गुहागरमध्ये कोविड केअर सेंटर नव्हे कचराकुंडी !

सकाळ वृत्तसेवा
Monday, 28 September 2020

जुलै महिन्यात येथील बायो मेडिकल कचऱ्याची समस्या उद्‌भवली होती.

गुहागर : तालुक्‍यातील वेळणेश्वरच्या कोविड केअर सेंटरची अवस्था अंत्यंत विदारक झाली आहे. येथे केंद्रही आहे. केअर सेंटरची व स्वॅब तपासणी केंद्रात १५ दिवसांपासूनचे अन्न पडून आहे. ते कुजल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याबाबत तेथील रुग्ण, कर्मचारी यांनी प्रशासनाकडे विनंती अर्ज केले; मात्र अद्याप हा कचरा उचललेला नाही. त्यामुळे हे कोविड सेंटर आहे की कचराकुंडी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा - बेकारीची टांगती तलवार असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा 

 

कोविड केअर सेंटरमधील भोजन अनेक रुग्ण घेत नव्हते. त्याऐवजी घरून जेवण मागवले जात होते. त्यामुळे ही अवस्था आल्याचे सांगितले जाते. एप्रिल अखेरीस वेळणेश्वरमध्ये सुरू झालेल्या कोविड केअर सेंटरच्या व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. जुलै महिन्यात येथील बायो मेडिकल कचऱ्याची समस्या उद्‌भवली होती. मध्यतंरी पाणी नाही, जेवण वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या.

आता तळमजल्यावर अन्नपदार्थांच्या पिशव्या स्वॅब तपासणीच्या खोलीतच पडून आहे. त्यामुळे येणाऱ्या दुर्गंधीने तपासणीला येणारे रुग्ण आणि तपासणी करणारे डॉक्‍टर, नर्स आदी कर्मचारी हैराण झालेत. या पिशव्यातील कुजलेले अन्नपदार्थामुळे कुत्रेही राजरोसपणे येतात. पहिल्या मजल्यावर रुग्णांसाठी मेसमधून आलेले अन्न ठेवले जाते. अन्नाची पार्सल, कोरा चहा भरून ठेवलेले चहाचे पेले पडलेले आहेत.

हेही वाचा - कोकणात शिक्षकांच्या अनोख्या उपक्रमाने विद्यार्थी होत आहेत कृतीशील

 

मात्र कोणीच लक्ष देत नाही

या संदर्भात तेथील वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, सहाय्यक सेविका यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, तीन आठवड्यांपूर्वी कोविड केअर सेंटरमध्ये ७४ रुग्ण होते. यापैकी अनेक रुग्ण घरातून जेवणाचे डबे मागवत. त्यामुळे शासकीय व्यवस्थेतून आलेले अन्न मोठ्या प्रमाणात उरले. ते पिशव्यांमधून भरून तळमजल्यावर आणून ठेवलेले आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: guhagar covid center not properly run waste dangerous to people stay in covid center in guhagar