Ratnagiri Dam Mishap : पुनर्वसन करायचंय; पण कुठे? सरकारकडे जागाच नाही! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जुलै 2019

तिवरे गावात 23 शासकीय जागा आहेत. यातील काही जागा वन विभागाच्या आहेत. मंडल अधिकारी लोकांना चुकीची माहिती देत आहेत. घटना घडली तेव्हाही ते गावात नव्हते. महसूलकडून पंचनामे कसे सुरू आहेत, कोणाचे किती नुकसान दाखवण्यात आले आहे, याची माहिती देत नाहीत. चुकीची माहिती देणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे.'' 
- संतोष शिंदे, तिवरे

चिपळूण : तिवरे धरण दुर्घटनेतून वाचलेल्या कुटुंबीयांचे शासकीय जागेत पुनर्वसन केले जाईल, असे आश्‍वासन खासदार विनायक राऊत यांनी दिले होते. गावात 23 शासकीय जागा उपलब्ध असताना मंडळ अधिकाऱ्यांनी गावात शासकीय जागाच शिल्लक नसल्याची खोटी माहिती ग्रामस्थांना दिल्यामुळे स्थानिक लोक आक्रमक झाले आहेत. 

सोमवारी रात्री 9:30 वाजता घटना घडली तेव्हापासून आतापर्यंत महसूलचे सर्व अधिकारी प्रामाणिक मेहनत घेऊन मदत कार्य करत आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी रात्रीच तिवरे गावात दाखल झाले. तहसीलदार जीवन देसाई यांच्या सासऱ्यांचे निधन झाल्यामुळे ते कोल्हापूरला होते. तेही पहाटे चार वाजता घटनास्थळी दाखल झाले. घटनेच्या ठिकाणी नायब तहसीलदार तानाजी शेजाळ सर्वात अगोदर पोचले होते. तिवरे गावात मोबाईलची सेवा मिळत नाही; मात्र जंगलात काही ठिकाणी मिळते. शेजाळ जंगलात गेले. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांनी संपर्क साधल्यामुळे या घटनेची माहिती सर्वांना मिळाली. त्यानंतर सर्वांनी तिवरेकडे धाव घेतली. आपत्तीतून वाचलेल्या लोकांना जेवण आणि इतर सुविधा मिळवून देण्यासाठी तिवरे गावचे तलाठी नागरगोजे प्रयत्न करीत आहेत. या सर्वांच्या मेहनतीवर मंडल अधिकारी संदेश आयरे यांनी पाणी फेरल्याची प्रतिक्रिया गावात उमटत आहे. 

तिवरे धरण दुर्घटनेतून वाचलेल्या लोकांचे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत तात्पुरते स्थलांतर केले आहे. खासदार विनायक राऊत यांनी गुरुवारी (ता. 4) तिवरे गावाला भेट दिली. घटनेची पाहणी केल्यानंतर ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. दुर्घटनेतून वाचलेल्या लोकांचे सहा महिन्यासाठी तात्पुरते स्थलांतर केले जाईल. नंतर शासकीय जागेत त्यांना घरे बांधून देण्याचे आश्‍वासन दिले. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनीही आपद्‌ग्रस्त लोकांना शासकीय जागेत घरे बांधून देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी शासकीय जागेबाबत चौकशी करण्यास सुरवात केली. कळकवणेचे मंडळ अधिकारी संदेश आयरे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी तिवरे गावात शासकीय जागाच शिल्लक नसल्याचे सांगितले. गावात जेवढ्या स्मशानभूमीच्या जागा आहेत तेवढ्याच शासकीय जागा असल्याचे त्यांनी सांगितले. मंडल अधिकाऱ्यांच्या या विधानाने नव्या वादाला तोंड फुटले आहे. 

"तिवरे गावात 23 शासकीय जागा आहेत. यातील काही जागा वन विभागाच्या आहेत. मंडल अधिकारी लोकांना चुकीची माहिती देत आहेत. घटना घडली तेव्हाही ते गावात नव्हते. महसूलकडून पंचनामे कसे सुरू आहेत, कोणाचे किती नुकसान दाखवण्यात आले आहे, याची माहिती देत नाहीत. चुकीची माहिती देणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे.'' 
- संतोष शिंदे, तिवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: government does not have place for migration of tiware dam victims