esakal | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ ; उदय सामंत
sakal

बोलून बातमी शोधा

gram panchayat election 2021 uday samant

आम्ही सुसंस्कारित आहोत पण जशास तसे उत्तर देण्याची ताकद माझ्या तरुण कार्यकर्त्यांमध्ये आहे

अंगावर आलात तर शिंगावर घेऊ ; उदय सामंत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - शिवसेनेमध्ये कोणताही नवा-जुना वाद नाही. राजकीय अस्तित्वासाठी भाजप हतबल झाल्यामुळे वाद उकरून काढण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. शिवसेना तळागाळात रुजली आहे. त्यामुळे ज्यांना सेनेने अनेक पदे दिली. अनेकांनी त्यांच्यासाठी त्याग केला ते शिवसैनिक आता पेटून उठले आहेत. गोळप ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाविरोधात बंडखोरी करणाऱ्या साळवींची येथील मक्तेदारी आम्ही मोडीत काढू, असा इशारा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिला. 

गोळप ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल (ता. 11) रात्री झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी उद्योजक अण्णा सामंत, नगराध्यक्ष तथा तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी, ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य उदय बने, नंदकुमार मुरकर, विठ्ठल पावसकर, तालुका युवा अधिकारी तुषार साळवी, शहरप्रमुख बिपिन बंदरकर, राकेश साळवी, बावा चव्हाण यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोळप ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या अधिकृत पॅनेलविरोधात सेनेचे पंचायत समितीचे माजी सभापती मंगेश साळवी यांनी स्वत:चे पॅनेल उभे केले आहे. त्यामुळे ही निवडणूक सेनेने प्रतिष्ठेची केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर काल ही सभा झाली. 

सामंत म्हणाले, माजी सभापती मंगेश साळवी यांची स्वत:च्या अस्तित्वासाठी गोळप गावात लढाई सुरू आहे. ग्रामपंयायतीमध्ये एवढं काय असतं, त्यांनाच माहित पण आम्ही संस्कारक्षम आहोत. निवडणुका सुसंस्कृतपणे लढतो. त्यासाठी दोनवेळा त्यांना चर्चेला बोलावून बिनविरोध करण्याचा प्रयत्न होता. रत्नागिरी, सिंधुदुर्ग दोन्ही जिल्ह्यात शिवसेनेची मोठी ताकद आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या सोबतच गाव राहील, याची खात्री आहे. याआधी माझा शिवसैनिक साळवींच्या मागे उभा राहिला. त्याच्यासाठी त्याग केला. तेच बंडखोरी करत असतील तर त्यांची मक्तेदारी नक्की मोडीत काढू. 

हे पण वाचाधक्कादायक : गुंगीचे औषध देऊन डांबले अन् मुलीला ठार करण्याची धमकी देऊन गर्भवतीवर केले आत्याचार

अंगावर आलात तर शिंगावर घेऊ

ज्यांना शिवसेनेने भरभरून दिले तेच मंगेश साळवी कणकवलीचे समर्थन गोळपमध्ये घेऊन या निवडणुकीत दादागिरी करणार असतील तर ते सहन केले जाणार नाही. आम्ही सुसंस्कारित आहोत पण जशास तसे उत्तर देण्याची ताकद माझ्या तरुण कार्यकर्त्यांमध्ये आहे. अंगावर आले तर शिंगावर घेऊन, असा इशाराही सामंत यांनी दिला.


संपादन - धनाजी सुर्वे 

loading image