आता प्रतीक्षा निकालाची; गावकारभाऱ्यांचे भवितव्य मतपेटीत 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 January 2021


सावंतवाडी तालुक्‍यासह इतरत्र उत्साहात मतदान 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी उत्साहात मतदान झाले. कित्येक मतदान केंद्रांवर ग्रामस्थांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, सावंतवाडी तालुक्‍यात 11 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदान झाले. सकाळी अकरापर्यंत 17.10 टक्के मतदान झाले. तालुक्‍यातील दांडेली येथील प्रभाग क्रमांक दोनमधील मतदान मशीनमध्ये तांत्रिक अडचण जाणवली. एकूणच प्रक्रिया शांततेत पार पडली. आता 18 रोजीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सावंतवाडी तालुक्‍यातील अकरा ग्रामपंचायतीसाठी आज मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. तालुक्‍यात 119 जागांसाठी 265 उमेदवार निघणार असून आपला योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदान प्रक्रियेत आपला सहभाग घेतला. तत्पूर्वी मतदान केंद्रावर मतदान अधिकारी केंद्राध्यक्ष अशी चार ते पाच जणांची टीम यावेळी मतदान प्रक्रिया सुलभ होण्यासाठी कार्यरत झाली होती. कुठलाही गैरप्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांची टीम कार्यरत होती. त्यामध्ये एक पोलीस अधिकारी, एक पोलीस कर्मचारी आणि एक होमगार्ड असे होते. मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदारांना सॅनिटायझर देण्यात येत होते. थर्मल गनने मतदारांच्या शरिराचे तापमान मोजण्यात येत होते. 

दरम्यान, कोलगावमध्ये दुपारपर्यंत शांततेत मतदान झाले. यावेळी मतदान केंद्राबाहेर निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांसह त्या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदची रंगीत तालीम म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीकडे पाहिले जात असल्याने या निवडणुकीत पंचायत समिती, जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठान लावली. आपल्या गावातून जास्तीत जास्त ग्रामपंचायत सदस्य निवडून देण्यासाठी गावातील स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सकाळपासूनच त्यांनी मतदान केंद्राच्या 100 मीटर बाहेर अंतरावर सकाळपासूनच तळ ठोकला होता.

हेही वाचा- 'आहात त्या घरात सुखाने नांदा', असला पोरकटपणा करू नका

गावातील पक्षीय कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी काही मतदारांना करण्याची सोय त्या कार्यकर्त्यांकडून होताना दिसून येत होती. तालुक्‍यातील कोलगाव, तळवडे, मळगाव, चौकुळ, आंबोली यासारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या प्रभागमध्ये मतदान केंद्रावर सकाळच्या सुमारास गर्दीचे चित्र होते. तर आरोस दांडेली, डिंगणे, आरोंदा यासारख्या छोट्या लोकसंख्येच्या गावातील मतदान केंद्रावर सकाळच्या सुमारास कमी मतदार दिसून येत होते; मात्र मतदान केंद्राच्या प्रक्षत्र बाहेर मात्र गर्दीचे वातावरण होते. 

दांडेलीत मतदान यंत्रात बिघाड 
दांडेली येथे मतदानात सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही वेळात प्रभाग क्रमांक दोनवरील मतदान यंत्राचे एक बटण दाबले जात नव्हते. मतदान यंत्रात बिघाड असल्याचे यावेळी दिसून आले. याबाबतची कल्पना तेथील केंद्राध्यक्ष यांना देण्यात आली. त्यानंतर काही वेळानंतर ही तांत्रिक समस्या दूर करण्यात आली. यावेळी येथील पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांनी तालुक्‍यातील सर्व अकराही गावातील मतदान केंद्रांना भेट दिली.  

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat election kokan update