू वाहतुकीचे गोवा ते गुजरात कनेक्‍शन रेल्वे पोलिसांनी उघडकीस आणले. या रॅकेटमध्ये रेल्वेशी निगडित कोणी आहेत का, याचा तपास पोलिस करीत आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या रेल्वेच्या विशेष गस्ती पथकाच्या तपासणीत शुक्रवारी (ता. २२) रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली. कोकण रेल्वे मार्गावरील मडगाव-हाप्पा या रेल्वेतून दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक अजित मधाळेंच्या नेतृत्वाखालील पथकाने यासाठी विशेष लक्ष ठेवले होते.

मडगाव येथून गाडीत बसलेल्या रेल्वे पोलिसांनी गाडीचा कोपऱ्यान्‌कोपरा शोधला. अखेर त्यांना बोगीच्या बाथरूममधील प्लाय काढून त्याची तपासणी कली. आतमध्ये अनेक दारूच्या बाटल्या ठेवलेल्या लक्षात आल्या. आतापर्यंत रेल्वेतून वाहतूक करणारे पोत्यांचा वापर करत होते; मात्र हा नवीन प्रकार पुढे आल्यामुळे सर्वांनाच मोठा धक्‍का बसला आहे. यामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांचा सहभाग असावा असा संशय व्यक्‍त केला आहे.

ही कारवाई करण्यासाठी रेल्वे पोलिसांना खेडपर्यंत प्रवास करावा लागला. कारवाई महानिरीक्षक प्रणव कुमार, सहायक सुरक्षा आयुक्‍त टी. ए. रामचंद्रन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अजित मधाळे, आप्पाराव ठक्‍कनवार, सतीश सुर्वे, रवीकुमार, जिजाब, विठ्ठल खंडागळे, पांडुरंग उपलवार, भालेराव, शंकर मदान, राजू कलाल यांच्या पथकाने केली.

संशयिताचे पलायन
रेल्वे पोलिसांकडून तपासणी सुरू झाल्यानंतर विलवडे टनेलदरम्यान संशयिताने चालत्या रेल्वेतून उडी मारून पलायन केल्याचे पुढे आले आहे.

गेले काही दिवस ट्रॅप लावला होता. त्याला शुक्रवारी यश मिळाले. गोवा बनावटीची ही दारू गुजरातमध्ये पाचपट दराने विकली जाते. भविष्यात अशा प्रकारे गस्त कायम केली जाणार आहे.
- अजित मधाळे,  
निरीक्षक, रेल्वे पोलिस

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Goa-Gujarat connection of liquor traffic