चुकीची पुनरावृत्ती ग्रामपंचायत निवडणुकीत नको ः केसरकर

रुपेश हिराप
Thursday, 14 January 2021

महाविकास आघाडीत कॉंग्रेसकडून झालेली बिघाडी योग्य नाही. कॉंग्रेसकडून याचा विचार होणे गरजेचे आहे. याच बिघाडामुळे नगराध्यक्ष पोटनिवडणुकीतही महाविकास आघाडीला पराभव पत्करावा लागला होता.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत सत्ताबदलानंतर सावंतवाडीतील जनतेला आणि व्यापारी वर्गाला पश्‍चाताप सहन करावा लागत आहे. सावंतवाडीची पुनरावृत्ती ग्रामपंचायत निवडणुकीत होऊ देऊ नका, असे प्रतिपादन माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे केले. 

महाविकास आघाडीत कॉंग्रेसकडून झालेली बिघाडी योग्य नाही. कॉंग्रेसकडून याचा विचार होणे गरजेचे आहे. याच बिघाडामुळे नगराध्यक्ष पोटनिवडणुकीतही महाविकास आघाडीला पराभव पत्करावा लागला होता. याबाबत आपण कॉंग्रेस नेत्याचे लक्ष वेधणार असेही केसरकर म्हणाले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केसरकर यांनी आज निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली.

ते म्हणाले, ""ग्रामपंचायत निवडणूक ज्या गावांमध्ये आहेत त्यांचा दौरा केला आहे. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. कार्यकर्त्यांमध्ये भरपूर उत्साह असून मी केलेल्या विकासकामांची जनतेला जाण आहे; मात्र जिल्हा नियोजनमधूनही दिलेल्या निधीचे श्रेय याठिकाणी विरोधक घेत आहेत. सावंतवाडी शहराचा विचार केला असता याठिकाणी 90 टक्के विकासकामांसाठी निधी दिला आहे; मात्र केवळ सत्ता आली म्हणून विकासकामाचे भूमिपूजन कोणाच्याही हातून केले जात आहे.

या शहराला अनधिकृत स्टॉलपासून मुक्त करून एकही रुपया न घेता स्टॉलधारकांचे पुनर्वसन केले होते; मात्र आज त्याठिकाणी व्यापाऱ्यांना तसेच स्टॉलधारकांना धमक्‍या दिल्या जात आहेत. या धमक्‍यांचे स्तोम आता ग्रामीण भागाकडेही पोहोचले आहे; मात्र ग्रामीण जनतेने त्याला भीक न घालता आपल्या गावाचा विकासात्मक दृष्टिकोन, सुसंस्कृतपणा कायम ठेवावा. एकदा चूक झाली तर पुढची पाच वर्षे पश्‍चाताप करावा लागेल. त्यामुळे आमिषाला बळी पडू नका.'' 

केसरकर म्हणाले, की ""मंत्री असताना मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे; मात्र तो निधी गावामध्ये पोहोचला आहे, की नाही, त्याचे काम सुरू आहे, की नाही? हे पाहण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता; मात्र काही ठिकाणी आजही ती कामे सुरू आहेत. रस्ते, पाणी, वीज या गोष्टी खूप झाल्या. येथील युवकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी ओपन जिम देण्याचा प्रयत्न आहे. महिलांना व बेरोजगार युवकांच्या हाताला रोजगार मिळण्यासाठी पुढील दीड वर्ष सातत्याने ग्रामीण भागात राहणार आहे.'' 

ते म्हणाले, ""आजही ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गावागावांमध्ये कुठलेही राजकारण होऊ नये ही इच्छा आहे; परंतु याठिकाणी पुन्हा अपप्रवृत्तींनी डोके वर काढण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत जशी जिल्ह्यात शांतता टिकून होती तशीच पुढे राहिली पाहिजे. यासाठी सर्वांनी विचारपूर्वक मतदान करा.'' 

सहा महिन्यांत फाईव्ह स्टार हॉटेल 
आरवली वेतोबा मंदिर हे देवस्थान खूप मोठे आहे. याठिकाणी पर्यटकांची रीघ असते. त्याचबरोबर सागरतीर्थ हे पर्यटन क्षेत्रही पर्यटनाच्या नकाशावर आले आहे. त्यामुळे या भागाचा विकास व्हावा, त्यासाठी कटिबद्ध असून सहा महिन्यांत जिल्ह्यातील पहिले फाईव्हस्टार हॉटेल आरवलीमध्ये सुरू होणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat election statement mla deepak kesarkar