कासार्डेतील "पोखरबाव' दुर्लक्षित 

नेत्रा पावसकर
Sunday, 27 September 2020

पर्यटनदृष्टया याचा विकास केल्यास पर्यटन केंद्रेही बनू शकतात. तरी यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज आहे. 

तळेरे (सिंधुदुर्ग) - कोकणातील निसर्ग सौंदर्याबरोबर विविध वास्तूशिल्प व दगडातील कोरीव कामे विविध भागात आढळून येतात. यामध्ये काही पांडवकालीन तर काही प्राचीन काळापासून असल्याची माहिती पुढे येत आहे. अशाप्रकारे कासार्डे भागात पांडवकालीन पोखरबाव (विहीर) असून ती जतन करण्याची वेळ आली आहे. गेली अनेक दशके या विहीरी दुर्लक्षित असून यासाठी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने यांना उर्जितावस्था आणून पर्यटनदृष्टया याचा विकास केल्यास पर्यटन केंद्रेही बनू शकतात. तरी यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज आहे. 

जिल्ह्यातील विविध भागात प्राचीन काळातील तसेच पांडवकालीन गुंफा, कातळशिल्प व पोखरबाव (विहीरी) आढळून येतात. यातील काही ठिकाणी असणाऱ्या या अनमोल ठेव्याचे जतन करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. जिल्ह्यातील विविध भागात असणाऱ्या या सर्वांचे पुरातन विभागाकडून दुर्लक्ष झाले आहे. काही मोजक्‍या ठिकाणी याचा विकासही झालेला दिसत आहे. सध्याचे तरुण व तरुणींमध्ये याचे आकर्षण आहे. यामुळे अनेक युवक, युवती,मंडळे यासाठी पुढाकार घेऊन काम करताना दिसून येत आहेत. 

पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गमध्ये विविध भागात भुयारी विहीरी पाहावयास मिळत असून अशाप्रकारच्या विहीरी कासार्डेतील माळरानावर पहावयास मिळतात. या भागात माळरानावर असणाऱ्या कातळावर कोरीव काम करीत पांडवकालीन विहीरी पहावयास मिळत आहेत. या विहीरी पांडवानी एका रात्रीत खोदल्या आहेत, अशी अख्यायिका आहेत. या विहीरीच्या दोन बाजूला एक लहान व एक मोठा चौकोनी आकाराची आतमध्ये उतरण्यासाठी व्दारे आहेत. आतमध्ये उतरण्यासाठी दहा ते पंधरा पायऱ्या असून आत दोन भाग आहेत. यातील पाण्याचा अंदाज अजूनही आलेला नसून मे अखेरपर्यंत यामध्ये पाणी असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. 

संशोधनाचा विषय 
कासार्डेतील मुंबई-गोवा महामार्ग व तळेरे पियाळी मार्गे फोंडा जिल्हा मार्गावर अशा विहीरी आढळतात. तसेच दगडी कातळात पोखरून खोदाई करून विहीरी बनविल्याने याला "पोखरबाव' म्हटले जाते. ग्रामीण भागात विहरींना "बाव' म्हणण्याची पद्धत आहे. या साऱ्यांचा शोध घेतला असता या भागाचा पुरातन इतिहास समोर येऊ शकेल. अभ्यासकांनी याची विशेष दखल घेतल्यास संशोधनाचा विषयही ठरु शकेल. तरी शासनाच्या अशाप्रकारच्या विहिरीची जतन करून पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याची मागणी केली जात आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government neglect of the well at Casarde