उपचार व बिलांवर लक्ष ठेवण्यासाठी सिंधुदुर्गात शासकीय समिती

विनोद दळवी
Friday, 25 September 2020

जिल्ह्यात आतापर्यंत चार हॉस्पिटल अधिग्रहित केली आहेत.

ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : कोरोना उपचारासाठी जिल्ह्यात आतापर्यंत चार हॉस्पिटल अधिग्रहित केली आहेत. यासाठी शासकीय दर निश्‍चित केला असून, नियंत्रणासाठी दोन सदस्य समिती नियुक्त केली आहे. उपचार व बिलावर समिती लक्ष ठेवणार आहे. ऑक्‍सिजनचा तुटवडा भासू नये, यासाठी जिल्हा नियोजनमधून ऑक्‍सिजनचे 200 जंबो सिलिंडर मागविले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे उपस्थित होते. त्या म्हणाल्या, ""पडवे येथील एसएसपीएम मेडिकल कॉलेजमध्ये 50 खाटा, मालवण येथील रेडकर हॉस्पिटलमध्ये 18, कणकवली संजीवनी हॉस्पिटलमध्ये 12, नाटळच्या हॉस्पिटलमध्ये 30 खाटा अधिग्रहित केल्या आहेत. तेथे दाखल होणाऱ्या रुग्णावर उपचार होतात की नाही, हे पाहण्यासाठी नायब तहसीलदार तर बिल शासकीय दरानुसार घेतले जाते की नाही, हे पाहण्यासाठी एक वित्त अधिकारी नियुक्त आहेत.'' 

त्या म्हणाल्या, ""जिल्ह्यात एकूण एक हजार 263 बेड तयार आहेत. यात डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल असलेल्या जिल्हा रुग्णालयात 225, कोविड हेल्थ सेंटरमध्ये 230 तर कोविड केअर सेंटरमध्ये 588 बेड उपलब्ध आहेत. अधिग्रहित चार हॉस्पिटलमध्ये 110 बेड आहेत. सध्या उपलब्ध बेड पुरेसे आहेत. सध्या 773 बेड रिक्त असून, 380 बेड रुग्णासाठी वापरात आहेत. त्यामुळे जिल्ह्यात नवीन बेडनिर्मितीची सध्या गरज नाही; परंतु भविष्यात आणखी बेडची आवश्‍यकता भासल्यास कुडाळ महिला हॉस्पिटल व जिल्हा क्रीडा संकुल येथे बेड तयार करण्यात येतील.'' 

450 रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन उपलब्ध 
मध्यंतरी पूर्ण राज्यात रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा तुटवडा होता. त्यावेळी रत्नागिरी प्रशासनाकडून 100 इंजेक्‍शन घेतली होती. आता आपल्याकडे 500 इंजेक्‍शन उपलब्ध आहेत. त्यातील रत्नागिरीची 100 इंजेक्‍शन देण्यात आल्याने जिल्हा रुग्णालयात 450 इंजेक्‍शन उपलब्ध आहेत. 

ऑक्‍सिजन प्लांट आठ दिवसांत उभाणार
जिल्हा रुग्णालयात 40 एवढे पुरेसे व्हेंन्टीलेटर आहेत. दिवसाला दीडशे ते दोनशे ऑक्‍सिजन सिलिंडर लागतात. जिल्हा नियोजनमधून ऑक्‍सिजनचे 200 जंबो सिलिंडर मागविले आहेत. ऑक्‍सिजन प्लांटचे काम आठ दिवसांत पूर्ण होणार आहे. येथे दिवसाला 250 ऑक्‍सिजन सिलिंडर तयार होणार आहेत, अशी माहिती मंजुलक्ष्मी यांनी दिली. 

संपादन : विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government committee in Sindhudurg to monitor treatment and bills