कोंबड्या, मद्याच्या बाटलीची प्रचारात चर्चा ; पावसकरांचा फोटो सोशल मीडियावर वायरल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 January 2021


ग्रामपंचायत निवडणूक शिवसेना तालुकाप्रमुखांकडून खुलासा; पावसकर बहुमताने निवडून येणार

पावस (रत्नागिरी) :  येथील क्रिक्रेट स्पर्धेला दिल्या जाणाऱ्या कोंबडी आणि मद्याच्या बाटलीच्या अनोख्या बक्षिसांवरून चांगलीच राजकीय चर्चा सोशल मीडियावर रंगली. अशा प्रकारचे बक्षीस देऊन स्पर्धक आणि या खेळाचा अपमान असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या. यावर शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी प्रतिक्रिया दिली, की बक्षीस वितरणासाठी आलेल्या लोकप्रतिनिधीचा या बक्षिसाशी काही संबंध नाही. आयोजकांनी दिलेल्या वस्तू सुभाष पावसकर यांनी दिल्या. ते आपल्या खिशातून घेऊन आले नव्हते. 

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक सुरू आहे. प्रचार तापत असताना काही आक्षेपार्ह छायाचित्रे आणि बातम्या समोर येत आहेत. त्यापैकी पावस येथील कोंबड्या आणि मद्याची बाटली बक्षीस म्हणून वितरित केल्याचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. पावस येथील प्रभाग क्रमांक एकचे उमेदवार सुभाष पावसकर यांचा हा फोटो आहे. दोन दिवसापूर्वी एका क्रिकेट स्पर्धेच्या बक्षिस समारंभावेळी कोंबडी आणि दारूची बाटली देतानाचा फोटो वायरल झाला. त्यावर प्रतिक्रिया देताना सेनेचे तालुकाप्रमुख बंड्या साळवी म्हणाले, पावसकर दारूची बाटली घेऊन तिथे गेले नव्हते तर आयोजकांनी त्यांना बक्षीस देण्यासाठी बोलावले, म्हणून ते गेले होते. समोरच्या लोकांना आपले अपयश दिसायला लागले असल्यानेच ते खोटी बातमी पसरवत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा- आता घुमणार महाराष्ट्राच्या तांबड्या मातीतील रांगड्या मल्लांचा शड्डू -

त्यांच्या हातात आयोजकांनी दिलं...
ग्रामपंचायतीचे प्रभाग क्रमांक एकचे उमेदवार सुभाष पावसकर हे सेनेचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. सेनेने त्यांना अधिकृत उमेदवारी दिलेली आहे. बक्षीस समारंभात घडलेल्या गोष्टीबाबत त्यांचा काहीही संबंध नाही. कोंबडी असेल वा बाटली असेल, त्यांच्या हातात आयोजकांनी दिलं, ते त्यांनी दिलं. सुभाष पावसकर बहुमताने निवडून येणार असून, विरोधक चुकीच्या बातम्या पसरवत असल्याचा आरोपही साळवी यांनी केला आहे.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram Panchayat Election hens bottle party in ratnagiri