गुहागर : चौथीतील मुलांच्या चौकस वृत्तीने सापडली सायकल

चाणाक्षपणाने केली खात्री ; हरवलेली सायकल सहा तासांत सापडली
ग्रंथा बोले आणि कैवल्य भोसले
ग्रंथा बोले आणि कैवल्य भोसलेsakal

गुहागर : एका मंदिराजवळ उभी असलेली सायकल पाहून चौकस मुलांच्या मनात शंका येते. ही सायकल आपल्याच मित्राची असावी, या शंकेपोटी मित्राला फोन लावतात. हा मित्र सायकलची ओळख पटावी म्हणून त्यांना सायकलचा फोटो व्हॉटस्‌ ॲप करण्यास सांगतो. मोबाईलवरचा फोटो सायकल हरवलेल्या मित्राला दाखवतो आणि सकाळी हरवलेल्या सायकलचा अवघ्या ६ तासांत शोध लागतो. म्हटलं तर घटना साधीच; पण चौथीमधील ११ वर्षांच्या मुलांमधील चौकस, चाणाक्षपणा आणि तंत्रस्नेही वृत्तीमुळे हरवलेल्या सायकलचा शोध लागतो. हा शोध निश्चित कौतुकास्पद आहे.

हे नाट्य गुहागर आणि आरेगावमध्ये घडले. गुरुवारी (ता. २४) सकाळी वरचापाट येथील अर्णव घाणेकर याची सायकल अंगणातून अज्ञान व्यक्ती घेऊन जाते. गंमत म्हणजे अर्णवची सायकल नेताना ही व्यक्ती दुसरी सायकल तेथे ठेवते. अर्णवचे आई-बाबा आजूबाजूला चौकशी करतात; पण सायकलचा मालक आणि हरवलेली सायकल शोधण्याचा धागा मिळत नाही. हिरमुसलेला अर्णव शाळेत गेल्यावर वर्गातील मित्रांना सायकल चोरीला गेल्याबद्दल सांगतो. त्यामुळे अर्णवची सायकला हरवल्याची गोष्ट श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्राथमिक शाळेतील सर्वांपर्यंत पोचते. दुपारी १ च्या दरम्यान शाळा सुटते आणि मुले आपापल्या घरी जायला निघतात.

आरेगावातील ग्रंथा बोले आणि कैवल्य भोसले हे दोघे आरेगावात श्रीराम मंदिराजवळ राहतात. घरी जात असताना सहज त्यांचे लक्ष श्रीराम मंदिराजवळ उभ्या असलेल्या सायकलकडे जाते. ग्रंथा आणि कैवल्य यांच्यातील चौकस वृत्ती जागृत होते. ही सायकल अर्णवचीच असेल का, असा प्रश्न पडल्यावर ही मुले आपल्या पालकांना हरवलेल्या सायकलची गोष्ट सांगतात. मग पालक मंदिराजवळील सायकलची चौकशी करतात. तेव्हा ही सायकल सकाळपासून तिथे असल्याचे लक्षात येते. ग्रंथा आणि कैवल्य वरचा पाटमध्ये राहणाऱ्या वरदला फोन करून मंदिराजवळ एक सायकल सकाळपासून उभी असल्याचे सांगतात. ग्रंथा आणि कैवल्यने केलेले वर्णन अर्णवच्या सायकलशी मिळतेजुळते असते. तरीही खात्रीसाठी चाणाक्ष वरद या दोघांना त्या सायकलचा फोटो व्हॉटस्‌ ॲप करायला सांगतो. आईच्या मोबाईलवर आलेला फोटो वरद धावत जाऊन अर्णवला दाखवतो. तेव्हा ही सायकल अर्णवचीच असल्याचे निश्चित होते. अशाप्रकारे सहा तासांनी हरवलेल्या सायकलचा शोध संपतो.

मुख्याध्यापकांकडून कौतुक

चौथीतील मुलांनी चौकस वृत्तीने, चाणाक्षपणे आणि मोबाईलचा योग्य वेळी अचूक वापर करत हरवलेली सायकल शोधली. म्हणून श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक यांनी मुलांना शाबासकी देऊन, बक्षीस देऊन कौतुक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com