गुहागर-विजापूर मार्गाचे राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतर

- मुझफ्फर खान
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

जमिनींना सोन्याचा भाव; गावांना फायदा, दळणवळण वाढणार

चिपळूण - कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणारा गुहागर-विजापूर मार्ग या महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्गाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. हस्तांतराची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली. 

जमिनींना सोन्याचा भाव; गावांना फायदा, दळणवळण वाढणार

चिपळूण - कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणारा गुहागर-विजापूर मार्ग या महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्गाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. हस्तांतराची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली. 

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने एन. एच १६६-गुहागर-विजापूर महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला. याची अंतिम मंजुरी गेल्या महिन्यात देण्यात आली. १८३.८० किमी लांबीच्या या मार्गाची देखभाल दुरुस्ती राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवरील खर्चाचा बोजा कमी होईल. कराड आणि गुहागरमध्ये काही ठिकाणी रस्त्याचे चौपदरीकरण झाले आहे. उर्वरित भागात सध्या हा महामार्ग दुपदरी आहे. भविष्यात संपूर्ण मार्गाचे चौपदरीकरण करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. त्यासाठी लवकरच जमीन अधिग्रहण केली जाईल. कोकणातील सर्वाधिक अवघड वळण असलेला कुंभार्ली घाट याच मार्गावर आहे. घाट रस्त्यावरील डोंगराळ भागात कातळाचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे घाट रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी शासनाला कोट्यवधी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. आवश्‍यक त्या ठिकाणी पूल उभे करावे लागणार आहे.

कशेडी घाटातील दरडी कोसळल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाची तारांबळ होते. कुंभार्ली घाट यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्यामुळे येथे कोसळलेल्या दरडी हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याला प्रयत्न करावे लागत होते; मात्र यापुढे दरडी हटविण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाला करावे लागणार आहे. पेढांबे येथील कोयना अवजल कालव्यावर उभा असलेला पूल तोडून नव्याने बांधण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आला होता. या कामासाठी शासनाने १ कोटी ८० लाख रुपये मंजूर झाले आहे. हे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. 

विशेष म्हणजे या महामार्गाने कोकण, विजापूरशी जोडला जाणार आहे. या मार्गावरील जमिनींना सोन्याचा भाव येईल. अनेक गावे महामार्गावर येणार असल्याने तेथे बाजारपेठ वाढेल.

गुहागर-विजापूर मार्ग राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हस्तांतराची अंतिम प्रक्रिया सुरू होईल. या महिन्यात ती पूर्ण होईल. तत्पूर्वी दोन्ही खात्यांचे अधिकारी एकत्रितपणे मार्गाची पाहणी करणार आहेत. 
- एकनाथ मानकर, उपअभियंता, सा. बां. चिपळूण

Web Title: Guhagar Bijapur-way transfer to national highways