esakal | मिरकरवाडात शुकशुकाट : शासकीय मुहूर्ताच्या पहिल्याच दिवशी निसर्गाने दिली साथ मात्र...
sakal

बोलून बातमी शोधा

governtment order fishing ban period but fisherman took advantages nature environment

 मासेमारीसाठी रवाना झालेली मच्छीमारी नौका. 

मोजक्‍याच मच्छीमारांनी साधला मुहूर्त 

वातावरण पोषक; मुहूर्ताला सापडला बांगडा, चिंगुळ, सौदाळा 

मिरकरवाडात शुकशुकाट : शासकीय मुहूर्ताच्या पहिल्याच दिवशी निसर्गाने दिली साथ मात्र...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : शासनाच्या आदेशानुसार मच्छीमारी बंदी कालावधी संपुष्टात आल्यावर पोषक वातावरणाचा फायदा काही मच्छीमारांनी घेतला. स्थानिक खलाशी आणि उपलब्ध असलेले मच्छीमार समुद्रात रवाना झाले. मात्र, वातावरणाचा काही नेम नाही, या भीतीने गिलनेटने मासेमारी करणारे मच्छीमार 15 गावात जाऊन मासेमारी करण्याच्या मानसिकतेत नव्हते. या मुहूर्ताला बांगडा, चिंगुळ, सौदाळा अशी मासळी त्यांच्या जाळ्यात सापडली. 


शासनाने 1 जून ते 31 जुलै या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी मासेमारीवर बंदी घातली होती. हा हंगाम पावसाळी आणि माशांचा प्रजनन काळ असल्याने मच्छीमारही मासेमारीला जात नाहीत. बंदी कालावधी संपुष्टात आला असून, शनिवारी मुहूर्त साधण्याचा काहींचा मानस होता. ट्रॉलिंग, गिलनेटद्वारे मासेमारीला सुरवात होते. पर्ससिननेटद्वारे मासेमारीला 1 सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. मागील हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात कोरोनामुळे मच्छीमारी हंगामाला फटका बसला होता. सुमारे दीड महिना मासेमारी बंद होती. शिथिलता मिळाल्यावर मासेमारीला सुरवात झाली असली तरीही निर्यातीसह परराज्यांत मासे पाठविणे शक्‍य होत नव्हते. त्यामुळे स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या दरावरच त्यांना अवलंबून राहावे लागले. त्याचा परिणाम उत्पन्नावर झाला.

हेही वाचा - दैव बलवत्तर! काळ आला होता, पण...

जून, जुलैमध्येही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने मत्स्य हंगाम अडचणीत आला आहे. ट्रॉलिंग मासेमारीसाठी बहुतांश मच्छीमार परराज्यांतील खलाशी बोलावतात. बंदी सुरू होण्यापूर्वी ते खलाशी गावी परतले. त्यांना परत आणण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे बहुतांश मच्छीमारांची समुद्रात जायची तयारी झालेली नाही. त्यामुळे सर्वांत मोठे बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरीतील मिरकरवाडा येथे शुकशुकाट होता.

हेही वाचा - हायवे ठेकेदारासह देखरेख कंपनीवर गुन्हा दाखल करण्याचा प्रस्ताव देणार... कणकवलीवासियांना कुणी केले आश्वस्त... वाचा


शासकीय मुहूर्ताच्या पहिल्याच दिवशी निसर्गानेही साथ दिलेली आहे; परंतु ईदमुळे मोजक्‍याच लोकांच्या नौका समुद्रात सोडल्या आहेत. यातही ट्रॉलिंग करणाऱ्यांची संख्या अत्यल्प असून, गिलनेटद्वारे मासेमारी करणाऱ्यांचा टक्‍का अधिक आहे. वरवडे येथील छोटे मच्छीमार सकाळच्या सत्रात समुद्रात गेले होते. त्यांना कोळंबी, बांगडा, सौदाळा यासारखी मासळी मिळाल्याचे समजते. 

संपादन ः स्नेहल कदम