कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने कणकवलीवासियांच्या चिंतेत भरच

राजेश सरकारे
Sunday, 26 July 2020

कोरोना समूह संसर्ग रोखण्याचे आरोग्य यंत्रणेपुढे आव्हान आहे.

कणकवली / ओरोस : कोरोनाबाधितांच्या संख्येत सतत वाढ होत असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुकावासीयांची चिंता वाढली आहे. नव्याने सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ते सर्व जण राजकीय संपर्कातील आहेत. यामध्ये शिवसेना नेते संदेश पारकर यांचा कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. तालुक्‍यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 131 झाली आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या 319 झाली आहे. शहर बाजारपेठेतील पारकर यांच्या निवासस्थानाचा 50 मीटर परिसर आज पुन्हा सील करण्यात आला. 

संदेश पारकर यांचा कोरोना अहवाल दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर शनिवारी त्यांच्या कुटुंबातील अन्य चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर आमदार नाईक यांच्या चुलत भावाच्या संपर्कातील वागदे येथील एकाचा आणि जानवली गावातील एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने राजकीय कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

कणकवली शहरात 23 रोजी बाजारपेठ आणि सिद्धार्थनगरमधील एका व्यक्‍तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर हे दोन्ही भाग पत्रे लावून सील केले होते. यात बाजारपेठेतील भाग सील करताना वादंग झाले होते. त्यानंतर राजकीय पदाधिकाऱ्यांनी नेतेमंडळींशी चर्चा केली. त्यामुळे काल (ता. 24) रात्री नऊच्या सुमारास बाजारपेठेतील पत्रे काढून टाकले. तर आज या मुद्द्यावर पुन्हा राजकीय वातावरण तापल्याने बाजारपेठ आणि सिद्धार्थनगरमधील 50 मीटर परिसर पुन्हा पत्रे लावून सील करण्यात आला. 

येथील नगरपंचायतीच्या एका कर्मचाऱ्याचाही अहवाल शुक्रवारी (ता. 24) रात्री पॉझिटिव्ह आला होता. आज त्या कर्मचाऱ्याच्या घराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले, तर त्या कर्मचाऱ्याच्या संपर्कात असलेल्या नगरपंचायतमधील डाटा एंट्री ऑपरेटर कर्मचाऱ्यांना गृह विलगीकरण करण्याचे निर्देश नगरपंचायत प्रशासनाने दिले आहेत. 

कोरोना समूह संसर्ग रोखण्याचे आरोग्य यंत्रणेपुढे आव्हान आहे. शहरातील एक ज्येष्ठ व्यक्‍ती काही दिवसांपूर्वी घरपट्टी भरण्यासाठी नगरपंचायतमध्ये आली होती. ती व्यक्‍ती नंतर कोरोना पॉझिटिव्ह निघाली. या व्यक्‍तीपासून नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. आमदार नाईक आणि शिवसेना नेते पारकर यांच्या संपर्कातील व्यक्‍तींचीही संख्या मोठी आहे. त्यामुळे कोरोना समूह संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे आहे. त्या अनुषंगाने नाईक, पारकर यांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्‍तींचे स्वॅब नमुने आरोग्य विभागाकडून घेतले जात आहेत. 

दरम्यान, जिल्ह्यात आज आणखी सहा कोरोनाबाधित अहवाल आले आहेत. परिणामी जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 319 झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 63 झाली आहे. एकाला घरी सोडण्यात आल्याने कोरोनामुक्तांची संख्या 250 झाली आहे. 
जिल्ह्यात शुक्रवारी (ता. 24) रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार आणखी 7 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. त्यामध्ये कुडाळ तालुक्‍यातील 2, कणकवली तालुक्‍यातील 1, सावंतवाडी तालुक्‍यातील 3 व्यक्तींचा समावेश आहे. यात सावंतवाडी तालुक्‍यातील तिरोडा येथील 1, कारिवडे येथील 1, सावंतवाडी सबनीसवाडा 1 तर कुडाळ शहरातील भैरववाडी येथील 2 आणि कणकवली शहरातील 1 अशा प्रकारे रुग्णांचा समावेश आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्‍यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. राजापूर तालुक्‍यातील या रुग्णांची तपासणी खासगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये केली. त्यामध्ये त्याचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याविषयीची माहिती रत्नागिरी जिल्हा प्रशासनास देण्यात आली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी सांगितले आहे. 

जिल्ह्यातील संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये 704 व्यक्ती वाढल्याने येथे 17 हजार 158 व्यक्ती दाखल राहिल्या आहेत. यातील शासकीय संस्थात्मक क्वारंटाइनमधील 2 व्यक्ती कमी झाल्याने येथील संख्या 52 झाली आहे. गावपातळीवरील संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये 664 वाढल्याने येथील संख्या 13 हजार 857 झाली आहे. नागरी क्षेत्रातील संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये 42 व्यक्ती वाढल्या असून येथील संख्या 3 हजार 249 झाली आहे. जिल्ह्यात नव्याने 1 हजार 755 व्यक्ती दाखल झाल्याने 2 मेपासून जिल्ह्यात दाखल होणाऱ्या व्यक्तींची संख्या 1 लाख 49 हजार 563 झाली आहे. 

राजापूर येथील एक व्यक्ती बाधित 
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्‍यातील एक व्यक्ती सिंधुदुर्गात बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्ह्यातील एका मेडिकल कॉलेजमध्ये त्यांनी कोरोना टेस्ट दिली होती. ती बाधित आली आहे. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी रत्नागिरी जिल्हा आरोग्य यंत्रणेला कळविले आहे. 

हे पण वाचा - गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना प्रवासात सवलतीसाठी कोण जाणार मुख्यमंत्र्यांकडे... वाचा -

मोठा दिलासा 
आमदार वैभव नाईक यांच्या संपर्कात आलेल्या बहुसंख्य लोकांची कोरोना तपासणी निगेटिव्ह आली आहे. नाईक यांच्या संपर्कातील आतापर्यंत केवळ सहा व्यक्ती बाधित आढळल्या आहेत. संपर्कात आलेल्या जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब यांचा निगेटिव्ह अहवाल आलेल्यांत समावेश आहे. 
 
हे पण वाचा - नाणार होणे अशक्यच; पण दोनशे एकरात नवा प्रकल्प आणणार... कोणी केली कोकणवासियांसाठी घोषणा...

संपादन ः विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The growing number of coronavirus is a source of concern for the people of Kankavli