पर्यावरणपुरक छंद..! बांबूपासून आकर्षक कलाकृती

एकनाथ पवार
Saturday, 2 January 2021

नाधवडे सरदारवाडी येथील श्री. सावंत यांनी बांबुपासून वेगवेगळ्या वस्तुरूपी आकर्षक कलाकृती साकारण्याचा छंद गेल्या काही वर्षांपासून जपला आहे.

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - बांबूपासून पर्यावरणपुरक आणि आकर्षक वस्तू बनविण्याचा छंद नाधवडे सरदारवाडी येथील नंदकुमार सावंत यांनी जपला आहे. वस्तू बनविण्याचे कोणतेही प्रशिक्षण त्यांनी घेतलेले नाही. तरीही निव्वळ अनुभवातून एखाद्या कुशल कारागिराप्रमाणे ते बांबूच्या एकापेक्षा एक कलाकृती साकारत आहेत. 

प्रत्येक माणसाला कोणता ना कोणता छंद असतो. कुणाला एखाद्या खेळाचा तर कुणाला शेतीचा. कुणाला समाजकारणाचा तर कुणाला राजकारणासह विविध छंद असतात; परंतु नाधवडे सरदारवाडी येथील श्री. सावंत यांनी बांबुपासून वेगवेगळ्या वस्तुरूपी आकर्षक कलाकृती साकारण्याचा छंद गेल्या काही वर्षांपासून जपला आहे. श्री. सावंत यांची अनेक वर्ष मुंबईत गेली. काही वर्षापूर्वी ते गावी नाधवडे येथे आले.

गावातील शेतीसोबत समाजकारण करण्याची त्यांना आवड आहे. बांबुपासून पांरपरिक टोपल्या, सुप, भात ठेवण्यासाठी तटे, कणगुल, डाळी अशा वस्तू अनेक लोक बनवितात; परंतु त्याच बांबुपासून आपण इतर वस्तू देखील बनवू शकतो, अशी कल्पना त्यांना पाच सहा वर्षापुर्वी सुचली. कल्पना सुचल्यानंतर ते थांबले नाहीत. त्यांनी ती कल्पना कृतीत उतरविण्यास सुरूवात केली.

या विषयात पूर्णतः नवखे असलेल्या श्री. सावंत यांनी सुरूवातीला एक साधीशी वस्तू बनविण्याचा प्रयत्न केला; परंतु तो बांबुपासून काढलेले साहित्य जोडताना त्यांना अडचण येवू लागली. त्यामुळे त्यांनी बांबू तोडून त्याचे उपयोगात येतील असे तुकडे तुकडे करून काही दिवस पाण्यात टाकुन ठेवले. त्यानंतर पुन्हा वस्तू बनविण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आले. बांबू टिकण्यासाठी ही प्रकिया उपयोगी पडते हे देखील त्यांच्या लक्षात आले. दिवाळीला प्रत्येक जण आकाशकंदील लावत असतो; परंतु त्यांनी बांबुपासून इको फ्रेंन्डली आकाशकंदील तयार करून लावण्याचा प्रयत्न सुरू केला.

पहिल्याच प्रयत्नात त्यांनी अतिशय उत्तम दर्जाचा आणि सुबक कलाकृतीचा नमुना ठरेल, असा आकाशकंदील तयार केला. त्यामध्ये लाईट लावल्यानंतर त्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसू लागले. या यशस्वी प्रयोगानंतर त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. त्यानंतर त्यांनी बांबुपासून घराची प्रतिकृती, बैलगाडी, डोली, विविध आकाराचे ट्रे, गणपतीचे मकर, पेन स्टॅन्ड, पिंजरा आणि त्यामध्ये बांबुपासून बनविलेला पक्षी, होडी, लॅम्प अशा विविध वस्तू बनविण्यास सुरूवात केली. या सर्व वस्तू इको फ्रेंन्डली असल्यामुळे लोकांकडून त्यांच्याकडे मागणी येऊ लागली. कधीही व्यावसायिक विचार न करता माफक दरात ते लग्नातील रूकवाताला लागणारे साहित्य लोकांना तयार करून देऊ लागले.

याशिवाय गणेश चतुर्थीला बांबुपासून तयार केलेले मकर ते मागणीनुसार पुरवितात. त्यांनी बनविलेल्या पर्यावरणपुरक मकर मनमोहक ठरलेली आहे. त्यांनी बनविलेल्या काही वस्तू कृषी विभागाच्या कृषी प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. बांबुपासून घरगुती वापरांसह अनेक शोभिवंत वस्तू सहज आणि साध्या पध्दतीने बनविता येऊ शकतात. सध्या संपूर्ण जग प्लास्टीक मुक्तीच्या प्रयत्नात आहे. अशा कालखंडात श्री. सावंत यांचा पर्यावरण पुरक वस्तू बनविण्याचा छंद खारीचा वाटा नक्कीच उचलु शकेल, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. 

कोकणात बांबू सहज उपलब्ध 
कोकणात बांबू सहजपणे उपलब्ध होतो. पूर्वी घरातील बहुतांशी वस्तू बांबुपासुन बनविलेल्या असत; परंतु कालानुरूप त्या वस्तूची जागा प्लास्टीक, फायबरच्या वस्तूंनी घेतली आहे; परंतु त्याचे दुष्पपरिणाम आता दिसू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा बांबूच्या वस्तूचे महत्व अधोरेखीत होऊ लागले आहे. बांबुपासून बनविलेल्या वस्तू पर्यावरणपुरक तर आहेतच; पण त्यापेक्षा त्या सहज उपलब्ध होणाऱ्या आहेत. याशिवाय बांबूपासूनच्या वस्तू विक्रीत वाढ आणि बांबु व्यवसाय वाढल्यास त्याचा शेतकऱ्यांनाच फायदा होईल. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Great artwork made bamboo nadhavade konkan sindhudurg